विभाजनातून सद्भावना पेरणारी सामाजिक-राजकीय कादंबरी -‘विभाजन”
विभाजनातून सद्भावना पेरणारी सामाजिक- राजकीय कादंबरी -“विभाजन”
नागपूर येथील सिदधहस्त लेखक श्री अंकुश शिंगाडे यांची ‘विभाजन’ ही कादंबरी नुकतीच वाचनात आली. श्री शिंगाडे सरांनी आत्तापर्यंत जवळपास ५८ पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यामध्ये काव्य, कादंबरी, कथा, ललित लेख,चारोळी, नाटक असे साहित्य प्रकार त्यांनी हाताळले आहेत. साहित्याचे असे विविध प्रकार सक्षमतेने हाताळताना त्यांनी अनेक ऐतिहासिक- पौराणिक दुर्लक्षित अशा पात्रांना अधोरेखित करण्याचा हेतुपूर्वक प्रयत्न केला आहे. त्याच बरोबर सामाजिक व राजकीय निरीक्षकांच्या भूमिकेतून आपल्या कथा-कादंबऱ्यातून त्याचा अन्वयार्थ टिपण्याचा प्रयत्नही केला आहे. ‘विभाजन’ ही कादंबरी भारत-पाकिस्तान द्विराष्ट्रनिर्मितीशी संबंधित आहे. कादंबरीचा नायक युसूफ हा विभाजनाची झळ बसलेल्या भारतीय खेड्यातील कुटुंबात वाढलेला आहे. त्याचे आई-वडील धार्मिक दंगलीमध्ये मारले जातात. तेव्हा तो लहान होता. त्याची मोठी बहीण झरीना काबाडकष्ट करून युसूफचे पालन पोषण करते. युसूफ जसजसा मोठा होईल, तसतशी त्याची भिन्न धर्मीय समाजाबद्दलची जाण वाढू लागली. त्याच्या हे लक्षात आले की कोणताही समाज हा वाईट नसतो. लोकांची माथी भडकवणारी स्वार्थी संधिसाधू हे वाईट असतात. तो हळूहळू सामाजिक कार्यात त्याच्या वडिलांप्रमाणेच सहभागी होऊ लागला. स्थानिक पंचायत निवडणुकांपासून लोकसभेच्या निवडणुकांपर्यंत तो मजल मारतो. मात्र त्याच्या मनात एकच खंत असते की हा भारत अखंड व्हावा. भारताचे विभाजन संपुष्टात येऊन सिंधू नदी जिच्या काठी प्रगत भारतीय संस्कृती विकसली, ती भारतात असावी. दोन्ही देशातील लोकांची कलुषित मने साफ व्हावीत. एकमेकांच्या चूका माफ करुन दोन्ही देश एक व्हावेत अशी आशा उराशी बाळगून तो म्हातारपणी कोरोना रोगाशी झुंज देत राहतो. त्याची ती आशा वेडी-अवास्तव वाटली तरी प्रत्येक देशप्रेमी भारतीयाच्या मनोदशेचे ते प्रतिनिधित्व करते.
ही कादंबरी केवळ एका व्यक्ती अथवा कुटुंबाचा जीवनपट नाही तर भारतीय स्वातंत्र्याचा संक्षिप्त इतिहास हाच या कादंबरीतून मांडण्यात आला आहे. अठराशे सत्तावनच्या उठावापासून ते थेट स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंच्या सर्व राजकीय व सामाजिक घडामोडींचा आढावा लेखकाने घेतला आहे. इतकेच नव्हे तर स्वातंत्र्योत्तर काळातील विविध घडामोडींचा लक्षवेधी उल्लेख या कादंबरीतून करण्यात आलेला आहे. ही कादंबरी वाचताना वाचकांना केवळ एका प्रदीर्घ कथेचा अनुभव होतो असे नाही. तर गत दिडशे वर्षांच्या भारताच्या इतिहासाशी वाचक परीचीत होतो. यादृष्टीने पाहता या कादंबरीस ऐतिहासिक व्यासंगता लाभली आहे. लेखकाच्या सर्वदूर विविधांगी विचारशैलीचाच यातून परिचय होतो. निश्चितच श्री शिंगाडे सरांनी निर्मिलेली विभाजन ही कादंबरी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक विषयक भाष्य करते. वास्तवावर आधारित ही कादंबरी धार्मिक- जातीय संकुचित प्रवृत्तींचा दुष्परिणाम मांडते. तर मानवता ही धार्मिक भेदाभेदास कशी पुरुन उरते हेही प्रसंगानुरूप कादंबरीतून प्रकट होत राहते.
‘विभाजन’टाळता येऊ शकले असते असे अनेकांना वाटते. मात्र तत्कालीन अविभाजित स्थिती हाताळताना अनेक मोठ्या नेत्यांना हे लक्षात आले होते की विभाजन हे अनिवार्य असून ही कडू गोळी घेतल्याशिवाय स्वातंत्र्याचा खरा अर्थ प्राप्त होणार नाही. कदाचित दररोजची डोकेदुखी संपवण्यासाठी दूरदृष्टीने तत्कालीन नेत्यांनी हा निर्णय घेतला असावा. भारताचे विभाजन झाले हे खरे, मात्र दोन्ही देशात पारतंत्र्यातून स्वातंत्र्याची पहाट उगवली. एक नवा दैदीप्यमान अध्याय सुरु झाला. देशांच्या सीमा या कधी शाश्वत नसतात. निश्चितच कादंबरीच्या नायकास व नायकाच्या मुखातून प्रसूत झालेल्या जनभावनेस अभिप्रेत असलेल्या अखंड भारताचे स्वप्न सत्यात उतरेल. दोन्हीकडील जनमानस यासाठी प्रबुद्ध होईल अशी आशा बाळगूया! कादंबरीतून प्रस्तुत होणाऱ्या या सद्भावनेस वंदन करत कादंबरीचे कर्ते श्री. अंकुश शिंगाडे सरांनाही त्यांच्या साहित्यिक कार्यास व पुढील वाटचालीस मनस्वी शुभेच्छा!
—————श्री सचिन कुसनाळे, सांगली.
_____कादंबरी-विभाजन_____
लेखक – अंकुश शिंगाडे,नागपूर