संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारा अलौकिक स्वर हरपला..
संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारा अलौकिक स्वर हरपला
दैवी आवाज अशा शब्दांत ज्यांच्या गायकीचं वर्णन केल्या जातं, त्या देशाच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांचे वार्धक्यानं निधन झाले आहे. त्या 92 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच देशावर शोककळा पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून लतादीदी यांना आजारी असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करायलाही सांगितलं होतं. अखेर रविवार सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली आहे. लता मंगेशकर यांना कोरोनासोबतच न्यूमोनियाची देखील लागण झाली होती. कोरोनातून त्या ब-या देखील झाल्या होत्या. पण न्युमोनियाची लागण झालेली असल्यानं त्यांच्यावर मुंबईमधील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते.
लता मंगेशकर यांचा जन्म मध्य प्रदेशच्या इंदोर शहरात 28 सप्टेंबर 1929 मध्ये झाला. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक तसेच नाट्यकलावंत होते. लता मंगेशकर या सर्वात ज्येष्ठ अपत्य होत्या. आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ ही त्यांची लहान भावंडे आहेत. लता मंगेशकर यांनी पहिली मंगळागौर या चित्रपटासाठी प्रथम पार्श्वगायन केले. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक होत्या. हिंदी संगीतविश्वात त्यांना ‘लता दीदी’ म्हणून ओळखले जायचे. लता मंगेशकरांच्या कारकिर्दीची सुरुवात 1942 मध्ये झाली आणि ती कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून आहे. त्यांनी 980 पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली आहे.
लता मंगेशकर या ‘भारतरत्न’ पुरस्कार प्राप्त करणा-या भारतातील एम एस सुब्बलक्ष्मी नंतर दुस-या महिला कलाकार आहेत. संगित क्षेत्रातील देदीप्यमान कामगिरीबद्दल हा पुरस्कार त्यांना 2001 साली मिळाला होता. तसेच पद्मविभूषण, पद्मभूषण, महाराष्ट्र भूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार यासह असंख्य पुरस्कारांनी गौरविण्यात आलं होतं. 1992 मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने लता मंगेशकर यांच्या नावाने लता मंगेशकर पुरस्कार नावानेही पुरस्काराची सुरुवात केली. तर मध्य प्रदेश सरकारनेही 1984 सालापासून लता मंगेशकर पुरस्कार देण्याची परंपरा सुरु केली. जी अविरत सुरू आहे. लता मंगेशकर हे नाव ‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये 1974 ते 1991 च्या कालावधीत सर्वात जास्त ध्वनिमुद्रणांच्या उच्चांकासाठी नोंदले गेले आहे. संगीत क्षेत्रातील वेगवेगळे विक्रम लता मंगेशकर यांच्या नावावर नोंदले गेले आहे. त्यात सर्वाधिक चित्रपटांमध्ये गायन, सर्वाधिक गाण्यांचे गायन, वेगवेगळ्या भाषांमध्ये गायन अशा प्रकारचे ते विक्रम आहेत. लता मंगेशकरांचे कुटुंब संगीतासाठी प्रसिद्ध असून, सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते.
‘थांबला असला श्वास तरी सूर राहील सदा सोबतीला…’ जो सूर ऐकत देशाच्या अनेक पिढ्यांना गाणं म्हणजे काय हे कळलं. संगीत विश्वातील मातब्बर मंडळी ज्या सुरांना ‘ईश्वाराचं देणं’ मानत वंदन करतात अशा भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा स्वर हरपला. देशासह जगभरातील श्रोत्यांच्या जगण्याला अमृतसंजीवनी देत आलेला स्वर्गीय सूर हरपल्यानं आज संपूर्ण देश शोकाकूल झाला आहे. जवळजवळ सहा दशकांच्या प्रदीर्घ आणि देदीप्यमान कारकीर्दीत दीदींनी जितक्या संगीतप्रेमींना मग तो सर्वसामान्य श्रोता असो किंवा दर्दी ज्या प्रमाणात आनंद दिला आहे, तितका आनंद देशाच्या पॉप्युलर कल्चरच्या इतिहासात कुठल्याही इतर कलाकाराने दिलेला नाही. आकाशात देव आहे का असं कुणी विचारलं तर देवाचं माहित नाही. पण आकाशात सुर्य आहे, चंद्र आहे आणि लताचा दीदींचा स्वर आहे! दिवस-रात्र अशी कुठलीही वेळ नाही किंवा क्षण नाही की लता दीदींचा स्वर या जगात कुठून तरी कुठेतरी जात येत असतो, अशा शब्दांत पु.ल.देशपांडे यांनी लतादीदींच्या महतीचं वर्णन केलं होतं.
दयाळू आणि काळजी घेणा-या लता दीदी आपल्याला सोडून निघून गेल्या. त्या आपल्या देशात एक पोकळी सोडून गेल्या आहेत, जी भरली जाऊ शकत नाही. येणा-या पिढ्या त्यांना भारतीय संस्कृतीतील एक महनीय व्यक्ती म्हणून नेहमीच स्मरणात ठेवतील. त्यांच्या मधूर आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याचे अद्वितीय सामर्थ्य होते. हृदय आणि मन यांपासून देवाने आवाज सारख्याच अंतरावर ठेवला आहे असं म्हणतात. कोणतीही महान गायकी ही भावना आणि तंत्र या घटकांचा समन्वय असते. लता दीदींच्या आवाजात या दोन्ही घटकांचा अप्रतिम संगम झाला होता. लता दीदींची प्रतिभा ब-याच प्रमाणात निसर्गदत्त असली तरी त्यात उत्कट संगीतसाधना आणि कुशाग्र बुद्धिमत्ता यांचा खूप मोठा सहभाग होता.
जोपर्यंत भारतीयांच्या मनात धर्मप्रेम व देशप्रेम जागं आहे तोपर्यंत प्रत्येक गणेशोत्सवात, शिवजयंतीला, स्वातंत्र्य व प्रजासत्ताकदिनी लतादीदींची गाणी ऐकू येत राहतील. कबीर, मीरा व सूरदासांच्या भजनांतून, ग़ालिबच्या गजलांतून, ‘शिवकल्याण राजा’तल्या गाण्यांतून, ज्ञानदेवांच्या पसायदानातून आणि तुकोबांच्या अभंगांतून त्यांचा आवाज मनामनांत कायमचा साठवून ठेवला जाणार आहे. लता दीदींच्या आयुष्याचा प्रवास जरी आज थांबला असला तरी दैवी सूरांमधून व सुमधुर आवाजातून भारतीयांच्या अंतकरणात दीदींनी लावलेला स्नेहदीप सदैव चैतन्यानं युक्त राहील. लता मंगेशकर यांचे निधन हे देशाचे मोठे नुकसान आहे. त्यांचे संगीत अनेक पिढ्यांना स्मरणात राहील.
अनेक दशकं भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आपल्या अनेक दशकांच्या कारकिर्दीत अनेक टप्पे गाठले असले तरी त्यांच्या मनात एका गोष्टीची खंत कायम राहिली. पूर्णवेळ शास्त्रीय संगीत करता आलं नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली होती. लता मंगेशकर यांनी एका मुलाखतीत ही बाब सांगितली होती. लता मंगेशकर यांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे प्रसिद्ध गायक, संगीकार होते. लता मंगेशकर यांनी गायनाचे धडे वडिलांकडून गिरवले होते. लता मंगेशकर यांना आपल्या संगीत कारकिर्दीत तीन-चार गुरु लाभले होते. मास्टर दिनानाथ मंगेशकर हे त्यांचे पहिले गुरु होते. त्यानंतर अमान अली खाँ भेंडीबाजारवाले, अमानत खाँ देवासवाले यांच्याकडे लता मंगेशकर यांनी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले. त्याशिवाय, बडे गुलाम अली खाँ साहेबांच्या एका शिष्याकडेही लता मंगेशकर शास्त्रीय संगीत शिकले.
लता मंगेशकर यांचे शास्त्रीय संगीतावर प्रेम होते. मात्र, लहान वयात आलेल्या कौटुंबिक जबाबदारीमुळे लता मंगेशकर यांना पूर्णवेळ शास्त्रीय गायन करता आलं नाही. लता मंगेशकर यांनी एका मुलाखतीत सांगितले की, पुनर्जन्म मिळाला तर मला शास्त्रीय संगीत गायला अधिक आवडेल. या जन्मात ही इच्छा अपूर्ण राहिली होती. कौटुंबिक जबाबदारींमुळे पार्श्वगायनातून बाहेर पडण्याचा विचार करू शकत नव्हते. शास्त्रीय संगीतासाठी वेळ देणे अशक्य होते. त्यामुळे माझ्या आवडीला नाईलाजाने मुरड घालावी लागली असे लता मंगेशकर यांनी म्हटले.
वयाच्या पाचव्या वर्षी लता मंगेशकर यांना पहिल्यांदा नाटकात काम करण्याची संधी मिळाली. त्यांची सुरुवात अभिनयापासून झाली असली, तरी त्यांची आवड फक्त संगीतात होती. 1942 मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यावेळी त्या फक्त 13 वर्षांच्या होत्या. नवयुग फिल्म कंपनीचे मालक आणि त्यांच्या वडिलांचे मित्र मास्टर विनायक दामोदर कर्नाटकी यांनी त्यांच्या कुटुंबाची काळजी घेतली आणि लता मंगेशकर यांना गायिका आणि अभिनेत्री बनण्यास मदत केली.
लता मंगेशकर यांच्या मृत्यूनंतर दोन दिवस राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. हा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करताना त्या व्यक्तीचे सामाजिक क्षेत्रातील कर्तृत्व आणि योगदान लक्षात घेऊन सरकार याविषयी निर्णय घेत असतं. त्यामुळेच लता मंगेशकर यांच्या मृत्यूनंतर दोन दिवस राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला असून राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकावला जाणार आहे. लता दीदींच्या अतुलनीय कर्तृत्वाला प्रणाम करत त्यांच्या आत्म्याला शांती लाभो या प्रार्थनासह भावपूर्ण श्रद्धांजली..!
शब्दस्पर्शी- सुनील शिरपुरे
कमळवेल्ली, यवतमाळ
भ्रमणध्वनी-7057185479