अंधश्रद्धा पळायलाच हव्यात!
अंधश्रद्धा पळायलाच हव्यात!
भूत……पुर्वीचे लोकं भूताला फार घाबरत असत. भूत ही संकल्पनाच घाबरविणारी होती. भूत कुठेही असू शकते असं लोकांना वाटत असे.
ज्याप्रमाणे गावात भूतांना मानत असत. त्याचप्रमाणे गावात ही भूतं काढणा-या मांत्रीकांनाही मानत असत. हे मांत्रीक आपल्या मंत्र आणि तंत्रविद्येच्या सहाय्याने लोकांच्या अंगातील भूतं काढत असत. त्याचप्रमाणे लोकांच्या मनात भूताविषयीच्या संकल्पना भरत असत.
भूत असणे वा दिसणे ह्या संकल्पना खोट्या होत्या. त्या अंधश्रद्धा होत्या. तरीही त्या अंधश्रद्धांना खतपाणी घालण्याचे काम हे मांत्रीकच करीत असत. कारण यात त्यांचा फायदा होता. समजा कुणाच्याही घरी भूत लागलाच तर तो काढत असतांना हे मांत्रीक तो भूत काढण्यासाठी मोबदला म्हणून काही धान्य घेत. तर काही कोंबडा, बकरा तर काही भरजरी वस्र घेत.
भूतं ही सर्वत्र असतात असा कयास होता. जास्तीत जास्त प्रमाणात भूतं वडाच्या झाडावर, पिंपळ, आंबा, बोर, उंबर आणि चिंचेच्या झाडावर असतात. असं मानत असत. तसेच कडूनिंबाच्या झाडापासून कोसो दूर असतात असा कयास होता लोकांचा. समजा एखाद्याला भूतबाधा झालीच तर त्याला कडूनिंबाची पानं चारत असत. त्या कडूनिंबाची पानं खाताच भूत चर्रदिशी पळतो असा समज लोकांचा होता.
कडूनिंब………कडूनिंबाची पानं ही फारच कडू असतात हे सर्वांना माहित आहे. ते पान सर्वच लोकं खात नाहीत. ती पानं खाताच काहींना उलट्याही होतात. तशाच उलट्या त्यावेळीही व्हायच्या. त्यावेळी मांत्रीक म्हणायचा. ‘बघा, आता भूत निघत आहे.’
भूत अंगात भरणे वा भूत अंगात येणे ह्या निव्वळ थोतांड संकल्पना होत्या. तरीही लोकांना त्यातील सत्य माहित नसल्यानं व काही लोकं त्यावर विश्वास ठेवत असल्यानं आजही त्या संकल्पना चालीरीतीनुसार अजूनही चालत आहे. आजही काही भागात, जे भाग शिक्षणापासून वंचित आहेत. तिथे भूत असणे, भूतबाधा होणे ह्या गोष्टी नित्य घडत आहेत. तसेच त्यावर उपाय करणारे मांत्रीक त्यांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेवून त्यांना फसवत आहेत. कधीकधी तर गुप्त धन काढून देतो असे म्हणत त्या गुप्त धनासाठी लोकांच्या लेकराचा जीव घेणारेही मांत्रीक या जगात आहेत. एवढंच नाही तर मुलाला वंशाचा दिवा समजून मुलीला त्या दगडाच्या देवासमोर बळी देणारे महाभाग या जगात काही कमी नाहीत.
आज देश वैज्ञानिक क्षेत्रात उच्चपदी पोहोचलेला असून या उच्च पदस्थ झालेल्या गोष्टीही आज अशा लोकांना समजत नाही की काय, अशी शंका येते. ज्या चंद्र सुर्याला येथील माणूस देव मानायचा. ते चंद्र सूर्य देव नाहीत. हे विज्ञानानच सिद्ध केलं. तरीही आमचा आजचा समाज या विज्ञानाला देव न मानता अंधश्रद्धेवर विश्वास ठेवून अंधश्रद्धेचे बळी ठरतात.
जे वडाचं पिंपळाचं झाड सर्वात जास्त प्रमाणात ऑक्सीजन देतं. त्याच वडाच्या झाडावर व पिंपळाच्या झाडावर भूतं असतात म्हणून लोकांना ऑक्सीजनपासून वंचित करणारे मांत्रीक किती हूशार असावेत याची कल्पना आपण करायला हवी. तसेच जर आपल्या शरीरात ऑक्सीजन गेला नाही. शुद्ध ऑक्सीजन गेला नाही, तर कोणकोणते आजार पसरतात? ह्याचाही विचार आपण करायला हवा. परंतू आपण आपली बुद्धी त्या प्रमाणात लावत नाही. जिथे बुद्धी लावायची. तिथे बुद्धी गहाण टाकतो आणि जिथे नाही लावायची. तिथे फुकटच लावतो. ज्या मांत्रीकाला आपण हुसकून लावायला हवे. त्या मांत्रीकाला आपण जवळ करतो आणि ज्या वड, पिंपळाच्या झाडात जावे, खेळावे, शुद्ध ऑक्सीजन घ्यावा. त्याच्या दूर जातो. हीच वास्तविकता आहे. ही वास्तविकता मनामनात भरली आहे लोकांच्या. आजही लोकं अशा अंधश्रद्धेपासून दूर जात नाही. तरीही शिक्षण घराघरातील अंधश्रद्धापण दूर करीत आहे.
जिथे शिक्षण आहे. तिथे अंधविश्वासाला थारा नाही असं आपण म्हणतो आणि मानतोही. परंतू हे खरं आहे का? याबाबतीत मागे वळून पाहिल्यास बरेचशी शिकलेली मंडळीही अंधश्रद्धा पाळतांना दिसतात. त्यांना अंधश्रद्धा का पाळतो आपण ते कळायला मार्ग नाही. ज्या शरीराला आपल्या मनुष्ययोनीमध्ये आपला स्वतःचा जीव वाचवता येत नाही. ते शरीर संपल्यावर व त्याचं प्रेत बनल्यावर, खरंच ते प्रेत देव कसं होणार! हं, एक आत्मीयता असते आपल्याला त्या शरीराबाबत. म्हणून त्या आत्मीयतेमुळे त्या शरीराला मानणं ठीक आहे. परंतू त्या शरीराकडे, ते शरीर संपल्यावर आपण आत्मीयतेच्या दृष्टिकोणातून न पाहता आपण केवळ श्रद्धेच्या दृष्टीनं पाहतो हे बरे नाही. कारण आत्मा, परमात्मा या जगात नाहीत. हे आपलेच काही तत्ववेत्ते सांगून गेलेत.
विशेष सांगायचं झाल्यास आत्मा, परमात्मा या जगात नाहीत. भूतंही नाहीत आणि देवंही नाहीत. देव असेलही कदाचित या जगात. परंतू तो जीवंत माणसात असेल. मृत शरीरात वा दगडधोंड्यात अजिबात नसेल. खरा देव तिथेच दिसेल. जिथे अंधश्रद्धेला खतपाणी मिळत नसेल. तसेच जिथे रंजल्यागांजल्यांची सेवा होत असेल.
आज अंधश्रद्धा कोणीही पाळू नये. मांत्रीकांवर विश्वास ठेवू नये. वडाच्या, पिंपळाच्या झाडात भूतं असतात असंही कोणी मानू नये. तसेच मृत शरीरात भूत असतात वा मृत शरीर देव बनतो असंही कोणी मानू नये.
मेलेलं शरीर हे जीवंत असतांनाच कोणाच्या कामात येत नसेल, तर तेच शरीर मृत झाल्यावर कोणाच्या कामात येणार. ज्या शरीराला जीवंतपणीच कोणाची सेवा करणं जमलं नाही. तेच शरीर मृत झाल्यावर कोणाची सेवा कशी करु शकणार. हे सत्य आहे. असे असतांना कितपत अंधश्रद्धा पाळाव्यात हे आपण आपल्याच स्वतःशी ठरवायला हवं. भूतबाधा, भूत पिशाच्च ह्या गोष्टी थोतांड असून याबाबतीतील अंधश्रद्धा आपण सोडायला हव्यात. त्या पाळू नये. जेणेकरुन नवीन पिढी तरी अंधविश्वास बाळगणार नाही व देश विकासाच्या क्षेत्रात आघाडीवर जाईल हे तेवढंच खरं आहे.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०