संपादकीय

लढा नामांतराचा..

लढा नामांतराचा..

वैश्विक विचारनायक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला आपल्या विचारशैलीने व कार्यकर्तृत्वाने जगाच्या पटलावर नेऊन ठेवले . बाबासाहेबांनी शिक्षणाशिवाय माणसाला पर्याय नाही.शिक्षण हाच उद्धाराचा एकमेव मार्ग आहे असे सांगीतले.नुसते सांगितलेच नाही तर मुंबईस पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1946 साली केली व 1950 साली औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची उभारणी केली. पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे शिक्षणाच्या क्षेत्रात फार मोठे योगदान राहिले आहे हे खरेच.
पण त्यातही औरंगाबादच्या मिलिंद परिसराने मराठवाड्याच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक जिवनात फार मोठे वैभवशाली मनवन्तर घडवून आणलेले आहे हे नाकारता येत नाही. मिलिंदने चार पाच पिढ्यांना घडवले. नामवंत व्यक्तीची निर्मिति केली.अशा शिक्षण क्षेत्रातील धुरंधराने मराठवाड्याच्या भूमीला सुपीक केले.मिलिंद महाविद्यालयाच्या पायाभरणी प्रसंगी श्री गोविंदभाई श्रॉफ आणि माणिकचंद पहाडिया यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ बाबासाहेबांच्या भेटीला आले होते. बाबासाहेबांशी बोलताना त्या शिष्टमंडळाने “आपण हे जे महाविद्यालय सुरु करीत आहात ते या ठिकाणी चालेल का?” असा प्रश्न केला. त्यावेळी बाबासाहेब उद्गारले येथे फक्त एक महाविद्यालय उभारून चालणार नाही तर येथे एक विद्यापीठही उभारले जावे अशी माझी तीव्र इच्छा आहे आणि बाबासाहेबांच्या प्रयत्नाचे फलित म्हणून १९५८ साली मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठाला नाव काय द्यावे हा प्रश्न समोर आला. तेव्हा ज्या महामानवाने मराठवाड्यात शिक्षणाची दारे खुली केली त्याच महामानवाच्या नावाला विद्यापीठाला देण्यासाठी संघर्ष करावा लागला,यात आमची एक पिढी संघर्षात कामी आली. अनेक पिढ्यांना आदर्श असे काम आमच्या पिढ्यांनी करुन ठेवले आहे.यासाठी केलेला संघर्ष हा फार मोठा व महत्वाचा मानला जातो. बाबासाहेबांनंतर एकीच्या चळवळीस वेगळीच दिशा मिळाली .काही तथाकथित पक्षासोबत, तर काहींनी स्वतःच्या संघटना स्थापना केल्या. त्यातली एक संघटना म्हणजे दलीत पँथर या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नामांतरासाठीचा दिलेला लढा महत्वाचा ठरतो व नामांतरासाठी झालेले शहिद बांधव यांच्या कार्यातून विद्यापीठ नामांतराची चळवळ सार्थकी लागली असचं म्हणावं लागेल. मानसिक बदल घडवण्यासाठी चळवळ करावीच लागते. त्यासाठी चळवळीला तात्विक पाया द्यावा लागतो. अर्थात नामांतर चळवळीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वज्ञानाचा पाया होता ते तत्वज्ञान एक माणूस -एक मुल्य या भाषेत मांडता येईल. विद्यापीठास डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यामागे परीवर्तनाचे विचार रुजविण्याचा आणि मनुष्यत्वाची प्रतिष्ठा हे सर्वश्रेष्ठ मुल्य आहे हे रुजविण्याचा प्रयत्न होता. 27 जुलै 1978 ला विधान सभागृहानी आवश्यक त्या ठरावाला मान्यता दिली. या ठरावाची घोषणा होताच ‘ मराठवाडा दंगलीनी पेटून गेला.’ वस्तुतः दोन्हीं सभागृहानी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नाव देण्याचा निर्णय घेतला होता . यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर हे नाव समतेच्या लढ्याचे प्रतीक आणि मराठवाडा हा अस्मिता दर्शक शब्द याचा समन्वय साधणारा होता पण हजारो वर्षे मनात साठलेल्या जातीयतेच्या विषारी वृत्ती उफाळून आल्या. जाळपोळ-दंगली झाल्या सामजिक तणाव वाढत गेले. औरंगाबाद, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद या मराठवाड्याच्या सर्वच जिल्ह्यात आग पसरत चालली होती. जाळलेली घरे, चारलेली शेते, तोडलेली माणसे असे मराठवाड्याचे चित्र निर्माण झाले.नामांतरासाठीचा लढलेला लढा हा संघर्षमय होता.विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव मिळावे म्हणून अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या बलिदानाची पर्वा केली नाही. आंबेडकरी जनता आपल्या पित्याच्या (बाबासाहेबांच्या) नावासाठी वाटेल ते करण्यास तयार होती. नामांतराची लढाई ही दीन दलितांच्या अस्मितेची लढाई होती. ही चळवळ म्हणजे महाराष्ट्रातील आणि देशातील सर्वात मोठी लढाई होती. या लढ्यात कित्येक क्रांतिकारक शहीद झाले. कितीतरी युवक – युवतींना आपले प्राण गमवावे लागले. कित्येकांच्या घरादाराची राखरांगोळी झाली. कित्येक दलित आया-भगीनींवर बलात्कार झाले तर काही गावात दलित वस्त्यांवर बहिष्कार टाकण्यात आला. सार्वजनिक पाणवठ्यावर दलितांना बंदी करण्यात आली. दलित आया- भगीनींच्या कित्येक गावातून भरचौकातून उघड्या – नागड्या धिंडी काढण्यात आल्या. नामांतराच्या या काळामध्ये जातीयवादी नराधमांनी अत्याचाराची सीमा ओलांडली होती. पोलीसांनीही लहान बालके, स्त्री, वृद्ध,पुरुषांवर बेसुमार लाठीचार्ज केले तर काही वेळा बंदुकीचाही वापर केला. विद्यापीठ म्हणजे काय हेही ज्यांना धडपणे माहित नव्हते त्या दीनदुबळ्या दलितांवर खेडोपाडी अमानुष अत्याचार करण्यात आले. आईच लेकरू आईविना पोरक झाल्यासारखी दलित बांधवांची अवस्था झाली होती. एवढे होत असतानाही धाडसी भीमसैनिकांनी कधीच माघार घेतली नाही. फक्त बाबासाहेबांच्या नावासाठी दलित बांधवांनी अनेक अन्याय – अत्याचार, जुलूम सहन केले. गावोगावी, शहरात आणि खेड्यापाड्यापर्यंत नामांतराच्या आंदोलनाची ठिणगी पडलेली होती. जिकडे-तिकडे एकाच नारा गुंजत होता “नामांतर झालेच पाहिज”’. नांदेडमध्ये दलित पँथरच्या गौतम वाघमारे या कार्यकर्त्याने सरकार नामांतर करत नाही म्हणून स्व:तला भरचौकात जाळून घेतले. अखेरच्या श्वासापर्यंत एकाच नारा होता, “नामांतर झालेच पाहिजे” बाबासाहेबांच्या नावासाठी त्याने आपल्या प्राणाचे बलिदान केले . परभणी जिल्हातही पोचिराम कांबळे यांचे हात-पाय तोडण्यात आले. त्यांनाही जातीयवादी सैतानांनी जर्जर करून ठार मारले. जनार्धन मवाडे, संगीता बनसोडे, प्रतिभा तायडे, अविनाश डोंगरे, चंदन कांबळे, दिलीप रामटेके, रोशन बोरकर असे कितीतरी दलित क्रांतिवीर नामांतराच्या लढ्यात शहीद झाले. जातीयवादी सरकार नामांतर करत नाही म्हणून दलित मुक्ती सेनेचे सरसेनापती आणि लॉंगमार्च प्रणेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी दलित बहुजन समाजाची फौज जमा करून नागपूर ते औरंगाबाद असा लॉंगमार्च आयोजित करून “जिंकू किंवा मरू “, जळतील नाहीतर जाळून टाकतील ” अशी आक्रमक भूमिका घेतली. लॉंगमार्च मधील निष्पाप लोकांवर इंग्रजानाही लाजवेल अशा क्रूरपणे लाठीहल्ले केले. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, कित्येकांना तुरुंगात डांबले. या निष्पाप दलितांचा गुन्हा काय? तर आपल्या पित्याचे (बाबासाहेबांचे) नाव विद्यापीठाला द्यावे हि (सरकारी) मागणी. ज्यांनी दीनदलित , पिचलेल्या आणि उच्चभ्रू समाजाने वाळीत टाकलेल्या समाजातील माणसाला माणूसपण मिळवून दिले, जगण्याचा हक्क दिला, त्या उत्तरदायीत्वापोटी बाबासाहेबांचे नाव विद्यापीठाला द्यावे ही रास्त व न्यायपूर्ण मागणी गुन्हा ठरवून अमानुष वागणूक देणाऱ्याचा निषेध केला पाहिजे. तत्कालीन मुख्यमंत्र्याला समजले कि बाबासाहेबांची ही लेकरे बाबासाहेबासाठी प्राण द्यायलाही मागेपुढे पाहात नाहीत. जर यांच्या संयमाचा अंत झाला तर हेच लोक दुसराऱ्याचा प्राण घ्यायलाही मागेपुढे पाहणार नाहीत. त्यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एकच आवाज होता नामांतर–नामांतर… चारही बाजूने सरकारच्या नाड्या आवळल्या जात होत्या. त्यांच्यासमोर नामांतराशिवाय पर्याय उरला नाही. १७ वर्षाच्या कडव्या संघर्षानंतर शेवटी सरकारला माघार घ्यावी लागली व १४ जानेवारी इ.स. १९९४ रोजी मराठवाडा विद्यापीठाचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद’ असा नामविस्तार करण्यात आला. ज्या महामानवाने देशाची राज्यघटना लिहिली, मराठवाड्यात उच्च शिक्षणासाठी विद्यापीठ असावे हि सर्वप्रथम कल्पना मांडली त्या महापुरुषाचे नाव विद्यापीठाला देण्यासाठी १७ वर्ष संघर्ष करावा लागला. नामांतर झाले परंतु अर्धवट नामांतर झाले, हि खंत आजही भिमसैनिकांच्या मनात आहे. विद्यापीठाचे पहिले नाव ‘मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद’ असे होते. नामांतरानंतर “डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ , औरंगाबाद” एवढेच झाले.
नामांतराची लढाई हि प्रतीकात्मक सामाजिक समतेची लढाई होती. १४ जानेवारी १९९४ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रवेशद्वार हे आंबेडकरी समाजाचे प्रेरणास्थान बनले आहे. दरवर्षी १४ जानेवारी यादिवशी आंबेडकरी जनता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठच्या ‘ प्रवेशद्वाराला अभिवादन करण्यासाठी येते.जणूकाही साक्षात आपण बाबासाहेबांपुढेच नतमस्तक होत आहोत या श्रद्धेने गेटपुढे नतमस्तक होतात व शहिदांना अभिवादन करतात.
अत्यंत कमी शुल्कात उच्च शिक्षण देणारे देशातील हे पहिले विद्यापीठ ठरले आहे. मराठवाडा, विदर्भ, खान्देश, भागातील शेतकरी, शेतमजूर, दलित, कष्टकरी वर्गातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक भूमी म्हणून या विद्यापीठाने नाव लौकिक मिळविला व लाखो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देऊन त्यांच्या आयुष्याला आकार दिला या विद्यापीठाची ओळख जगभर आहे या पवित्र विद्यापीठाचे नाव लोक आदराने घेतात. परदेशी विद्यार्थ्यासाठी हे विद्यापीठ पर्वणीच ठरले आहे या ज्ञानदानाच्या भुमिस कोटी कोटी प्रणाम…”सांभाळून ठेवा राख जाळलेल्या घरांची
संपली नाही लढाई नामांतराची..”

“जाळले गेलो तरी सोडले नाही तुला,
कापले गेलो तरी तोडले नाही तुला,
हि तुला उध्वस्त झालेल्या घरांची वंदना.!”

नामांतर_शहिदांच्या_स्मृतीस_विनम्र_अभिवाननिलेश वाघमारे…

नांदेड..8180869782

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button