संपादकीय

संभाजी राजेवर जीवापाड प्रेम करणारे वीर गणपत महार उर्फ गोविंद गोपाळ गायकवाड- २


गणपत महार..

2
जनाबाई तरीही गप्पच होती. तशी परत राधाबाई तिच्याजवळ येवून म्हणाली, “जना, सांगणं. असं काय झालं की तू घाबरलेली दिसतेय?” राधाईनं तिच्या पाठीवरुन हात फिरवला. तोच जनाबाई बोलती झाली. “सरकार, त्या नदीवर मले एक मुंडकं गवसलं. मुंडकं कोणातरी मायराजाचं दिसतंया. पण मी वळखलं नाय अजूनपर्यंत कोणाचं मुंडकं हाय ते. समजलं नाय.” “मुंडकं……..जनाबाई काय बोलतुया तू. अवं ते मुंडकं आपल्या लाडक्या संभाजीचं तं नसन. काल त्याचंच मुंडकं औरंग्यानं भाल्याले लटकवून त्याची मिळवणूक काहाळली होती न वं. तुले नाय मालूम का जने.” “मुंडकं आन् ते बी संभाजीचं. छे!” “हो जना. पण मले एक आश्चर्य वाटते का संभाजीचं मुंडकं आपल्या शिवारात! ते कसं टाकलं बा या वळूच्या शिवारात.” “सरकार, मले नाय वाटत की ते आपल्या लाडक्या राजाचं मस्तक असन म्हून.” “कदाचित नसावं ते मस्तक आपल्या राजाचं.” “ऋण चालावं तं सही. निदान पावून तं घ्या सरकार का ते मस्तक कोणाचं हाय ते?” “हो, का नाही. पण जने पाह्यलं आणि वळखलं बी त्या मस्तकाले तरी आपून काईपण करु शकत नाय. कारण औरंगानं काल दवंडी पिटवली का जो कोणी त्या तुकड्याले हात लावन. त्यालेबी मृत्युदंड मिळन.” “सरकार, पावून तं घ्या. ते संभाजीचंच मुंडकं हाये का ते. अन् गुपचूप नोको पावा. गावालेबी सोबत घेवू म्हंते. कोणी ना कोणी तं तयार होईनच. तुमी फक्त पाहात रायजा. बाकीच्याईले काम करु देजा. हं औरंग्या पुढा-यालेच मारन न वं.” “हो जने, तुह्यं बी बराबर हाये.” दामाजी म्हणाला. वढू ते गाव. त्याही गावात औरंगजेबानं कारागृह जरी बांधलं असलं तरी गावात काय चाललं आहे याची फारशी कल्पना त्या अधिका-यांना नसायची. त्यातच दामाजी उठला. तो झपाझप पावले टाकत चालू लागला. सोबत राधाई व पाठीमागं जीजाई होती. सायंकाळ पुरती ढळत चालली होती. तसा दामाजी गोरखनाथच्या घरी पोहोचला. गोरखनाथ गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती. तोही दामाजीसारखाच. तसा दामाजी, जनाबाई व राधाईला पाहताच गोरखनाथ म्हणाला, “दामाजी काय झालंया? असे कसे अकस्मात आलात?” “गोरखनाथजी घात झाला असं वाटतूया.” “म्हंजे?” “अहो, त्या औरंग्यानं आपला रंग दाखवला म्हणा.” “म्हंजे झालं तरी काय?” “अवो नाथजी, या जनाबाईले एक मुंडकं गवसलं म्हणा. त्या नदीच्या पात्रात हे आपले कपडे धुवाले गेलती. तं हिनं एक मुंडकं आनं एक देह पाह्यला म्हंते मनुष्यधारी.” “हो काहो जना.” “हो जी मायबाप. मी आपल्या उघड्या डोळ्यानं पाह्यलो जी. मी कपडे धुवाले पाण्यात हात बुडवला. तोच माह्या हातात केस आले बा. ते केसं वर काळून पाह्यतो तं का ते मायराजाचं मुंडकंच हातात आलं जी. मग माह्यी सटारली आन् मी धावत धावत दामाजीच्या वाड्यात आलो जी.” “आतं का कराचं दामाजी?” “नाथा, तुम्हाले तं माहितच हाय का माह्यी धाव तुमच्यापर्यंतच. आता तुम्हीच सांगा नं बुवा.” “कालची दवंडी पाह्यल्या का? ऐकल्या तरी का? औरंग्यानं दवंडी देली का जो कोणी त्या संभाजीच्या अवयवांना उचलून अग्नी देणार त्यालाही मृत्युदंड देवू. मग कोण हिंमत करणार बरं. मी एक सांगतो दामाजी. तुमी घरला जावा. शांत बसा अान् मलेबी शांत रावू द्या. उगाच लपडा कायले पाह्यजे. अवो तुमाले बी परीवार हाये. मले बी परीवार हाये. शांत बसा तुमी. संभाजी राजा तं मरणच पावला. पण त्याचा आपल्याले कायले पाह्यजे त्रास?” “मले वाटते का त्या औरंग्याले का आपलंच गाव भेटलं होतं हे तुकडे टाकाले. दुसरं गावंच भेटलं नव्हतं. बुवा तुमचं म्हणणं बराबर हाय. मीबी शांत बसतो. तुमी बी बसा.” ते नाथाचे शब्द व ते दामाजीचे शब्द जनाबाई ऐकत होती. तशी ती म्हणाली, “बुवा कसे बोलता तुमी. अवो आपण शिवरायाची माणसं. एवळे दिस आपल्याले शिवरायानं पोसलं. लेकरांसारखं पिरम केलं आपल्यावर. अन् हा संभाजी म्हणजे आपलाच पोरगा नव्हं. आज त्या संभाजीच्या जागी आपला पोरगा राह्यला असता तं. आपून का केलो असतो? अन् ते मुंडकं संभाजीचंच होये कशावरुन? अजून वळख तं पटाचीच हाये.” जनाबाई काय बोलायचं ते बोलून गेली. पण तिचा मुद्दा सर्वांना पटला. तशी जनाबाई बोलून झाल्यावर नाथ म्हणाले, “दामाजी, जनाबाईचं म्हणणं बराबर हाये. पण त्या प्रेताले हात लावन कोण?” दामाजीला नाथानं केलेला प्रश्न. तसा काही वेळातच दामाजी बोलला. आपला आहे नं गोंयद्या. त्याले नेवू. आन् त्याले काढाले लावू मुंडकं. मंग तं झालं.” “बरं.” दामाजी म्हणाला व तो तसा गोविंद उर्फ गणपत गायकवाडच्या घराकडे निघाला. पुढे दामाजी, त्यानंतर राधाबाई, जनाबाई व गोरखनाथ यासह एकदोन जण जशी त्यांची मिळवणूकच निघाली होती. ते थेट गोविंदाकडे गेले. तसा दामाजीनं आवाज दिला. “गोंयद्या गोंयद्या.” गणपतनं आवाज ऐकला. तसा गणपत कोकलीतून बाहेर आला. तसं त्यानं पाहिलं. दामाजी, गोरखनाथ, जनाबाई राधाई आणि अजून दोन तीन जण आपल्या घरी आलेले आहेत. तसा तो म्हणाला, “काय झालं सरकार? आपण असे अचानक. झालं तरी काय?” “गोंयद्या, घाबरु नोको. अरे या जनीनं त्या इंद्रायणीत एक मुंडकं पाह्यलं. ते मुंडकं बहूतेक संभाजी राजाचं असावं. असं वाटतं. त्यासाठी तुले बोलवाले आलो बा. आमची तं हिंमतच होत नाही. तू जाते का पाहाले या जनाबाईसोबत. काई कराचं नाय. फक्त ते मुंडकं कोणाचं ते वळखावं. हं आपल्याले अग्नीवग्नीच्या भानगडीत पडाचं नाय. कारण कालच औरंग्यानं दवंडी पिटवली का जो कोणी त्याले अग्नी देईन. त्याले मृत्युदंड मिळन. म्हून सांगतो का त्याची फक्त वळख करुन घ्यायची. बाकी काहीच कराचं नाही. समजलं ? गोविंदानं ते ऐकलं. संभाजीबद्दल त्याच्या मनात फार आदर होता. एरवी संभाजीला त्यानं जवळून पाहिलं होतं. त्याला लहानपणचा संभाजी आठवत होता. हळूहळू तो भुतकाळ त्याच्यासमोर तरळू लागला. संभाजी जेव्हा लहान होता. तेव्हा सईबाई मरण पावली होती. तसा संभाजी अनाथ झाला होता. पण त्याला सोयराबाईनं अगदी जीवापाड जपलं होतं आणि महाराजानं तर त्याला राज्यकारभाराचे शिक्षणच दिले होते. महाराज संभाजीला सोबत सोबत घेवून जात. ज्यावेळी आग्र्यावरुन महाराज परतले. तेव्हा मथुरेत एका ओळखीच्या ठिकाणी संभाजी सुरक्षीत राहावा म्हणून शिवाजीनं ठेवून दिलं व त्याच्या मृत्यूची बातमी पसरवली. अन् तोच संभाजी राजा बनल्यावर त्याला औरंगजेबानं ठार करावं धर्म स्वीकारला नाही म्हणून. आपण ओळख करायला जायलाच हवं असं त्यानं मनाशी ठरवलं. तसा तो म्हणाला, “चला गड्यानु, मी वळख करायला येत हाये.” हळूहळू गावात बातमी पसरली आणि अख्खं गाव दामाजीच्या मागं मागं नदीकाठाकडं निघालं. ते वडेश्वराचं मंदिर आलं होतं. त्याच ठिकाणी धोबीघाट होता. तसा दामाजी म्हणाला, “जने, कोठं दिसलं तुले ते मुंडकं बा.” “त्या तेथं.” जनाबाई बोलली. तसं अख्खं गाव डोळे विस्फारुन त्या मुंडक्याला शोधू लागले. त्यांना ते मुंडकं काही केल्या दुरुन दिसत नव्हतं. एवढ्यात गोरखनाथ म्हणाला, “अरे गोंयद्या, उतरनं बे पाण्यात. हातानं पाय हातानं.” गोविंदा खाली उतरला. तसा तो ते मुंडकं हातानं चाचपडून पाहू लागला आणि तसा तो म्हणूही लागला. “अवं जनाबाई, हितंच हाये नं वं मुंडकं?” “व्हय रं गोंयद्या. म्या तिथंच पाह्यला नं बा.” “हो का?” असं म्हणत गोविंदा पुन्हा ते मुंडकं चाचपडून पाहू लागला. तोच त्याच्या हाताला ते संभाजीच्या मुंडक्याचे केसं लागले. त्यानं ते संभाजीचं मुंडकं बाहेर काढलं. तशी त्याला ओळख पटली व तो जोरजोरात रडू लागला. तोच दामाजी म्हणाला, “अबे गोंयद्या, रडू नोको बे. रडू आवर बे. ते औरंग्याचे माणसं आयकतीन अन् आपल्याले शोधत येतीन अन् फालतूच मारुन टाकतीन. तवा तू आपलं रडू आवर.” तसा गोयंद्या म्हणाला, “कसा आवरु. सरकार हे तं माह्ये धनी होते.,अवं आपल्या गावात लागस कोणी मदत करीत नाही. पण हा माह्या अन्नदात्याचा पोरगा होये. जणू माह्याच पोरगा समजा. मग कसा रडू आवरु?” “गोयंद्या, हा संभाजीच होये का रे?” “हो सरकार. हा संभाजीच व्हय.” “मंग सोडून दे पाण्यात आन् परत चाला. नायतं ती औरंग्याची माणसं येतीन आन् समद्याईले मृत्युदंड देतीन.” गोरखनाथानं बोललेले शब्द. सर्वांचं त्याकडं लक्ष होतं. तसा गोयंद्या म्हणाला, “थांबा, हा शिवाजीचा पोरगा. शिवरायांचा पोरगा म्हंजे आपलाच पोरगा. आपल्यासमोरच लहानाचा मोठा झालाय. तवा आपल्याले या जीवाले असं फेकून देवून चालन का? नाही नं. तूमी जात असन तं जा. मी नाही जाणार या संभाजीले सोडून. वाटल्यास मले त्या औरंग्यानं फाशी देली तरी चालन. पण मी माघार घेणार नाही. वाटल्यास तुमाले माह्यासोबत राहाचं असन तं राहा. वाटल्यास त्या औरंग्याची माणसं आलीच तं म्हणावं हे समदं गोयंद्यानच केलं.” “गोयंद्या हे समदं बराबर हाये रे बाबा. पण हे इपरीत गावावर नोको याले.” गोरखनाथ म्हणाला. “नाही येेणार. मी पुढाकार घ्याले तयार हाये. मरालेबी. आमी शिवरायाची माणसं हाओत. मरणाले भेत नाही. हे दाखवावं लागन का नाही औरंगाले. अन् मरते कोण हितं. जो घाबरन तो. आमाले तं मरतांनी ही खुशीच हाय. आमी बी धर्मासाठी मेलो असेच समजू संभाजीसारखं.” गोविंदाचे ते खडे बोल. संपूर्ण गावाला ती गोष्ट पटली होती. तसा गावक-यांना गोविंदा आवाहन करीत होता. “आपण मले हे तुकडे गोळा कराले मदत करा. फार लान लान हायेत हे तुकडे.” गोविंदाच्या मतानुसार गावानं ते तुकडे गोळा करायला गोविंदाला मदत केली. काही काही तुकडे तर अगदी लहान लहान होते. काही तुकडे नदीत होते तर काही तुकडे नदीकाठावर होते. त्यातच ते सर्व तुकडे गोळा करुन ते एका कपड्यात बांधण्यात आले. त्यातच ते तुकडे एका शिरप्या चांभाराला देण्यात आले. त्यानं ताबडतोब ज्याप्रमाणं एखादं जनावर शिवलं जातं. त्याप्रमाणे ते तुकडे पटापट शिवले. त्यातच ते संभाजीचं शरीर तयार झालं. त्यातच शिर्के नावाच्या शिंप्यानंही त्या शरीराला आकर्षक कपडे शिवून दिले. तसं पाहता शिर्के राजदरबारातील कपडे शिवत असे. त्या शरीराला ते शिर्केनं शिवलेले कपडे परीधान केले गेले. आता शरीर तयार झालं होतं. त्यातच आता त्या शरीराचा अंत्यसंस्कार. अंत्यसंस्काराचा प्रश्न उभा झाला. तसा एक गावकरी दामाजीला म्हणाला, “दामाजी, आपून या संभाजीचा अंत्यसंस्कार तुमच्या नदीकडील शेतात करु.” तसा दामाजी म्हणाला, “नाही. कदाचित औरंगाची माणसं येतीन आन् मलेच उचलून नेतीन. मी मराले तयार नाही बाबा. ज्याले मराचं असन. त्यानंच अग्नी द्यावा. फुकटचं इपरीत नोको.” गावक-यांनी ते बोलणं ऐकलं. सर्वजण मरणाला घाबरत होते. कारण त्यांना माहित होतं की जर या संभाजीचं प्रेत ज्यानं जाळलं किंवा ज्यांच्या जागेत अग्नी दिली. त्यांना मृत्युदंड मिळेलच. कारण तशी धमकी औरंगजेबानं आधीच देवून ठेवली होती. संभाजीचं शरीर शिर्के व शिर्प्यानं शिवून तयार केलं होतं. पण आता अग्नी देणार कोण? सर्व गाव एकमेकांकडं पाहात होता. कोणाचीच हिंमत होत नव्हती. तसा गोविंदाही खचला होता. त्यालाही वाटत होतं की माझ्यानंतर या माझ्या परीवाराचं पालन पोषण कोण करेल? प्रत्येकाच्या जीवनाचा प्रश्न होता. शिवरायांचा काळ बरा होता की त्या शिवाजीनं तानाजी मरण पावताच त्याच्या उमरठे गावी जावून त्याला मदत केली. रायबाचा विवाह लावून दिला. पण माझ्या परीवाराचं काय होणार. सर्वजण असाच प्रश्न करीत होते. प्रत्येकजण तसाच विचार करीत होता. तसा गोविंदानंच विचार केला की जे होईल ते पाहिल्या जाईल. आपणच तयार व्हावं. हे आपलंच लेकरु आहे. आपल्या धन्याचं लेकरु आपलं लेकरु. तसा तो म्हणाला, “दामाजी, मी तयार हाये अग्नी द्याले. मी माह्या घराच्या अांगणातच अग्नी देतो संभाजीले. मी संभाजीसाठी बलिदान द्याले तयार हाये. मात्र एक अट हाये?” अट……..प्रत्येकानं एकमेकांकडं पाह्यलं. तसा दामाजी शंका मनात ठेवून म्हणाला, “अट. कोणती अट?” “मी मेल्यावर माझ्या परीवाराले आपण पोसावं. एवळीच अट हाये सरकार.” “एवळीच अट ना. बरं बरं. आम्ही समदे गावकरी पोसून टाकू तुह्या परीवाराले. आतं तं झालं नं.” “हो, अातं झालं.” गोविंदा बोलला. तसा त्यानं सुटकेचा श्वास सोडला. तशी रात्र झाली होती. ती औरंगजेबाची माणसं ढाराढूर झोपली होती. त्यांना गावात काय झालं आणि काय होत आहे याची कल्पना नव्हती. तसा गोविंदानं आपल्या अंगणातच त्याचं शरण रचलं व त्यात संभाजीचं शरीर ठेवत त्याला स्वतःच मुखाग्नी दिला. पण तो अग्नी देतांना त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहात होते. ते अश्रू त्याच्याच डोळ्यातून नाही तर संपूर्ण गावाच्या डोळ्यातून अश्रू वाहात होते. त्या गावातील बासष्ट लोकांनी अत्यंत धाडसानं संभाजीच्या अंत्ययात्रेत भाग घेतला होता. बाकी लोकं मात्र धाकानं घरातच दडले होते. त्यांना वाटत होतं की संभाजीला जर आपण अग्नी दिलाच तर आपल्याला मुघल बादशाहा औरंगजेब सोडणार नाही. मृत्युदंड देईल. संभाजी अग्नीच्या स्वाधीन झाला होता. त्यातच गावक-यांनी ती झालेली राखही त्या भीमा,भामा व इंद्रायणीच्या संगमात विसर्जीत केली. त्या प्रकरणाची वाच्यता कुठेही केली गेली नाही.. असेच काही दिवस गेले. असेच काही दिवस गेले. कुणाला काहीपण भनक नव्हती. त्यातच गोविंदानं आपल्या घराच्या अंगणात दिवा लावणं सुरु केलं होतं. त्यातच त्यानं अंगणातच एक चबूतरा बनवला. त्याला नाव दिलं संभाजीची समाधी. तसा तो रात्रदिवस त्या समाधीची पुजा करु लागला. त्यातच हळूहळू त्या समाधीची चर्चाही वाढायला लागली. त्यातच वढू गावात संभाजीला अग्नी देण्यात आला ही बातमी हवेसारखी औरंगजेबाला माहित झाली आणि त्यानं सैनिकांना आदेश दिला. “त्या गोयंद्याला ताबडतोब माझ्या समक्ष आणा.” औरंगजेबाचाच तो आदेश एक दिवस काही सैनिक गोविंदाच्या दारात उभे झालेत. त्यांनी गोविंदा कोण असं विचारलं. तसा गोविंदा न घाबरता कोकलीतून बाहेर आला. हात जोडून म्हणाला, “मीच गोयंदा, आपण कोण? काय काम हाये जी माह्याकडं?” सैनिकांनी एकमेकांकडं पाहिलं. तसा एक सैनिक म्हणाला, “तूच गोयंदा नं. तुले बादशहा सलामत औरंगजेबानं बोलावलंय.” “कशासाठी जी?” “तुह्यावर आरोप हाये का तू त्या संभ्याले अागीन देली. बोल खरं हाये का हे?” क्षणभर गोविंदा स्तब्ध उभा राहिला. तसा न घाबरता तो म्हणाला, “हो, मीच महाराज संभाजीच्या पार्थीवाले अग्नी देली. मी येतो तुमच्या मायराजाकडं.” “तुले माहित नोयतं का की औरंगजेब तुले पकडून नेईन अन् तोफेच्या तोंडी देईन.” “माहित होतं आन् हाये. पण आमी शिवरायाची माणसं. आमाले कोणाची भीती नाही.” गोविंदा निर्भीडपणानं बोलून गेला. तसं सैनिकानं त्याला पकडलं व त्याला साखळदंडानं जखडत त्याला औरं गजेबासमोर उभे करण्यासाठी घेवून गेले.

( क्रमश:)-

–अंकुश शिंगाडे,

( नागपूर –९३७३३५९४५०)

पुढील भाग –

https://writersmanch.com/2021/10/16/973/

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button