संपादकीय

डिसले जगाला दिसले परंतु भारताला का नाही दिसले.? गुरुजींचा इतका अनादर का?

 

डिसले जगाला दिसले परंतु भारताला का नाही दिसले.?  या गुरुजींचा
इतका अनादर ?

ग्लोबल टीचर पुरस्कार (Global Teachers Award) मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक म्हणजे
डीसले रणजितसिंह गुरुजी म्हणून त्यांना ख्याती मिळाली.मात्र आज डी स ले गुरुजींवर शिस्तभंगाची कारवाई करून शैक्षणिक कायद्याच्या कचाट्यात अडकवून त्यांना अनादर करण्याचा दुष्ट प्रकार शिक्षण विभागाकडून केला जात आहे..डीसले जगाला दिसले परंतु भारताला दिसले नाही.शैक्षणिक संशोधन क्षेत्रात स्वतःला वाहून घेतलेल्या एका जागतिक ख्यातीच्या शिक्षकाला संशोधन करण्यासाठी संधी देण्या ऐवजी त्यांचे पाय ओढले जात आहे, हा अतिशय निंदाजनक प्रकार आहे.

डीसले गुरुजी एक ग्लोबल टीचर म्हणून नावलौकिक मिळविलेलं एक आगळंवेगळं व्यक्तिमत्त्व.शैक्षणिक क्षेत्रात संपूर्ण भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा उंचावणारं व्यक्तिमत्त्व की ज्याची दखल जगाने घेत त्यांना ग्लोबल टीचर म्हणून त्यांना गौरव केला.भारताच्या दृष्टीने ही अभिमानाची गोष्ट.जेव्हा त्यांना ग्लोबल टीचर म्हणून त्यांचा गौरव झाला तेव्हा भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधानासह संपुर्ण शैक्षणिक वर्तुळात त्यांच्या यशोगाथेचा मोठा गौरव झाला.एवढेच नव्हे तर अनेक शैक्षणिक संस्थांचे ते आयकॉन झाले.ग्लोबल पुरस्कार प्राप्त शिक्षक रणजितसिंह डिसले यांचा गौरव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील केला.

डिसले गुरुजीची जागतिक बँकेने (World Bank) सल्लागार म्हणून नियुक्ती देखील करण्यात आली आहे. जून २०२१ ते जून २०२४ या कालावधीकरिता ही नेमणूक करण्यात आली आहे. जागतिक बॅंकेच्यावतीने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी ग्लोबल कोच नावाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत उपक्रमाला चालना देण्यासाठी ही नियुक्ती महत्वाची मानण्यात येत आहे.

जगभरातील मुलांच्या शैक्षणिक पातळीमध्ये वाढ करण्याच्या हेतूने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमात अधिक एकसूत्रता आणणे, शिक्षकांना कालसुसंगत प्रशिक्षण देणे, प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षकांमधील नेतृत्वगुण विकसित करणे आदी उद्दिष्टे ठरवण्यात आलेली आहेत. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जगभरातील १२ व्यक्तीची सल्लागार म्हणून निवड केली आहे. या समितीच्या माध्यमातून तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम तयार करणाऱ्या २१व्या शतकातील१२ शिक्षकांमध्ये डिसले गुरुजी हे त्यातील एक.

डिसले गुरुजी ग्लोबल टीचर पुरस्कार २०२० चे विजेते आहेत. सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ७ कोटी रुपयांचा हा पुरस्कार मिळाला आहे. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी याची अधिकृत घोषणा केली होती. दरम्यान, या पुरस्काराच्या एकूण रक्कमेपैकी ५० टक्के रक्कम अंतिम फेरीतील ९ शिक्षकांना दिली. यामुळे ९ देशांतील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल, असा त्यांचा मानस आहे.यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

उच्च शिक्षणासाठी
मागितलेली प्रदीर्घ रजा प्रलंबित ठेवण्यात आली आहे. या अशा रजेमुळे मुख्य अध्यापनाच्या कामावर होणाऱ्या परिणामाचे कारण देण्यात आले असून तुमच्या या अवांतर गोष्टींतून परितेवाडी शाळेत तरी काय बदल झाला, योगदान मिळाले याचा आढावा घेतच निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.डिसले यांनी अमेरिकेत जाऊन पीएच. डी करण्यासाठी जि. प. प्राथमिक शिक्षण विभागात गेल्या २१ डिसेंबर रोजी अध्ययन रजेचा अर्ज दिला आहे.मात्र त्यांच्यावर शाळेत सतत गैरवापर राहण्याचा काम न करताच पगार घेतल्याचा ठपका ठेवत त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.. मात्र गुरुजींनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत.ग्लोबल पुरस्काराने कामाची व्याप्ती वाढली, केवळ जिल्हा नव्हे तर राज्यभर मार्गदर्शन करण्याची जबाबदारी पार पाडली ,असे प्रत्युत्तरादाखल त्यांनी स्पष्ट केले.

राज्यभर मार्गदर्शन करण्याच्या कार्यात डीसले गुरुजींचे शाळेकडे दुर्लक्ष झाले असले तरी त्यांच्या कार्याचे महत्व नाकारता येत नाही.आज खरी गरज आहे शिक्षण क्षेत्रात क्रांति करण्याची,नवनवीन संशोधन करण्याची.नवनवीन तंत्रज्ञांचा शिक्षणात वापर करण्याची.हे सर्व डीसले गुरुजी करत असताना केवळ आकसापोटी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांच्या संशोधन कार्यात अडथळे अनु नये,हीच अपेक्षा..राज्याचे मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री यांनी गुरुजींच्या व्यथेची अडचण लक्षात घेऊन त्यांना मदत करायला पाहिजे..

जगातील सर्वोत्तम ५० शिक्षकांच्या यादीमध्ये जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांचा समावेश झाला आहे. त्यानिमित्त त्यांना १०लाख अमेरिकन डॉलर्सचा पुरस्कारही जाहीर झाला आहे. अशाप्रकारचा पुरस्कार मिळविणारे डिसले हे जिल्हा परिषदेचे एकमेव गुरुजी आहेत.

लेट्‌स क्रॉस द बॉर्डर या अभिनव शैक्षणिक प्रयोगाच्या माध्यमातून भारत, पाकिस्तान, इराक, इराण, इस्राईल, पॅलेस्टाईन, अमेरिका व उत्तर कोरिया या जगातील सर्वांत अशांत देशांतील ५० हजार मुलांची पीस आर्मी तयार करून परस्पर सौहार्दाचे वातावरण करण्याच्या या शैक्षणिक प्रयोगाकरिता त्यांची निवड केली आहे. तंत्रस्नेही शिक्षणाच्या माध्यमातून शांतता निर्माण करण्याचा हा प्रयत्न इतर देशांतील शिक्षकांसाठी प्रेरणादायी आहे अशा शब्दात निवड समितीने त्यांचा गौरव केला आहे. जिल्हा परिषदेच्या परितेवाडीच्या शाळेत मागील ११ वर्षांपासून कार्यरत असणारे डिसले गुरुजी हे तंत्रज्ञानातील अभिनव प्रयोगांमुळे जगभर ओळखले जातात. डिसले गुरुजींनी तयार केलेली QR कोडेड पुस्तके आज ११ देशांतील १० कोटींहून अधिक मुले वापरत आहेत. व्हर्च्युअल फिल्ड ट्रीप या आगळ्यावेगळ्या अध्यापन पद्धतीच्या माध्यमातून ते १५० हुन अधिक देशांतील शाळांमध्ये विज्ञान विषयाचे अध्यापन करतात. अशा पद्धतीने अध्यापन करणारे ते जगातील सातवे शिक्षक ठरले आहेत. मायक्रोसॉफ्ट, नॅशनल जिऑग्राफिक सोसायटी या आंतरराष्ट्रीय संस्थांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

-प्रा.डॉ.सुधीर अग्रवाल

९५६१५९४३०६

(एस के पोरवाल महाविद्यालय,कामठी, नागपूर)

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button