राज्य
एमपीएससी 2019 च्या विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश; इतरांसाठी स्पर्धा जोखमीची
एमपीएससी 2019 च्या विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश; स्पर्धा जोखमीची
2019 मध्ये एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी मिळाली आहे. तब्बल दीड वर्षांनी या बॅचमधील उत्तीर्ण गट-अ आणि गट-ब पदांच्या 413 विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश राज्य सरकारने काढले आहेत. तसेच येत्या नविन वर्षात 17 जानेवारीपासून या विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाची सुरुवात होणार आहे. त्यामुळे 2022 हे नविन वर्ष विद्यार्थ्यांसाठी खरोखरच आनंदवार्ता घेऊन आले आहे, असेच म्हणावे लागेल.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जाहीर करण्यात आलेल्या 2019 च्या राज्यसेवा परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नियुक्त्या मिळाव्यात म्हणून आक्रमक भूमिका घेण्यात आल्या होत्या. राज्यसेवा परीक्षा होऊन दोन वर्षाचा कालावधी लोटला असताना देखिल अद्यापही नियुक्त्या न मिळाल्याने नैराशाच्या भूमिकेतील विद्यार्थ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. 28 सप्टेंबर 2021 रोजी या 2019 मधील परीक्षेचा सुधारीत निकाल जाहीर करण्यात आला होता. यात गट-अ आणि गट-ब मधील उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधिक्षक, तहसिलदार, गट विकास अधिकारी अशा 413 पदांचा समावेश आहे.
हिवाळी अधिवेशनापूर्वी विरोधी पक्षांनी राज्य सरकारच्या थंड कारभारावर ताशेरे ओढले होते. राज्यात असंख्य प्रश्न प्रलंबित असताना केवळ राजकीय शेरेबाजीवर भर दिला जातो. अनेक विभागातील भरती प्रक्रियेतील भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणा-या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या या विषयाकडे विरोधी पक्षाने सरकारचे लक्ष वेधले होते. राज्यात एवढे गंभीर प्रश्न असतानाही सरकार काहीही निर्णय घेत नाही, यामुळे राज्य सरकार हरवलंय की काय? अशा शब्दात टीका करण्यात आली होती. त्यानंतर आता राज्य सरकारने एमपीएससीच्या 2019 मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसंबंधी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतल्याने काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
राज्य सरकारच्या एमपीएससीच्या या निर्णयाचा नगारा वाजत असला, तरी राज्यामध्ये एकापाठोपाठ एक परीक्षेतील घोटाळे समोर येऊ लागल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी निराशेच्या गर्तेत अडकत चालले आहेत. एमपीएससीची पूर्वपरीक्षा काही दिवसांवर म्हणजे केवळ आठवड्यावर येवून ठेपली असतानाही उत्साह दिसत नाही. त्यात स्पर्धा परीक्षेवरचा विश्वासच उडाल्यासारखं चित्र दिसून येत आहे. आता किमान एमपीएससीची परीक्षा सुरळीत व्हावी अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे.
औरंगाबाद शहरातील नेहमी गजबजलेले दिसणारे हे स्पर्धा परीक्षेचे कोचिंग क्लासेस आता ओस पडल्यासारखे भासत आहे. इथे विद्यार्थ्यांमध्ये आता फारसं चैतन्य दिसत नाही. विशेष म्हणजे अवघ्या आठवडाभरावर असलेल्या एमपीएससीच्या पूर्वपरीक्षा बाबत विद्यार्थी निराश झाले आहेत. आधी आरोग्य भरती, त्यानंतर म्हाडा भरती व आता टीईटी शिक्षक भरतीमधील घोटाळ्यांमुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. अभ्यास करून पदरात काहीच पडत नसल्यामुळे करायचं तरी काय? असा प्रश्न या विद्यार्थ्यांना पडत आहे.
ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी कुटूंबातील मुलं स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून कोणतीतरी नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असतात. मराठवाड्यातील बहुतांश व विदर्भातील काही आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेली मुलं औरंगाबाद शहराचा पर्याय निवडत असतात. कारण त्यांना पुणे, मुंबई ही ठिकाणे परवडणारी नसतात. त्यामुळे कुणी आरोग्य विभागाच्या परीक्षेची तयारी करतात, तर कुणी बँकिंग व इतर स्पर्धांच्या परीक्षेची तयारी करताना दिसून येतात. त्यात एमपीएससी, नेट, सेट, टीईटी अशा अनेक स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतात. मात्र मेहनत करतो एक जण आणि फळ चाखतो दुसराच...हे चित्र गेल्या दोन महिन्यापासून महाराष्ट्रात समोर येत असल्याने विद्यार्थ्यांचा आता या स्पर्धा परीक्षांवर विश्वासच उरला नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे नेहमी उत्साह, वर्दळ आणि चैतन्य दिसणा-या ठिकाणी मात्र निराशा दिसून येत आहे.
येत्या काही वर्षात स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांची संख्या लाखांवर पोहोचली आहे. त्यात हजारोंच्या संख्येने क्लासेस उभे राहिले आहे. त्यांचा धंदा जोरात सुरू आहे. मात्र पैस, कष्ट आणि वेळ खर्ची घालूनही तरुणांच्या पदरात काहीच पडत नसल्यामुळे अनेक तरुण निराश होत आहेत. त्यात अशा घोटाळ्यांमुळे चिंता अधिक वाढत आहे. आता ही चिंता सरकार आणि प्रशासकीय यंत्रणा कशी दूर करणार हा महाराष्ट्राच्या समोरचा सर्वात मोठा प्रश्न आहे.
शब्दस्पर्शी- सुनील शिरपुरे
कमळवेल्ली, यवतमाळ
भ्रमणध्वनी-7057185479