संस्कृती

शिवबा माझ्या घरात नको..

शिवबा माझ्या घरात नको..

आज आम्ही आमची मुलं जन्माला घालतो.त्यांना लहानाचे मोठे करतो.त्यांच्यासाठी स्वप्न पाहातो.कुणी डाँक्टर बनविण्याचे स्वप्न बघतात.तर कोणी आपल्या मुलाला इंजीनियर बनविण्याची स्वप्न पाहतात.पण कोणाला जर विचारलं की शिवबा बनवा तर मात्र बोबडी वळते.कारण शिवबा माझ्या घरात नको.तर दुस-याच्या घरात आम्हाला हवा आहे.
शिवरायाबद्दल आमच्या मनात आदर आहे.पण खरंच आम्ही शिवबाला मानतो का?अन् मानत असेल तर आम्ही शिवबाला जन्म दिलाच पाहिजे.त्याला शिवबासारखं घडवलं पाहिजे.असा विचार कोणी करीत नाही.त्याने आदिलशाही,निजामशाही एवढंच नाही तर मोगल बादशाहीशी युद्ध करावं.त्या द-याखो-यातल्या वाटा शोधाव्या.मावळ्यांसोबत राहावे.जे मावळे कसेतरी राहात होते.काटक जरी असले तरी कोणाच्या पायात चप्पल नसायची.कोणी शेंबडं असायचं.कोणी नग्नही.अशा समस्त महार,मांग,चांभार,कुणबी,धानबी,रामोशी या सर्वच जातीच्या मुलांशी आमच्या मुलाशी आमच्या घरच्या शिवबांनी मैत्री करावी असं वाटत नाही.आजही आमचा मुलगा जर मैत्री करीत असेल तर त्याने मैत्री श्रीमंत मुलाशी करावी.जो आमच्या लायक आहे.असे आम्हाला वाटते आणि मी शिवबा जन्माला घालीन असा जर कोणी मनात प्रण केल्यास त्याला आजची जनता वेड्यात काढल्याशिवाय राहणार नाही.
खरंच ती जिजामाता थोर होती.जिने स्वराज्याची स्वप्न पाहात असतांना आपल्या शिवबाला घडवलं.धन्य ती माता की आपल्या लेकराचा जीव धोक्यात असतांनाही प्रतापगडावर अफजलखानाच्या भेटीला जावू दिलं.तिला माहीत होतं की हा अफजलखान आपल्या मुलापेक्षा धिप्पाड असून त्याला अफजलखान मारुन टाकेल आणि कोणत्या आईस वाटते की आपला मुलगा मरावा?
शिवबाही कामगीरीवर जात असताना आपल्या आईच्या पाया पडून जात असे.त्याची आई आपल्या सुनेकरवी त्यांना विजयाचा टिळा लावत असे.तिलक होताच नतमस्तक होत शिवराय मावळ्यांना घेवून कामावर जात असे.पण आजची मुलं जर पाहिली तर हा नतमस्तक होण्याचा संस्कारच दिसत नाही.त्यांच्याकडे पाहून असे वाटते की यांना मायबापाच्या आशिर्वादाची गरजच नाही.आजची मुले मायबापाला कचरा समजत जीवनभर वागतात.हवं तर वृद्धावस्थेत वृद्धाश्रमात ठेवतात.पत्नी येईपर्यंत सगळं ठीक असतं.पण नंतर ते एवढे बदलतात की पत्नीनं समजावलं तरी ते समजत नाही.मी,माझी बायको,माझी मुले.एवढंच त्यांचं विश्व असतं.महाराजांचं याउलट आहे.शिवबा आई मरतपर्यंत आईच्या आज्ञेत वागला.आईनं कोंढाणा घ्यायचा म्हटल्यावर त्यांनी कोंढाणा लढायची तयारी केली.आईने जे जे सांगितले.ते ते कर्तव्य शिवरायाने पुर्ण केले.त्यासाठी पत्नीचंही ऐकलं नसेलच.
शिवबा ज्याप्रमाणे आईचं ऐकायचा.त्याचप्रमाणे तो मित्रासाठीही जीव लावायचा.शिवबासाठी जीवास जीव देणा-या मित्रांनाही शिवबाने अंतर दिले नाही.तानाजी कोंढाण्यावर शहीद झाल्यानंतर त्यांच्या पुत्राचे रायबाचे लग्न त्यांच्या गावी जावून शिवबाने लावून दिले.बाजीप्रभू देशपांडेच्या मुलालाही अंतर दिले नाही.तेच कर्तृत्व इतरही मित्रांच्या बाबतीत केले.
धर्माच्या बाबतीतही शिवबाचा दृष्टिकोण सहिष्णु स्वरुपाचा होता.काही कारणास्तव मुस्लीम झालेल्या नेतोजी पालकरला स्वधर्मात घेतले.पण त्यांना त्यासाठी बाध्य केले नाही.शिवरायांनी स्वराज्य स्थापनेसाठी आधी शांततेचा दृष्टिकोण अवलंबिला.एखादा प्रभाग जर आपल्या राज्याला जोडायचा असेल तर तो भाग आपल्या राज्याला जोडण्यासाठी पहिलं वाटाघाटीचा मार्ग शिवराय अवलंबीत.पण शत्रू त्याने ऐकत नसेल तर मात्र हिंसाचार करीत असत.यात एखादा भाग जिंकलाच आणि युद्धात शत्रु राज्यातील महिला विधवा झाल्याच तर त्या विधवांनाही सांभाळण्याची जबाबदारी स्वतः पार पाडीत असत.
विशेष सांगायचे झाल्यास तो एकच शिवबा या धर्तीवर झाला.तोही महाराष्ट्रात.आपल्याला तर या गोष्टीचा अभिमान असायला हवा की शिवबा आमच्या महाराष्ट्रात जन्मला.त्यांचा उत्सव साजरा करावा.पण त्यांचा उत्सव साजरा करतांना आमच्याच विचारात एकमत नाही.कोणी एकोणवीस फेब्रुवारीला तर कोणी मार्च तर कोणी मे महिण्यात त्यांची जयंती साजरी करतात.काय गरज आहे.एकाच माणसाच्या तीन तीन तारखांना जयंती साजरी करण्याची.खरंच यावरुन दिसते की आपण खरंच शिवबाला मानत नाही.ज्या महापुरुषाच्या जयंतीबद्दल एवढा वाद आहे.तो महापुरुष समजा घरी पैदा झालाच तर आम्ही ते खपवून घेणार नाही.आम्हाला शिवबा पाहिजे.पण दुस-याच्या घरात.आमच्या घरात नकोच.
अंकुश शिंगाडे
९९२३७४७४९२

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button