स्प्रुट लेखन

संत रविदासांचा अपमान सहन केला जाणार नाही..

संत रविदासांचा अपमान सहन केला जाणार नाही…

 

 

संत रविदास…….चर्मकार समाजाचे आराध्य दैवत म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण आज संपूर्ण भारतातील चर्मकार समाज संत रविदासालाच मानत असतो. इतरांना नाही. तसं पाहिल्यास संत रविदासाच्या चारशे वर्षापुर्वीही एक असा संत होवून गेला की ज्यानं त्या संबंधीत काळात आपल्या मुलाचा विवाह सनातन धर्माच्या मुलीशी लावला. त्या मुलाचं नाव होतं शिलवंत व त्या संताचं नाव होतं हरळ्या.
संत रविदास. चर्मकार समाजाचे आराध्य दैवत असलेल्या संत रविदासाचा अपमान आम्ही सहन करणार नाही म्हणत चर्मकार समाजाने संत रविदासाचे तुघलकाबाद येथील मंदीर पाडल्याप्रसंगी जनआंदोलन छेडले होते नव्हे तर त्यांचा मोर्चाही औरंगाबाद इथे होता. हा मोर्चा अधिकारी आयुक्त कार्यालयावर असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अभिवादन करुन निघणार होता. हा मोर्चा त्यावेळी दि १६ सप्टेंबरला होता. हा मोर्चा म्हणजे चर्मकार समाजाच्या अस्मितेचा प्रश्न होता. त्यामुळे संत रविदास कोण होते? त्यांनी कोणतं कार्य केलं? त्यांच्यासाठी संपूर्ण चर्मकार समाज का भडकला? हे आधी जाणून घेणे गरजेचे आहे.
संत रविदास हे चर्मकार बांधवांचं आराध्य दैवत. त्यांचा जन्म वाराणसी इथे झाला. संत रविदासाच्या आजोबाचे नाव कालूरामजी दास तर आजीचे नाव लखपती देवी होते. वडीलाचे नाव संतोषदास आणि आईचे नाव कलसीदेवी असून त्यांच्यावर त्यांच्या आजोबांच्या कार्याचा प्रभाव होता. त्यांच्या पत्नीचे नाव लोनादेवी मुलाचे विजयदास होते. ते पाच वर्षाचे होते, तेव्हा त्यांची आई मरण पावली.
दास अर्थात सेवक. चांभार समाज पुर्वीपासूनच सेवेचं कार्य करीत असल्यानं ते आपल्या नावासमोर दास लावत. त्यांचा जन्म बनारसमध्ये सीर गोवर्धनपूर नावाच्या गावात विक्रमी कालगणनेनुसार १३३७ तर मराठी कालगणेनुसार १५ माघ १४३३ ला झाला. महत्वाचं म्हणजे दुःखी माणसांच्या कल्याणासाठी संत रविदास प्रगटले असेही संकेत आहेत. केवळ हिंदूनेच नाही तर मुस्लीमांसह सर्व धर्मीयांनी त्यांच्या चरणी नतमस्तक व्हावं एवढं त्यांचं कार्य आहे. सद्गुरु कबीर यांनादेखील त्यांना आदराचे स्थान दिले नव्हे तर त्यांनी रचलेल्या कवनांना डेरा नामक व्यक्तीने हिंन्दी तसेच पंजाबी तसेच इंग्रजी भाषेत ध्वनीबद्ध करुन भाषांतरही केले आहे. संत रविदासाचे कार्य पाहून महम्मद तुघलकाने दिल्ली येथील काही जागा त्यांना दान दिली होती. तिथे त्यांचे स्मारक बांधल्या गेले होते. ते आजपर्यंत अस्तित्वात होते. आता मात्र पाडण्यात आले आहे. ते भव्यदिव्य बांधण्यात येईल असं आश्वासन मिळालं आहे. याचं कारण म्हणजे संत रविदासांचा इतिहास. त्यांनी केलेला सनातनी लोकांना विरोध.ज्या विरोधामुळे त्या काळात संत रविदासांना शह देता आला नाही, तो देण्याचा आजच्या लोकांचा प्रयत्न.
साधारणपणे २५० ते ३०० पोटजातीत विखूरलेला चर्मकार समाज त्यावेळीही तसाच विखूरला होता. त्यावेळी जातीजातीत भेदभावाने चरणसीमा गाठली होती. पोटजातीतील लोकंही आपल्याच पोटजातीतील लोकांचा भेदभाव करीत. याचा परीणाम संत रविदासावर लहानपणी झाला. तसेच त्यापुर्वी संत हरळ्या होवून गेला होता. त्याने अशाच प्रकारचा जातीभेदाला विरोध केला. नव्हे तर तीव्र जातीभेद असूनही संत हरळ्याने आपल्या मुलासाठी ब्राम्हण मुलगी मागीतली.या कारणावरुन हरळ्या व त्याच्या पुत्राला सनातनी लोकांनी कडेलोट दिला.याही गोष्टीचा परीणाम संत रविदासावर लहानपणीच झाला. त्यामुळे त्यांनी आपल्या समाजाला एकत्र करुन या सनातनी लोकांच्या वागण्यावर हल्ला चढवला नव्हे तर प्रचंड विरोध असूनही संत रविदासांनी आपले वागणे बदलविले नाही. ते कार्य करीतच राहिले.
संत रविदास जेव्हा किशोर झाले, तेव्हा त्यांनी समाजातील भेदभाव दूर व्हावा म्हणून उपदेश देणे सुरु केले. पण एका तुच्छ चर्मकाराने उपदेश देणे पसंत न पडलेला तमाम सनातनी वर्ग संतापला व त्यांनी तेथील राजाद्वारा संत रविदासाला दंडीत करण्याचे ठरवले. तसेच त्याची तक्रार त्यांच्या वडीलांना केली. वडीलांनीही रविदासाने गोत्यात येवू नये म्हणून त्यांचा विवाह केला.
सर्वप्रथम रविदासांनी सर्वसामान्यांना भाषा कळावी म्हणून आपली लिपी बनवली. त्या लिपीला गुरमूखी म्हणत.
गुरु रविदास जे उपदेश करीत, त्या उपदेशाने ते ख्यातीप्राप्त झाले, त्यामुळं चिडून सनातन्यांनी ब्राम्हणपंडीत व गुरु रविदास यांच्यात शास्रार्थ घडविला. त्यात रविदास जिंकले. खरा व्यक्ती कुठेही तरु शकतो हे यातून सिद्ध झाले.
त्यांच्या महान कार्याने व उपदेशाने बरीचशी मंडळी त्यांचे शिष्य बनली. त्यात चितोडगडची झाली नावाची महाराणी, पीरा दत्ता मिराशी, गंगाराम नामक पंडीत, जगन्नाथ पुरीची कर्माबाई, राजा पीपा, अलीवदी बादशाह, राजा चंद्रप्रताप, बीबी भानावती, राजा नागरमल, गोरखनाथ, बादशहा सिकंदर लोधी, बादशहा बाबर व राजा तुघलक यांचा समावेश आहे. तसेच त्यांनी ब-याच देशाच्या यात्राही केल्या. संपुर्ण भारत तर त्यांनी पिंजूनच काढला होता. शिवाय विदेशाचा विचार केल्यास विशेषतः आबादान शहर(इरान), बेगमपुरा(अफगाणिस्तान), कुवैत, सऊदी अरब, मक्का, मदीना, इराक,सौदी अरेबिया, मध्य आशिया या ठिकाणाचा समावेश आहे.
त्यांनी समाजातील जातपात, पाखंडवाद, निरक्षरता, स्री जातीची होत असलेली अधोगती ह्या दोषावर विरजण घातलं नव्हे तर समाजसुधारणेसाठी प्रयत्न केला. पण सनातनी समाज त्याही वेळी त्यांचा द्वेषच करीत होता. जो द्वेष आजही खदखदत आहे. जो द्वेष तुघलकाबादच्या रुपाने दिसत आहे. आज जर चर्मकार जागला नाही तर उद्या हे तुघलकाबादचं रविदासाचं स्मारक, त्याच्या पाऊलखुणा संबंध चर्मकार बांधवाच्या स्मृतीतून नष्ट होईल. एवढेच नाही तर उद्या संबंध देशातून या संत रविदासाच्या पाऊलखुणा मिटविण्याचे प्रयत्न सुरु राहतील. आपण काहीच करु शकणार नाही. पर्यायानं सांगायचं झाल्यास हे असच जर सुरु राहिलं तर उद्या संत रविदास कोण होते हेही चर्मकारांना माहीती पडणार नाही. त्यामुळे आजच चर्मकारांनी आपली अस्मीता लक्षात घेवून आगेकुच करायला हवी. संत रविदासाचं मंदीर पाडणं हा केवळ संत रविदासाचा अपमान नसून संबंध चर्मकार समाजाचा अपमान आहे. हा बोध घेवून पावले उचलायला हवीत. जेणेकरुन झालेली चूक मान्य करुन सरकार शक्य तेवढ्या लवकर तुघलकाबादचं तोडलेलं मंदीर उभारेल. संत रविदासाचे संपुर्ण देशातील स्मारक त्यांच्या काही स्मृती तुघलकाबादच्या मंदीरासारख्या अशाच ब-याच ठिकाणी मिटविल्या गेल्या. तुघलकाबादचं मंदीरही तोडणं हा अशाच स्मृती मिटविण्याचा संकेत आहे. ह्यावर विचार करायला हवा. तुघलकाबादचं पुनश्च मंदीर बनणं हेच रविदास महाराजांना खरी श्रद्धांजली होईल. तसेच तुमचं असलेलं रविदासाप्रती कर्तव्यही पार पाडता येईल यात शंका नाही.
संत रविदास हे चर्मकाराचे आराध्य दैवत जरी असलं तरी केवळ आराध्य दैवत म्हणून चालणार नाही, तर त्यांच्या तत्वानुसार चर्मकारांना वागावं लागेल. तेव्हाच चर्मकार समाज सुधारला असं म्हणता येईल. आज चर्मकार समाजातील लोकं जागले आहेत असा फक्त दिखावा आहे. हे मासे पकडणा-या बगळ्यासारखं सोंग घेण्यासारखी गोष्ट आहे. आजही चर्मकार समाज जागला नाही. केवळ चांगले कपडे परीधान करुन व एक मर्सीडीज गाडी हाताशी घेवून व दुमजली घर बांधून समाजाचा विकास होत नाही, तर त्यासाठी चांगले कर्मही करावे लागते. तसे कर्म ह्या समाजातील काही नेते करीत नाहीत. आज हेच नेते एखाद्यावर अन्याय झाल्यास अगदी गप्प बसतात. म्हटल्यास ते आमचं काम नाही असं सांगतात. आजही या समाजाचे नेते चाटूगीरी करतात. म्हणूनच अन्याय वाढतो आहे. आज याच समाजात अनेक संघटना अस्तीत्वात असून प्रत्येकांना वाटते की माझे नाव व्हावे. म्हणून प्रत्येक नेत्याची प्रत्येक संघटना.
चर्मकार समाजाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा समाज खुप श्रीमंत आहे. परंतू श्रीमंत असून चालत नाही. कारण अजुनही विचार बुरसटलेले आहेत. चार दोन फक्त शिकलेले आहेत. ते इतरांना मदत करीत नाहीत. हे बोलके सुधारक असून कर्ते सुधारक नसल्यानं समजा एखाद्यावर अन्याय झाल्यास त्यालाच पिसावं लागतं. कोणी धावून येत नाही. म्हणूनच आज या समाजावर अत्याचार करणा-यांची संख्या जास्त आहे. जर एखाद्यानं यावर आवाज उठवलाच तर याच समाजातील काही नेते मंडळी त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात. म्हणतात की त्यांच्याशी माझे हितसंबंध आहेत.
हा समाज संख्येने जास्त आहे. पुर्ण देशात आहे यांची संख्या. परंतू त्यांची संख्या कधीच मोर्चा, आंदोलनात दिसत नाही. आपल्या कामाशी काम ठेवतात ते. तसेच उत्सव, समारंभ हिरीरीनं करुन संख्याबळ दाखवतात कधीकधी. या कार्यक्रमासाठी समाज बांधवांकडून वर्गणीही गोळा करतात. परंतू त्यातील काही पैसे वाचलेच तर त्याचा हिशोब दिला जात नाही. तो पैसा दारुमध्ये उडवला जातो. असा हा समाज. हा समाज जेव्हापर्यंत स्वतःची अहमियतता माहित करुन घेवून त्याप्रमाणे वागणार नाही. तेव्हापर्यंत हा समाज कितीही श्रीमंत असला तरी तो मागेच राहिल ही सत्यता नाकारता येत नाही.
इसवी सनाच्या चौदाव्या शतकात संत रविदासांनी हेच पाहिलं. पडताळलं. म्हणतात की रविदासानं चमत्कार केले. त्यांनी रांजनातून सोन्याचं कंगण काढलं. त्याची कथाही आज प्रचलीत आहे. तो योगायोगच असेल. कारण रांजनातून कंगण निघत नाही. परंतू हा समाज आपल्याकडे आकृष्ट राहायला हवा. म्हणून काही इतर समाजातील ढोंग्यांनी चर्मकार समाजातील साधूसंतात चमत्कार भरवलेत. त्यावर या समाजानं वास्तविकता न माहित करुन घेता स्वतःच्या मनात अंधविश्वास निर्माण केला. संत रविदास हे चमत्कारवादी नव्हतेच. त्यांचा खरा इतिहास जर पाहिला तर त्यांनी समाजातील लोकांना अंधविश्वासातून बाहेर काढलेले आहे. मग ते सोन्याचे कंगण रांजणातून कसे काढतील बरे! ते तर म्हणतात की मन चंगा तो कटोती में गंगा। अर्थात आपलं मन जर चांगलं असलं तर लहानशा कटो-यातही गंगा पाहायला मिळू शकते.
महत्वपूर्ण गोष्ट ही की गंगा नदी काही कटो-यात दिसत नाही. तो अर्थबोध केला आहे. त्या एकाच वाक्यात किती सर्व अर्थबोध आहे. भावार्थ आहे. त्याचा अर्थ असा की आपल्याला याच मनुष्यजन्मात सर्व काही मिळतं. परंतू त्यासाठी विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा. एवढंच रविदास महाराजांचं सांगणं.
संत रविदासांच्याही काळात समाज असाच विखूरला होता. कोणीच कोणाचं ऐकत नव्हता. जो तो आपल्याच गुर्मीत वागत होता. त्याच समाजाला संत रविदासानं एकत्र आणलं. त्यांना आपल्या समाजाचे अस्तित्व समजावून सांगीतले. त्यानुसार समाज एकत्र झाला. आज मात्र पुन्हा विखूरतांना दिसत आहे. तो समाज त्यावेळी एकत्र कसा आला हे त्यांनी ज्या गुरमुख्या रचल्या, त्यावरुन दिसते. हा समाज शिकला. परंतू एकानंही संत रविदासांच्या गुरमुख्या वाचल्या नसेल. म्हणूनच आजचा हा समाज त्यांनी कटो-यातून कंगण काढले म्हणतो.
आज समाज विखूरत असला तरी बरेचसे समाज बांधव सुधारत आहेत. त्याचे कारण म्हणजे त्यांना लाभलेली तथागत भगवान गौतम बुद्धाची संगत. तथागत भगवान गौतम बुद्ध हे चमत्कार मानणारे नव्हते. ते वास्तविकता जोपासणारे होते. जी सुजाता नवशानं पुत्र होतात मानणारी होती. त्याच सुजाताच्या मनातून त्या काळात नवसपुत्रप्राप्तीची अंधश्रद्धा काढून तथागतानं तिच्या मनात ज्ञानाचा प्रकाश भरला. त्यामुळं पुढील काळात तिनंही बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. तेच महत्व लक्षात घेवून पुढे डॉक्टर बाबासाहेबानंही. त्याच समाजातील बाबासाहेबांना मानणारा चर्मकार समाज आज वास्तववादी परंपरेने जगतो. मग हा समाज कसा अंधश्रद्धा पाळेल. तो पाळणार नाही. ते शक्यही नाही.
संत रविदास हे याच बुद्धाच्या परंपरेतीलच आहेत. ते संत ज्ञानेश्वरानं रेड्याच्या मुखातून वेद वदवले असं म्हणत नाही. मानतही नाही. तर रेडा नावाच्या मुर्ख व्यक्तीला शहाणं बनवलं असं मानतात. यात रेडा म्हणजे म्हशीचं पिल्लू नव्हतं तर तो माणूस होता असं संत रविदास मानतात. अशा ब-याच गोष्टी आहेत की ज्यात रविदास चमत्काराला स्थान देत नाहीत. म्हणूनच त्यांना संत म्हटलं आहे. संताची उपाधी दिली आहे.
महत्वाची गोष्ट ही की समाजानं संत रविदासाला मानावं वा मानू नये. परंतू निदान त्यांनी चमत्कार केलेला आहे अशी अंधश्रद्धा पसरवून संत रविदासांना बदनाम करु नये. तो समाजाचा अपमानच अाहे. असा अपमान कोणताच समाजबांधव सहन करणार नाही. जो असा अपमान सहन करेल. तो अंधश्रद्धा पाळणारा असेल. त्याला संत रविदासच समजला नाही असंच म्हणावं लागेल हे निर्वीवाद सत्य आहे.

अंकुश शिंगाडे ९३७३३५९४५०

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button