पँथरच्या उदयाची कारणे..
पँथरच्या उदयाची कारणे..
भारतीय संविधानाचे मूल्य नीट समजावून न घेता त्याला विरोध करून जातीय मानसिकतेच्या वर्तुळात फिरणारे संकुचित विचार संविधान स्वीकृत झाल्यावरही मागील सात -आठ दशकात अधिक तीव्रतेने पहावयास मिळाली.
या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी जी चळवळ निर्माण केली गेली तिचा इतिहास आंबेडकरी चळवळीतील एक बीजपेरणी म्हणता येईल. त्यापैकी एक म्हणजे
दलित पँथर
दलित पँथर चळवळ : “नेत्याच्या बेजबाबदार वर्तनामुळे अनुयायी वाऱ्यावर पडतात या अनुभवातून कार्यकर्ते अस्वस्थ होते. या अस्वस्थेमधूनच ‘दलित पँथरचा’ उदय झाला. ” जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मिळणाऱ्या विषमतेच्या वागणुकीबाबत अनुसूचित जातीमधील शिक्षित वर्ग जागृत झाला होता. आपला स्वतंत्र परिचय प्रस्थापित करण्याचे त्यांचे प्रयत्न चालले होते. घटनेने दिलेल्या आर्थिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील समान हक्कांचा ते पुकारा करू लागले. समान मानवी हक्काच्या मागण्यांनी संतप्त झालेल्या सनातन्यांनी दलितांना पारंपरिक खालच्या पातळीवर ठेवण्याचा दडपशाहीचा मार्ग अवलंबिला त्यामुळे दलित व उच्चवर्णीय यांच्यातील दरी वाढली. तसेच पंचायत राज्याच्या प्रयोगातून आणि विकास योजनांच्या राबवणुकीतून जो एक राज्यकर्त्यांचा नवा मग्रूर वर्ग गावोगावी पुढे येत होता त्याला दलितांनी स्वाभिमानी होऊन जगणे नामंजूर होते. पिढ्यान्पिढ्या दलितांनी जे दास्य निमूटपणे सहन केले ते तसेच कायम रहावे यासाठी दहशत, दंडेलीचे तंत्र त्या वर्गाने मोठ्या प्रमाणावर सुरू केले. त्यातून दलितांवर बहिष्कार टाकणे, चाबकाने फोडून काढणे, डोळे काढणे, जिभा छाटणे, खून पाडणे वा धिंड काढणे वगैरे प्रकार वाढत्या प्रमाणावर जागोजागी होऊ लागले. दलित स्त्रियांवरील बलात्काराच्या बातम्या वाढू लागल्या. १९७० च्या आसपास हे प्रकार विशेष गंभीर होते.
पँथरच्या उदयाचे मुख्य कारण म्हणजे दलितांवरील वाढते अत्याचार होय. महाराष्ट्रात दलितावर होणाऱ्या अत्याचारात वाढच होत गेली असे दिसते. १९७१ साली प्रसिद्ध झालेल्या इलाया पेरूमल समितीच्या अहवालात नमूद केलेल्या दलितांवरील अत्याचाराच्या घटना अशा होत्या
“१. सार्वजनिक विहिरीवर पाणी भरू देण्यास सक्त मनाई.
२. हॉटेलमध्ये ताटात / प्लेटमध्ये खाद्यपदार्थ देण्यास नकार.
३. नाव्ही व धोबी सेवा स्वीकारण्यास मनाई. ४. पंचायतीच्या बैठकीत दूरवर बसविणे किंवा वेगळी व्यवस्था करणे.
५. झोपडीत कोंडून कुटुंबास जाळणे.
६. नरबळी देणे.
७. दलित स्त्रियांची नग्न करून धिंड काढणे.
८. दलित स्त्रियांवरील बलात्कार.
९. जबरदस्त मारहाण व ठार करण्याची धमकी देणे. १०. दलितांच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत मानवी विष्ठा, मृत जनावरे
११. उभी पिके नष्ट करणे.
१२. सार्वजनिक बहिष्कार टाकणे.
१३. रस्त्यावरून लग्नाची वरात नेऊ देण्यास बंदी करणे इत्यादी” “
‘राज्यातील साखरसम्राट, मराठा व सवर्णाांनी दलित अत्याचारात हिरीरीने भाग घेतला.
“जात हा घटक निवडणुकीच्या राजकारणात महत्त्वाचा घटक बनला. नव्यानेच राजकीय व आर्थिक सत्ता प्राप्त झालेल्या आणि सामाजिक ज्येष्ठता अबाधित असलेल्या उच्च जातीमधील वाढती जातीयता आणि दलितांमधील प्राथमिक अधिकाराविषयीची वाढती जाणीव यामुळे या दोन गटात सतत संघर्ष सुरू असत.”
“रिपब्लिकन पक्षाला भुमिहीनांसह अनुसूचित जातीतील कुठल्याही दलितांना एकत्र आणण्यात अपयश आले. पुढे या फाटाफूट झालेल्या दलितांचे अनेक गट, उपगट व छावण्या बनल्या. रिपब्लिकन पक्ष हा मते, मागण्या, राखीव जागा आणि सवलती यांच्या दुष्टचक्रात अडकला. पक्षाचे नेते भ्रष्ट आणि नीतिमत्तेची चीड न बाळगणारे झाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील असीम श्रध्दा, दलित समाजाविषयीचा अपार जिव्हाळा,सामाजिक विषमतेविरुध्द पेटून उठलेले दलित तरुण यामुळे ‘दलित पँथर’ ही संघटना थोड्याच काळात नावारूपाला आली. पँथरची बेदरकार भाषणे, गर्दी खेचणाऱ्या सभा, हाणामारी,मोर्चे, पोलिस केसेस यामुळे लोकांचे लक्ष दलित पँथरने खेचून घेतले. दलित पँथरच्या स्थापनेनंतर पँथरने महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद, मुंबई, पुणे, नाशिक इत्यादी ठिकाणी लढे उभारून दलित समाजातील विशेषतः तरुण मंडळींना दलित समाजातील प्रश्नांवर जागृत करण्याचा प्रयत्न केला.
मुंबई शहरात अनेक चळवळी उभारल्या. १९७४ च्या महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीमध्ये पँथरच्या राजकिय पाठिंब्यामुळे विरोधी पक्षाचा उमेदवार काँग्रेसच्या उमेदवाराला हरवून निवडून आला. औरंगाबादमधील दलित विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वाढीसाठीचा प्रश्न पँथरने यशस्वीरीत्या सोडविण्याचा प्रयत्न केला. १९७३-१९७४ मध्ये शिष्यवृत्तीवाढीसाठी दीड महिना विद्यार्थ्यांचे आंदोलन चालले होते.
१९७८ साली दिल्लीमध्ये पँथरने मराठवाडा विद्यापीठ नामांतर प्रश्नावर प्रंचड मोर्चा काढून दिल्लीतील सत्ताधारी जनता पक्षाच्या पुढाऱ्यांना नामांतर प्रश्नाची दखल घेण्यास भाग पाडले. संपूर्ण नामांतर आंदोलनात पँथरने महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे.
दलित पँथर चळवळीचे कार्यकर्ते नामदेव ढसाळ, ज. वि. पवार, राजा ढाले, रामदास सोरटे, लतीफ खाटीक, अविनाश महातेकर, प्रल्हाद चेंदवणकर, अर्जुन डांगळे, भाई संगारे, अनिल कांबळे, अरुण काबंळे, रामदास आठवले, गंगाधर गाडे, प्रीतमकुमार शेगावकर, टी. एम. कांबळे या आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दलित पँथर चळवळ वाढविली असे म्हटले जाते; पण पुढे पँथरमध्ये फूट पडत जाऊन एप्रिल १९७७ पर्यंत
“१. राजा ढाले यांची- मास मुव्हमेंट
२. अरुण कांबळे -महाराष्ट्र दलित पँथर
३. संगारे/ महातेकर गट- दलित पँथर
४. नामदेव ढसाळ गट -दलित पँथर
असे गट पडले.
प्रत्येक गटाने नेतेपणाच्या संघर्षामुळे तर कधी वैचारिक भेद झाल्यामुळे चळवळ अधिक फुटली, वैचारिक भूमिकेवरून फूट पडल्यानंतरही भिन्न भिन्न गट काम करीत राहिले.
१९८२ मध्ये मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी मुंबई येथे दलित पँथरने पहिली परिषद घेतली.
त्या पाठोपाठ ठाणे, धुळे जिल्ह्यांतील बिटाई, कोल्हापूर इ. ठिकाणी परिषदा पार पडल्या.
नामांतराचा प्रश्न मंडल आयोगाच्या लढ्याशी जोडून नामांतर मंडल आयोग संयुक्त परिषदा पार पडल्या. १९८२ सालीच मुंबईत बाबासाहेबांच्या बहिष्कृत हितकारिणी सभेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात ‘सम्यक समाज आंदोलन’ स्थापन झाल्याची घोषणा प्रकाश आंबेडकरांनी केली.
सम्यक समाज आंदोलनाने भूमिहीन शेतमजुरांच्या प्रश्नांवर लढे दिले.
लाँगमार्च आयोजित करून साखर कारखान्याच्या राष्ट्रीयीकरणाची मागणी केली. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली जमीन, पाणी प्रश्नांवर मोठी चळवळ झाली. सरकारी जमीनी भूमिहीनांच्या नावे कराव्यात, पिण्याच्या पाण्याची कायमची सोय, पिकाला संरक्षित सिंचनाची व्यवस्था करणारे पाण्याचे सर्वकष धोरण आखावे या कार्यक्रमावर ही चळवळ उभी राहिली; परंतु दलितांचे प्रश्न अजूनही सुटले असे दिसत नाही.
जातीव्यवस्थेची सर्वात जास्त तीव्र झळ नेहमीच अस्पृश्य समजल्या गेलेल्या जातींना बसली नि ती आजतागत चालूच आहे.