Uncategorized

विद्रोहाची धगधगता अंगार.. महाकवी पँथर नामदेव ढसाळ –लेख निलेश वाघमारे

 

विद्रोहाची धगधगता अंगार.. महाकवी पँथर नामदेव ढसाळ –लेख निलेश वाघमारे

 

 

ढसाळांच्या साहित्याने समग्र विश्र्वाला विचार करावयास भाग पाडले. त्यांनी व त्यांच्या कवितेने सामान्य माणसाचे जीवन उलगडवले. त्यांच्या साहित्याने अन्याय अत्याचार करणाऱ्या विध्वंसक मानसिकतेवर प्रहार केले.सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचे तत्त्वज्ञान हे त्यांचे अनुभवविश्र्व असते त्याच अनुभव विश्र्वात एका सुर्य कुळातील कवीचा उदय झाला …
नामदेव ढसाळ यांचा जन्म १५ फेब्रुवारी इ.स. १९४९ रोजी पुणे जिल्ह्यात खेड तालुक्यातील कनेरसर शेजारच्या पूर या खेड्यात झाला. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने लहानपणीच ते वडिलांसोबत मुंबईला आले. मुंबईतील गोलपीठा या वेश्यावस्ती असलेल्या भागातील झोपडपट्ट्यांमध्ये त्यांचे बालपण गेले. त्यांचे वडील खाटीक होते. नामदेव ढसाळांनी मुंबईमध्ये अनेक वर्षे टॅक्सी चालवली. ढसाळांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा प्रभाव होता. त्यांनी काव्य, गद्य, वृत्तपत्रांतील स्तंभलेखन यातून आंबेडकरांचे क्रांतिकारी विचार मांडले. त्यांच्या क्रांतिकारी साहित्याची दखल जगाने घेतली या बंडखोर माणसाने मनुवद्याचे इमले उध्वस्त केले.त्यांच्या आयुष्यातील प्रसंगाने समग्र साहित्याला वेगळीच दिशा दिली. एका परंपरेला छेद देणाऱ्या त्यांच्या बंडखोर शैलीने विद्रोही साहित्याला नवा जन्म दिला. त्यांच्या प्रत्येक साहित्यातून मानवी विश्वाचे दर्शन घडते याच महाकव्याने साहित्याची बंधने झुगारून लावली अन् मराठी साहित्याला व भाषेला एक नवा आयाम दिला. त्यांच्या कवितेने प्रस्थापित व्यवस्थेला हादरे दिले. तसेच मस्तवाल लोकांना हादरवून सोडले. त्यांच्या कवितेतील जाणिवा ह्या सामान्य जनतेशी एकरूप होत्या. चींदकातल्या हाताला सळसळ करायला लावणाऱ्या महाकव्याने मराठी साहित्याची नव्याने ओळख करून दिली.त्यांची बंडखोर भाषा सहित्यात दाखल,झाल्यावर सभ्यपणाचे मुखवटे घालून फिरणाऱ्याना जणु धास्तीच बसली . त्यांनी जे जे पाहिलं अनुभवलं ते कवितेतून मांडले. त्यांची कविता जातीप्रथेविरुद्ध व परंपरेविरुद्ध आवाज उठवणारी होती. त्यांची साहित्यिक भाषा कठोर जरी असली तरीही त्या लेखन शैलीने मराठी साहित्याला दर्जा प्राप्त करून दिला. त्यांच्या साहित्य कृतीत कथा , कादंबरी, कवितासंग्रह यांचा समावेश होतो. त्यांच्या कविता ह्या सहज आकलनिय नाहीत.त्यासाठी अनुभवाचा कस लागतो.त्यांच्या लेखन शैलीने सामान्यांच्या मनात विद्रोहाची मशाल पेटवून व्यवस्थेविरुद्ध एल्गार पुकारला. म्हणुनच त्यांच्या साहित्याने जगाला भुरळ घातली.त्यांच्या कविता व साहित्यातून प्रखर आंबेडकरवाद दिसून येतो त्यांच्या गोलपिठा या कविता संग्रहाने समस्त मानव जीवनाचे वर्णन केले आहे (उदा, भुकेल्या, गरीब हतबल माणसांचे, दादांचे ,खिशेकापू, वेश्या, तरुण रोगी देहांचे , बेकारांचे , भिकाऱ्यांचे , हिजड्याचे, मुंबई नगरीतील प्रत्येक गोष्टीचे वर्णन यात केले आहे ) तुम्ही यत्ता कंची? तुम्ही यत्ता, खेळ, मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले, मी मारले सुर्याच्या रथाचे सात घोडे, या सत्तेत जीव रमत नाही, गांडू बगीचा, आंधळे शतक, समष्टी साठी सारं काही, तुझे बोट धरून चाललो आहे मी, निर्वाणा अगोदरची पिडा ,चिंध्याची देवी आणि इतर कविता, हाडकी-हाडवळा ,निगेटिव्ह स्पेस यासारख्या कथा, कादंबरी व कवितासंग्रहानी मराठी साहित्याला नव्या उंचीवर नेऊन ठेवले. ते नुसते कविता करुनच थांबले नाहीत , तर त्यांनी कवितेला राजकिय कृतीची जोड देऊन ९जुलै१९७२मध्ये अमेरिकेतल्या ब्लॅक पँथरच्या धर्तीवर दलीत पँथर संघटना स्थापन केली . दलीत पँथरच्या माध्यमातून अनेकांना न्याय हक्कासाठी लढन्याचे बळ प्राप्तकरून दिले. दलीत पँथरच्या जाहीरनाम्याने समस्त दलीत,शोषित, कष्टकरी यांच्यावरील होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांना वाचा फोडत न्यायाच्या बाजूने लढा दिला. रस्त्यावर उतरून अत्याचाराला विरोध करणे हे दलीत पँथरचे वैशिष्ट्य होते .पँथरच्या कामाची पद्धत वेगळी होती. तिथेच न्यायाचा फैसला करणारी बाब त्यांचे वेगळेपण सिद्ध करते. ह्या चळवळीने आंबेडकरी विचारांचा वसा व वारसा जपला व तो काळाच्या पुढे नेण्याचे कार्य केले.त्यांच्या कवितेबद्दल “ग दि माडगूळकर म्हणतात की ,”आता रसाळ नामदेवाचा काळ संपुन ढसाळ नामदेवांचा काळ सुरू झालाय.” हे मत त्यांचे वेगळेपण सिद्ध करते. त्यांच्या कविता ह्या जगण्याची उर्मी देतात.. रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यानो आता या शहराला आग लावीत चला.. या ओळी व्यवस्थेवरोधात बंड करण्याची प्रेरणा देणाऱ्या आहेत.बाबासाहे आंबेडकर यांच्याबद्दलचा आदरभाव प्रकट करतात .डॉ आंबेडकरांना या कवितेत ते म्हणतात… आज आमचे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. हे जगणे आणि मरणे. हे सुख आणि दुःख. हे स्वप्न आणि वास्तव. ही भूक ही तहान. सर्व पुण्याई तुझीच आहे… अशा शब्दात व्यक्त होताना त्यांचे बाबासाहेबांवरील अपार प्रेम दिसते. बुद्धाप्रती असलेला आदरभाव त्यांच्या श्रमण या कवितेतून त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या समग्र वांॾमयातुन मानवाप्रती असलेली तळमळ व शोषीत,पीडित समाजाची असलेली जाणीव दिसते.त्यांच्या कविता म्हणजे वाऱ्यावरची झुळूक नसुन सोसाट्याच वादळ आहे. अन्याय अत्याचार सहन केलेल्या समाजाच्या मनात स्फुल्लिंग चेतवून देणारे त्यांचे साहित्य आजही मनामनात पेरले आहे.त्यांचे साहित्य जगातील शोषीत,पिडीत समाजाचे प्रतीनिधित्व व परिवर्तन करते. अशा प्रकारे त्यांनी आपल्या सहित्यातुन जगाच्या साहित्य क्षेत्रातील लेखकवर्ग व रसिक यांना आपल्या शैलीने हादरे दिले.व्यवस्थेविरुद्ध विद्रोह आणि नकार देणारा बंडखोर आक्रमक पँथर म्हणुन त्यांची ओळख या जगाला आहे..त्यांच्या साहित्यकृतीस व त्यांच्या समानता प्रस्थापित करणाऱ्या विचारास त्यांच्या जयंतीदिनीविनम्र अभिवादन……

निलेश वाघमारे ,नांदेड

(संपर्क-8180869782)

 

 

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button