माता रमाईचे महिला मंडळातील पहिले भाषण

माता रमाईचे महिला मंडळातील पहिले भाषण
दिवस उजाडला. मोठ्या उत्साहात जोमात आज रमाआई समाजात प्रथमच भाषण करणार होत्या. त्यांनी सर्व घरकाम लवकर आटोपले. संध्याकाळ झाली. तेवढ्यात महिला मंडळातील दोन महिला कार्यकर्त्या रमाईंना नियुक्त सभा मंडपाकडे घेऊन जाण्यासाठी आल्या. देवाच्या, मामजींच्या (रामजीबाबांच्या) व पतिदेवाच्या प्रतिमेला नमस्कार करुन रमाई भाषणाला निघाल्या. त्यांनी बोलण्याची चांगली तयारी केली होती. रमाईंनी भाषणाला सुरुवात केली.
“माझ्या प्रिय माता आणि भगिनींनो! आज मी प्रथमच सभेत बोलायला उभी आहे. तेव्हा बोलताना काही चुकलं माकलं तर सांभाळून घ्या. आपण व्यवहारात नित्य पाहतो की, पतीने ज्या कार्याची धुरा आपल्या खांद्यावर घेतलेली असते, त्याच धुरेला सहधर्मचारिणी म्हणून पत्नीनंसुद्धा खांदा लावायचा असतो. तसाच काहीसा प्रकार आज माझ्या बाबतीत घडला आहे असं मला वाटतं. (जनसमुदायात टाळ्यांचा कडकडात होतो)
माझ्यासारख्या विवाहित स्त्रीला पतीसेवेशिवाय या जगात दुसरं काही आपलं सेवाकर्तव्य आहे, याची जाणीव
या क्षणापर्यंत तरी मला नव्हती. पण आज अशी भव्य मंचावर उभी राहून, एवढ्या मोठ्या जनसमुदायाकडे पाहताना,
मला वाटू लागलयं शहाणे करूनी सोडावे सकलजन!…..
(श्रोत्यांमधून उत्स्फूर्त टाळ्यांचा प्रचंड गजर व घोषणा… ‘मातोश्री रमाबाईसाहेब आंबेडकर की जय!’)
‘माझा असा जयजयकार करु नका. हो, अजून मी तुमच्याविषयी कसलचं कर्तव्य केलं नाही. त्याची आता मला लाज वाटते. असो. आपल्या साऱ्यांचे पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाटते की, आम्ही स्त्रियांनी असं पुढं आलं पाहिजे. समाजाच्या या क्रांती चळवळीत, वर उठण्याच्या धडपडीत आम्ही स्त्रियांनी भाग घेतला पाहिजे. कारण, स्त्रिया एकनिष्ठ असतात. कोणत्याही चळवळीला स्त्रियांचा सहभाग पाहिजे. त्याशिवाय चळवळीचं दल पुढे सरकत नाही. छावणी हालत नाही.
(श्रोत्यांमधून परत टाळ्यांचा एकच कडकडाट….)
जगातल्या क्रांतीचळवळी कशावर चालतात? त्यागावर… पडेल त्या त्यागावर…. अशा चळवळीच्या लोकांना कसल्याही अग्निदिव्यातून जावं लागतं, त्याशिवाय इच्छित श्रेयाचं सुवर्ण त्यांच्या हाती लागत नाही. यासंबंधी एकदा मला डॉ. आंबेडकरांनी सांगितलेली गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे. ग्रीक पुराणातील ही गोष्ट आहे.
डिमेटर नावाची एक देवता, मनुष्यरूप धारण करून पृथ्वीतलावर उतरली. तिला इथल्या एका राणीनं आपलं तान्हं मूल सांभाळण्यासाठी आपल्या राजवाड्यात नोकरीस ठेवलं. राणीच्या त्या लहान मुलाला ‘देव’ बनवावं, अशी त्या देवतेला इच्छा झाली. म्हणून ती रोज रात्री सारी मंडळी झोपली की सारी दारे-खिडक्या बंद करी. त्या मुलाला पाळण्यातून बाहेर काढी आणि त्याचे अंगावरील कपडे उतरवून, ती देवी त्याला जळत्या निखाऱ्यावर ठेवी. हळूहळू निखाऱ्यांची धग सहन करण्याचे सामर्थ्य त्या मुलामध्ये उत्पन्न होऊ लागले. त्याचे बळ वाढू लागले. त्याच्यामध्ये अत्यंत तेजस्वी असा दैवी अंश विकसित होऊ लागला. पण एका रात्री त्या मुलाची आई एकाएकी त्या खोलीत शिरली. तिच्या दृष्टीस तो सारा प्रकार पडताच, ती भयंकर संतापली. तिनं आपलं मूल चटकन् निखाऱ्यावरुन उचललं. अर्थात राणीला तिचं ते मूल मिळालं. पण त्या मुलाचा सामर्थ्यशाली ‘देव’ जो होणार होता. त्या देवाला मात्र ती मुकली !….
ही गोष्ट सांगायचं तात्पर्य एवढचं की, असं विस्तवातून गेल्याशिवाय देवपणा येत नाही. अग्नी हा माणसाला शुद्ध करतो आणि त्याचं बळ वाढवितो. म्हणून अस्पृश्य माणसाला हालअपेष्टांच्या आणि त्यागाच्या अग्नीदिव्यातून गेल्याशिवाय, त्यांचा उद्धार होणार नाही. तुम्ही स्वतःला अस्पृश्य-हीन मानू नका. घरी स्वच्छता ठेवा. तुमच्या मुलींना शिक्षण द्या. ‘पुत्र व्हावा ऐसा गुंडा! त्याचा तिन्ही लोकी झेंडा…’ अशी इच्छा मनात धरुन यापुढं आपली मुलं-मुली घडवायला शिका. त्यात आपला उद्धार आहे. एवढं बोलून मी माझं हे वाढलेलं भाषण पुरं करते.”
(टाळ्यांचा प्रचंप गजर झाला. मातोश्री रमाबाई आंबेडकर की जय!)
साभार:
संकलन-संपादन
राजरत्न ठोसर
विनिमय प्रकाशन ,मुंबई