साहित्य

पहिलं प्रेम,पहिला प्रपोज,आणि कोरोना..

पहिलं प्रेम,पहिला प्रपोज,आणि कोरोना..

-लेखक नितीन चंदनशिवे

कॉलेजला असताना माझी कविता बहरत चालली होती.अनेक काव्यवाचन स्पर्धा जिंकत चाललो होतो.ओढ होती ती सरस्वती विद्या मंदिर मध्ये “केशवसुत करंडक”ची.आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय स्पर्धा असायची ती.आजही ती दरवर्षी घेतली जाते. अखेर तो दिवस उगवला.मी त्या ठिकाणी पोहचलो.पुण्यातच बॅचलर राहायचो मी तेव्हा.हातगाडीवर भाजीपाला विकत होतो आणि कॉलेज करत होतो.पांढरी पॅन्ट पांढरा फुल्ल शर्ट आणि खांद्यावर कायम रुमाल.भाजीवाला असाच असायचा पुण्यातला.मी स्वतःला कॉलेजकुमार कमी आणि भाजीवाला म्हणून जास्त मिरवत असल्यामुळे मी माझा तो कपडे वापरण्याचा नाद काही सोडला नव्हता.सकाळी कोथंबीर विकल्यामुळे हाताचा कोथंबरीचा वास तसाच दरवळत होता.
जिथं नावनोंदणी सुरू होती तिथं गेलो आणि तिथंच पहिल्यांदा आयुष्यात काळीज घायाळ झालं.नाव होतं केतकी.पिवळ्या साडीवर काळा कोट,केसात गजरा,ओठाच्या डाव्या बाजूला किंचित थोडंसं वरच्या बाजूला तो तीळ.ओठावर एक मंद हास्य.तेवढ्या गर्दीत एकटक नजर काही केल्या हलत नव्हती.अंग गरम झालं होतं.नुकतंच कुणीतरी कानाखाली वाजवून गेलंय की काय अस कानाजवळ गरम वाटत होतं.ते डोळे,तो गोरा रंग आणि तिचं ते नाजूक हसून बोलणं.बघतच राहिलो होतो.तेवढतात धनंजय माझा मित्र त्याने गर्दीत मला ओळखून जवळ आला सवयीप्रमाणे खांद्यावर हात ठेवून ओ चंदनशिवे आज नेणार करंडक असं मोठ्याने बोलला.तेव्हा तिथं उपस्थित असलेल्यांच्या सगळ्यांच्या नजरा माझ्यावर येऊन थांबल्या.आणि त्यातलीच एक नजर तिची माझ्या चेहऱ्यावर.मला पाहताक्षणी का कुणास ठाऊक पण गचकन हसली.आणि ओय शुक शुक असा आवाज करून हातानेच मला टेबलाजवळ येण्याचा इशारा केला.तिच्या बाजूला बसलेल्या तिच्या मैत्रिणी खळखळून हसल्या.मी खांद्यावरचा रुमाल हातात घेतला आणि तोंड पुसत जवळ गेलो.ती म्हणाली स्पर्धेला आलाय का?मी हो म्हणलं त्यावर तिची एक मैत्रीण म्हणाली होय का.?आम्हाला वाटलं चहा वाला आलाय की काय.?मी माझ्याच अंगाकडे आणि अंगातल्या कपड्यावर नजर टाकत मान खाली घालून माझं नाव सांगून नावनोंदणी केली.आणि कुणालाच काही न बोलता तिने दिलेल्या नंबरची पावती घडी घालून खिशात ठेवली आणि आत हॉल मध्ये जाऊन मागच्या रांगेत बसलो.
उदघाटन समारंभ सुरू झाला.तर याच मॅडम सूत्रसंचालिका होत्या.मला थोडंस कसेतरीच वाटू लागलं कारण स्पर्धा सुरू झाल्यानंतर ही माझं नाव हसतच घेणार आणि आपला अपमान केल्यागत वागवणार मी गावठी आहे हे ती तिच्या बोलण्यातून सिद्ध करणार हे जाणवत होतं.परीक्षकांनी सूचना दिल्या आणि स्पर्धेला सुरवात झाली.बक्षीस वितरण कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या हस्ते होणार होतं.बक्षिसाची रक्कम पाच हजार होती.जवळ जवळ 42 स्पर्धक झाल्यानंतर माझं नाव तिने त्याच पद्धतीने पुकारलं जे मी आधीच गृहीत धरलं होतं.मी ढेकळातून आलेला माणूस आहे याचा अभिमान वाटला आणि मी तिच्या डोळ्यात रागाने बघतच स्टेजवर गेलो.त्यावेळी तिने थोडीशी मान खाली घातली.अहो तिथला प्रत्येक क्षण जसाच्या तसा आजही आठवतो.कारण पहिल्यांदा तिथं काळीज घायाळ झालं होतं.
माईकजवळ उभा राहिलो.आवाजाचा आणि तोंडाचा व माईकचा अंदाज घेतला.नाव सांगितलं कॉलेजचे नाव सांगितले.आणि अशी जोरदार कविता सादर केली अगदी पोटातून आतड्यातून बाहेर यावी अशी.कविता होती तमाशा.
मी कविता संपल्यावर धन्यवाद म्हणताना आधीची जी नजर होती तिच नजर पुन्हा तिच्यावर रोखली.तसाच तिच्याकडे बघत बघत स्टेजवरून खाली उतरलो.त्यावेळी तिने पूर्ण मान खाली घातली.मला खूप आनंद झाला होता मनातल्या मनात.माझ्यानंतर आणखी दोन स्पर्धक झाल्यानंतर ब्रेक झाला.त्या ब्रेकमध्ये मी फक्त एक टक तिच्याकडेच पाहत होतो तिलाही ते जाणवत होतं.समोसा होता नाश्त्याला.मी घेण्यासाठी पुढे गेलो तेव्हा ती म्हणाली ,
” छान झाली बर का कविता तुमची.” त्यावेळी तिची ती मैत्रीण माझ्याकडे एकटक पाहत होती.तिने तस बोलल्यावर मी खिशात ठेवलेला रुमाल बाहेर काढला त्यावेळीही माझी नजर फक्त तिच्या चेहऱ्यावर होती.जसा माझा रुमाल मी जरा खांद्यावर जरा स्टाईल मध्ये टाकायला गेलो तर हरामी रुमाल खाली पडला.जो आजवर कधीच असा नेम चुकला नव्हता.मला वाटलं आता परत हसणार ही.पण तस झालं नाही उलट ती रुमाल उचलण्यासाठी समोर यायला लागली पण तेवढ्यात मी तो रुमाल उचलला झाडला आणि खांद्यावर हळूच ठेवला.आणि हातात समोसा घेऊन पाठमोरा झालो.आठ दहा पावलं पुढं चालून गेल्यावर आपोआप मान मागे वळली तर मॅडम एकटक पाहत तशाच उभ्या होत्या.
बक्षीस वितरण सुरू झालं.प्रथम क्रमांक अर्थात तमाशा कवितेला मिळाला.म्हणजे मलाच मिळाला.मंगेश पाडगावकरांच्या हाताला स्पर्श झाला.अंगावर काटा आला.कमरेतून थोडा खाली वाकून नमस्कार केला.आभार प्रदर्शन झाल्यानंतर कार्यक्रम संपला.सर्वजण हातात हात देत होते.अभिनंदन करत होते.आणि माझी नजर शोधत होती माझं काळीज घायाळ करणाऱ्या त्या हरिणीला.तर हरिणी माझ्याकडेच तिच्या मैत्रिणीना घेऊन घोळक्यातून येताना दिसली.जवळ उभ्या असलेल्या धनंजय ला हळूच बाजूला करून हातातला केशवसुत करंडक घट्ट पकडत एकटक तिच्याकडे पाहत राहिलो.समोर आली हातात हात देण्यासाठी तिनेच अभिनंदन म्हणत हात पुढं केला.आणि अंग पुन्हा गरम झालं.त्याच गरम वातावरणात गप्पा रंगत गेल्या.आणि तिच्या मैत्रिणींच्या घोळक्यातून मी चालत चालत रस्त्यावर कधी आलो कळलच नाही.ती बोलत होती हसत होती, खिदळत होती. आणि मी एकटक फक्त तिच्याकडे पाहत होतो.आणि आयुष्यात पहिल्यांदा छातीत चमकत होतं.त्यावेळी रिलायन्स चे मोबाईल होते.इंटरनेट नव्हतं.एकमेकांना नंबर दिले गेले.
अकरा नंबरची गाडी आली.मी बसमध्ये चढताना सुद्धा तिच्याकडेच एकटक पाहत राहिलो.तिच्या सर्व मैत्रिणी हात हलवून निरोप देत होत्या आणि ती त्यांच्याकडे पाहत होती.
चार आठ दिवस फोनवर गप्पा झाल्यावर पुण्यातल्या शनिवार वाड्यात रविवारी भेटायचं ठरलं.
अगदी तोच पांढरा शर्ट,पांढरी पॅन्ट, खांद्यावर रुमाल आणि मनाने ठरवलं होतं.आज मनातलं सगळं सांगून मोकळं व्हायचं.हे भाजीपाला विकण्यासारखं सोपं नव्हतं.पण ठरवलं होतं आज डायरेक्ट भिडायचं.मनपाच्या स्टँडवर माझ्या आधी ती येऊन उभी होती.हिरव्या रंगाचा पंजाबी ड्रेस घातल्यामुळे ती अजून खुलून दिसत होती.तिथून चालत शनिवार वाड्यात प्रवेश करताना का कुणास ठाऊक मी स्वतःला बाजीराव आणि तिला मस्तानी समजत होतो.अर्थात मी बाजीराव होण्याच्या लायकीचा नव्हतो पण ती मात्र मस्तानीपेक्षा काकणभर जास्तच होती.
शनिवार वाडा रविवार असल्यामुळे सगळ्या जोडप्यानी बहरून गेला होता.पाखरं अगदी अंगाला अंग चिकटून बसलेली होती.एका जोडप्याने तर दोघांच्या ही तोंडावर स्कार्प ओढून घेतला होता.आणि तिथल्या तिथंच ते आतल्या आत एकमेकांना पाहत होते.आमची दोघांची नजर तिकडेच आणि मी तिला म्हणालो ” स्कार्प नाही आणला का.?” त्यावर ती एकदम कावरी बावरी होऊन माझ्याकडे पाहू लागली.मलाही माझी चूक लक्षात आली आणि दातानेच जीभ चावली.ती म्हणाली मी नाही वापरत तसलं काही.आपण इथं बसूया का म्हणत तिने बसकन मांडली.
दोघांमध्ये जे सामाजिक अंतर असायला हवं तेवढ आम्ही दोघांनीही पाळलं होतं.गप्पा सुरु झाल्या.ती बोलत होती मी एकटक पाहत होतो.अर्धा तास होऊन गेला.दोन चार मुक्तछंद माझेही उधळून झाले होते.मला वेळ घालवायचा नव्हता.मी म्हणलं मला काहीतरी सांगायचं आहे.तेवढ्यात ती म्हणली “भूक लागलीय खूप.”आयुष्यात पहिल्यांदा अस वाटलं की जगातील सगळी मिठाई सगळे पदार्थ असं गाड्याभरुन आणावे आणि तिच्यासमोर हजर करावं आणि शनिवार वाड्याच्या मैदानात उभा राहून जोरात ओरडावं,महाराणी केतकी साहिबा काय खाणार आपण यातलं.?(हे पहिल्या प्रेमात होत असतं.अतिशोयक्ती असते पण सत्य असतं हे.)तिचा चेहरा बघितला भानावर आलो आणि म्हणलं काय खाणार?तर ती वेडी डोळे मिचकावत ओठ आतल्या आत मिठत हळूच म्हणली “पाणीपुरी खाऊया.”? कल्पनेत आलेल्या सगळया मिठाईच्या गाड्या गायब झाल्या आणि रस्त्याच्या पलीकडे एक मडके घेऊन उभा असलेला पाणीपुरी वाला दिसला.मी त्याच्याकडे नजर टाकत मानेने होकार देऊन चालता झालो आणि ती माझ्या मागे मागे चालू लागली.पाणीपुरी खाताना ती इतकी सुंदर दिसत होती की काय बोलावं? त्यादिवसापासून पाणीपुरी हा पदार्थ माझ्यासाठी जगातला नंबर वन पदार्थ झाला तो आजही आहे.
दोन प्लेट दाबून हणल्या तिने.आणि पुन्हा आम्ही त्या जागेवर आलो.ती म्हणाली, नितीन तुम्ही काहितरी सांगणार होता ना ? अस म्हणत ती खाली बसली मी ही बसलो जरा अंतर मी कमीच केलं.पुन्हा तसच अंग गरम झालं.डोळ्यावर अंधारी यायला लागली चक्कर यायला लागली.ती म्हणली बोला ना काय सांगायचंय.आणि माझ्या तोंडातून गेलं मला सख्ख्या चार बहिणी आहेत.मला भाऊ नाहीय.दोन बहिणीचं लग्न झालेले आहे.दोघींचं करायचं आहे.आई वडील आणि आजी आहे.सगळे गावीच असतात मी इकडे एकटाच असतो.काम करतो तसच शिकतो कविता लिहितो.स्पर्धा करतो.दोन जागी बिशी लावलीय.महिन्याला थोडेफार पैसे घरीही पाठवतो.हे सगळं एका दमात बोलून गेलो.अंग अजून गरम झालेलं होतं.डोळे उगाच गच्च भरलेले होते.मी तिच्याकडे एकटक बघतच होतो.आणि ती सगळं अस वेड्यागत माझ्याकडे पाहून ऐकत होती.माझं सगळं बोलून झाल्यावर ती हळूच म्हणली चार बहिणी आहेत दोन जागी बिशी लावलीय.भाजीपाला विकून शिकताय,कविता लिहिताय मग मी यात करू? मला का सांगताय हे सगळं?मी हळूच स्वताला सावरत म्हणलं ह बरोबर आहे.तुम्ही काय करणार नाय का?.अस म्हणत गप्प झालो.खांद्यावरचा रुमाल कधी मांडीवर येऊन पडला होता कळलं नाही.
मनातलं बोलायचं होतंच.आज मोहीम फत्ते करूनच शनिवार वाडा काबीज करूनच जायचंय आणि मस्तानीला जिंकल्याशिवाय हा बाजीराव परत रिकाम्या हाताने जाणार नाही हेच ठरवून आलेला होता.पण बाजीराव चा पार सुकून गेलला वडापाव होत चालला होता.शेवटी एकदम मुठी आवळून हळूच म्हणलं,खूप सुंदर दिसता तुम्ही.त्यावर ती म्हणली हो आहे त्यात काय एवढं.?
ऊस काय चरक्यात नीट फिट्ट बसत नव्हता आणि रस काही बाहेर निघत नव्हता.काय करावं कस बोलावं कळत नव्हतंच.वेळ संपत चालली होती.पुन्हा एकदा तयार झालो.दम लागला होता.बोलायचंच असं ठरवून तोंड उघडलं आणि तोंडातून वाक्य बाहेर गेलं “दोन वर्षांपूर्वी आजोबा वारले माझे.”तिने कपाळावर हात मारला आणि म्हणाली मग काय त्यांना घेऊन यायचं होत का इथं सोबत आज?.दोन वर्षांपूर्वी वारले ना ते?.मग मध्येच काय त्यांचं काढलंय हे.तिचा राग वाढत चालला होता आणि मला बोलता येत नव्हतं.
आता पुन्हा तयारी केली.समोर एक जोडपं बसलेलं होतं हातात हात घेऊन.ते बघितलं आणि तिच्या हातावर हळूच हात ठेवत पुन्हा तोंड बोलण्यासाठी उघडलं आणि तोंडातून वाक्य बाहेर गेलं. “इथं खडकीला मित्रांसोबत राहतो मी.महिन्याला बाराशे रुपये भाडे आहे तिघेजण असतो आम्ही चारशे रुपये द्यावे लागतात मला.”ती तोंडाकडे बघतच राहिली.पण मी तिच्या हातावरचा हात काही बाजूला केला नाही.ती एकटक माझ्या तोंडाकडे केविलवाणी बघत म्हणाली, मग त्या भाड्याच्या रूम मध्ये टीव्ही आहे का ओ?मी लगेच नाही म्हणलं, त्यावर ती म्हणली का?मी म्हणलं नाही बघत टीव्ही मी जास्त.ती माझ्या रिकाम्या खांद्याकडे बघत म्हणाली रूमाल कुठाय इथला.?खाली पाहतो तर तो मांडीवर पडलेला.शेवटी तिनेच रुमाल उचलला आणि माझ्या खांद्यावर अलगद ठेवत म्हणाली, “छान दिसतो हा रुमाल तुम्हाला खांद्यावर.”असं म्हणत हातावर हात दाबतच म्हणाली का एवढं शुद्ध बोलताय, भान हरपल्यागत करताय, त्या तुमच्या गावठी भाषेत बोला की मनातलं तुमच्या.
आणि मी जोराचा श्वास सोडून मोकळा झालो आणि तोंडातून वाक्य बाहेर गेलं,
“तुमी मला लै लै लै म्हंजी लै आवडता.पहिल्यांदा बघितल तवाच सगळं भान हरवलं माझं.तवापासून झोप नाय भूक नाय तहान नाय काय नाय बी नाय.जेवताना पितळीतल्या कालवणात बी तुम्हीच दिसताय.आणि एकदम एकेरीवर येत म्हणालो “केतकी मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आयुष्यभर करत राहीन.”माझं बोलणं झालं होतं तिच्याकडून राहिलेला अर्धा होकार मला हवा होता.अर्धा गड जिंकला होता.आता तिने स्पष्ट बोलावं आणि मी गरम झालेल्या कानाने ऐकावं.तेवढ्यात ती म्हणली “पितळीतलं कालवण ही काय भानगड आहे.?आणि त्यात मी दिसते म्हणजे कशी?मी हसत म्हणलं पितळी म्हणजे जेवणाचं ताट आणि कालवण म्हणजे पातळ भाजी.ते जेवायला बसलो आणि ताटात भाजी ओतली की त्यात ही तूच दिसतेस.मी बोलत होतो आणि ती कपाळावर हात मारत माझ्याकडे बघत म्हणाली, याच रुमालाने गळा आवळू का?मी गप्प झालो.तिने खांद्यावरचा रुमाल हातात घेतला.रुमालाचा एक कोपरा एका हातात दुसरा कोपरा दुसऱ्या हातात तिने तसाच रुमाल माझ्या मानेवर टाकला आणि जोरात हिसका देऊन ओढलं.माझे ओठ एकदम तिच्या ओठाजवळ गेले ती एकदम जवळ आली.फक्त एक मुंगी अंग चोरून जाऊ शकेल एवढंच अंतर आमच्या ओठात राहीलं होतं.नाक लढाई जिंकून तिच्या नाकावर विराजमान झालंच होतं.कान आता तापून तापून जळून धुरच यायचा बाकी होता.छातीत चमक भरली होती. शरीराच्या कोणत्या भागात हृदय असतं हे तेव्हा कळलं होतं.ते आजवर कधीच एवढं धडकलं नव्हतं.आणि माझ्या तोंडातून वाक्य बाहेर गेलं, तू खूप सुंदर आहेस,मी हा असा रंगाने काळा.तू इतकी गोरी.तुझ्या मैत्रिणी काय म्हणतील?तिने काहीच न बोलता अजून एक मंद हिसका दिला.ओठावर ओठ अलगत ठेवले गेले.आणि मी खाली हळूच खिशातली गायछाप बाहेर काढून मागच्या मागे दूर फेकून दिली.ओठांत ओठ मिसळत गेले.
त्यानंतर बरेच उन्हाळे पावसाळे हिवाळे निघून गेले.कधी काळ बहरत गेला कधी मोसम बिघडत गेला.जातीच्या भिंतींवरून आम्हालाही उडी मारून पलीकडे जाता आलं नाही एका वळणावर थांबावं लागलं.
आज तब्बल आठ वर्षांनंतर या कोरोनाच्या वातावरणात सगळं जग लॉकडाऊन असताना तिला माझी आठवण आली आणि जणू काय सगळंच संपणार की काय?त्यात मी ही हरवून जाणार की काय?काहीच राहणार नाहीय का? अशाच भितीने तिने आज फोन केला.तिचा आवाज ऐकला आणि डोळे वाहते झाले.फोन ठेवताना तिला एवढंच म्हणालो,”केतकी काहीही होणार नाहीय आपण सगळे यातून सुखरूप बाहेर पडणार आहोत.आपणच जिंकणार आहोत तू काळजी करू नकोस.स्वताची काळजी घे.”फोन ठेवताना हुंदका देताना तिच्या नवऱ्याने तिला जोरात वैतागून दिलेली हाक मला स्पष्ट ऐकू आली.आणि केतकी खूप बारीक आवाजात म्हणाली,नितीन या लॉकडाऊनच्या काळात या जाती आणि धर्माच्या भिंती सगळ्या उध्वस्त होऊन फक्त माणूस जिवंत राहिला पाहिजे रे.असं म्हणत तिने फोन कट केला.जोरात हुंदका दाटून आला.मी खिडकीजवळ आलो बाहेर बघितलं तर पाखरांशिवाय दुसरं काहीच दिसत नव्हतं.

लेखक – नितीन चंदनशिवे.
मु.पो.कवठेमहांकाळ.
जि.सांगली
मोबाईल :- 7020909521.
(आपण आपल्या प्रतिक्रिया व्हाट्सपअप वर जरूर कळवू शकता.)

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button