आम्हालाही शाळेत घ्या हो..

आम्हालाही शाळेत घ्याहो अशी आर्त हाक त्या विद्यार्थ्यांची असते. जी मुले शाळेच्या परीसरात फिरत असतात. त्यांना शाळाबाह्य विद्यार्थी म्हणतात. कारण ते शाळेतच येत नाहीत.
शाळाबाह्य विद्यार्थी प्रत्येक शाळेच्या परीसरातच असतो. सरकार असे विद्यार्थी शोधायलाही लावतात. परंतू शिक्षक हे कानाडोळा करुन अशा विद्यार्थ्यांना शोधत नाहीत. हीच वास्तविकता आहे.
*नेमके विद्यार्थी शाळाबाह्य का ठरतात?* असा विचार केल्यास पुढील कारणं नक्कीच पुढं येत असतात.
१) ज्या विद्यार्थ्यांचे वडील किंवा आई, यापैकी एकजण मरण पावतो. त्यानंतर आई किंवा वडील……..जे जीवंत असतात ते दुसरा विवाह करुन मोकळे होतात. ते आपल्या मुलांच्या भवितव्याचा विचारच करीत नाहीत. अशा मुलांच्या मानसिकतेवर जबरदस्त धक्का बसतो. त्यांचं शिक्षणात मन रमत नाही. अशी मुलं घरातून तर शाळेत निघतात. परंतू ते शाळेत पोहोचत नाहीत. ती मुलं शाळेच्या परीसरात फिरत असतात. कोणाला भीकही मागत असतात वा कचरा वेचत असतात. कारण अशी मुलं व्यसनाच्या आहारी गेलेली असतात.
२) मुलांना शाळाबाह्य ठरविण्यात दुसरं कारण म्हणजे गरीबी. काही काही पालक हे गरीब असतात. अशावेळी ते पती पत्नी दोघंही कामाला जातात. मात्र त्यांची मुलं ही गावभर फिरत असतात. ते शाळेत जात नाहीत.
३) पालकाची मानसिकताच बनलेली आहे की मुलगी आणि मुलगा भेद करणे. आजही काही ठिकाणी मुलगा झाल्यानं पेढे वाटले जातात आणि मुलगी झाल्यास अश्रू गाळले जातात. काही ठिकाणी आजही मुलाला वंशाचा दिवा समजत जोपर्यंत मुलगा होत नाही, तोपर्यंत मुली जन्माला घातल्या जातात.
काही ठिकाणी यावर पर्याय म्हणून गर्भलिंगनिदान चाचणी आजही केली जाते व मुलगी निघाल्यास तिच्या भ्रृणाची हत्या केली जाते. तसेच मुली असल्यास त्यांना शिकवले जात नाही. तर त्यांना घरी बसवलं जातं. अशावेळी ती मुलगी शाळाबाह्य ठरते.
४) काही ठिकाणी लोकं अति श्रीमंत असतात. मायबाप त्या घरी दोघंही पैसे कमविण्यासाठी कामाला जातात. मात्र त्यांची मुलं ही शाळेत जात नाही तर ती गावभर फिरत असतात. ही देखील मुलं शाळाबाह्य असतात. हे चौकशी केल्यावर समजतं. हा प्रकार वेळीच लक्षात येतो.
५) काही काही ठिकाणी पती पत्नींचं पटत नाही. मुलींना पती तिचा ऐकणारा हवा असतो. ती काही दिवस मन मारुन आपल्या पतीच्या घरी तर राहते. त्यातून तिला मुलंही होतात. परंतू समस्या अशी की ती मुलं जसजशी मोठी होतात. तसतशी सज्ञान होतात. ती पतीपत्नीची (मायबापाची) अशी भांडणं पाहून शाळेत जात नाहीत. कारण त्यांचं मनच शाळेत रमत नाही. काही ठिकाणी ही भांडणं विकृत स्वरुप धारण करतात. पती पत्नीला सोडून जातो. कधी पत्नी पतीला. त्यातच त्या विद्यार्थ्यांची माहिती कधी बापाजवळ असते तर कधी आईजवळ. मग दुस-या शाळेत नाव टाकायला दाखला नसतो. शेवटी पर्याय नसल्याने ते मायबाप जर कमी शिकलेले असतील तर ते आपल्या मुलाला शाळेत पाठवीत नाहीत. शाळाबाह्य करतात. घटस्फोटाची भांडणं.
६) जास्त मुलांची पैदावार ही देखील कधीकधी शाळाबाह्य ला कारणीभूत ठरत असते. कारण परीस्थीती नाजूक असते. मायबाप कोणाकोणाला शिकविणार हा प्रश्न असतो. अशी मुलं साहजीकच शाळाबाह्य ठरतात.
दरवर्षी विद्यार्थी शाळाबाह्य होण्याचे प्रमाण वाढतच आहे. यावर काही उपायही नक्कीच करता येतात. परंतू कोण करेल, आपल्या मागं खरुज नको, कटकट नको. ही पालकांची मानसिकता. मुलं लहान असतात. त्यावेळी त्यांना ना शाळाबाह्यतेचा अर्थ कळत नाही. ना शाळाबाह्यतेचे नुकसान. ते अगदी बिनधास्तपणे वागत असतात. यावर काही उपायही करता येतील.
१) शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या घरी जावून त्यांच्या पालकाची वारंवार भेट घ्यावी. तो विद्यार्थी शाळेत येतो की नाही त्याची माहिती त्यांना सांगावी. तसेच तो हुशार नसेलही कदाचित तरी तो हुशार आहे, त्याचं नुकसान करु नका असे रास्तपणे सांगावे. यावर मी एक प्रयोग केलेला आहे.
त्या घरी विश्वकोटीचं दारिद्रय होतं. मुलांच्या हव्यासापोटी मायबापानं पाच पोरी जन्मास घातल्या. सहावा मुलगा. मुलाला शिकविण्याची मानसिकती. मात्र मुलगी थोडी हुशार होती. ती माझ्याकडे येत असे व म्हणत असे की सर तुम्ही माझ्या वडीलांना समजवा. ते शिकवीत नाही म्हणतात.
मी ते ऐकत असे. मला पश्चाताप होत असे की कशाला त्यानं एवढी मुलं जन्माला घातली असावी. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचं नाही तर मानसिकतेचं नुकसान होतं.
मी त्या मुलीच्या म्हणण्यानुसार तिच्या घरी जात असे व तिच्या वडीलांना समजावून सांगत असे की हिला शिकवा. ही फार हुशार आहे. हिच तुम्हाला पोसेल. तशी मुलगी दहावी झाली. मी तिला घराजवळ ट्युशन घ्यायला लावली. ती लहान विद्यार्थ्यांची शिकवणी घ्यायची. तिचा खर्च निघायचा. त्यातच असं करता करता ती घरखर्चही काढू लागली नव्हे तर वडीलांना आज तिला शिकविल्याचा अभिमान वाटत होता.
महत्वाची गोष्ट अशी की ऐपत असेल शिकवायची तरच मायबापानं मुलाचा हव्यास करीत मुलींना जन्म द्यावा. विनाकारण त्यांना मुलाच्या हव्यासापोटी जन्माला घालू नये. यामुळे मुलींच्या मानसिकतेचा बळी जात असतो. ही विचार करणारी बाब आहे. याचा मायबापानं तरी विचार करावा.
२) दुसरा महत्वाचा उपाय आहे तो घटस्फोटाचा. मायबापानं कोणत्याही समयी, काही का असेना, घटस्फोटाचा विचारच करु नये आणि करायचा असेल तर निदान मुलं जन्मालाच घालू नये.
३) मृत्यू काही कुणाच्या हातात नसतो. काही स्रीया वा काही माणसं अकाली मरण पावतात. त्यावेळी पती पत्नींपैकी जो जीवंत असेल, तो घटक तरुण असतो. असा घटक हा आपल्या मुलाबाळांचा विचार न करता दुसरा विवाह करतो. तो विवाह मुलांना खपत नाही. अशावेळी पालकानं आपल्या मुलांचा विचार करुनच दुसरा विवाह करावा. निव्वळ आपलं लैंगीक सुख पाहू नये. कारण लैंगीक सुख हे क्षणीक असतं. ते सार्वकालिक नसतं, याचा प्रत्येक अशा जोडप्यांनी विचार करावा.
४) शिक्षकांनी आपली भुमिका बदलवावी. त्यांनी आळस न बाळगता इमानदारीनं सर्वेक्षण करावं. सरकार सांगते म्हणून नाही. त्यांना शाळेच्या कक्षेत आणावं. त्यांना उत्स्फुर्तपणे वेळोवेळी मार्गदर्शन करावं. जेणेकरुन त्यांच्यात अभ्यासाची रुची निर्माण होईल व ते शाळेत येईल. तसेच त्यांचे नुकसान होणार नाही.
५) विशेष म्हणजे पालक गरीब असो की श्रीमंत……..त्यांनी दर महिण्यातून आपला पाल्य कसा प्रगती करीत आहे याची विचारणा शाळेला करावी. तसेच शिक्षकांनीही आपल्या विद्यार्थ्यांची हालचाल आपल्या पालकांशी संपर्क साधून सांगावे. हे कार्य दर आठवड्यात वा पंधरवाड्यात केले केले तरी चालेल. तसेच त्याची विळेषतः नोंद ठेवावी. त्यांच्या प्रगतीचीही नोंद ठेवावी.
महत्वाचं सांगायचं म्हणजे आज मुलं गरीबाची असो की श्रीमंताची. भरपूर प्रमाणात शाळाबाह्य ठरत आहेत. विशेषतः ग्रामीण भागात व आदिवासी बहूल क्षेत्रात याची संख्या जास्त आहे. तसेच अशा शाळाबाह्यतेचे प्रमाण जातीनुसार मोजल्यास छत्तीसगडी समाज, मुस्लीम समाज व अनुसूचीत जातीमधील महार जात सोडून इतर जाती तसेच आदिवासी जाती. यांचं प्रमाण जास्त आहे. सरकार शाळाबाह्यतेचं सर्वेक्षण करतं. परंतू शिक्षक किंवा तत्सम घटक त्याचं रितसर सर्वेक्षण करेल तेव्हा ना. फालतूची कटकट नको म्हणून चालढकलपणा असतो आपला. परंतू यातून त्या मुलांचं किती नुकसान होतं हे आपल्याला माहित नाही. तो आपल्याचमुळं शिक्षणापासून वंचित राहतो व जेव्हा मोठा होतो, तेव्हा पश्चाताप करतो. त्या पश्चातापाचे पाप आपल्यालाच लागत असते. कारण आपल्यामुळंच त्याचं नुकसान झालेलं असतं.
आज त्याही विद्यार्थ्यांना वाटत असतं की त्यांनी शिकावं. ते म्हणतही असतात की आम्हालाही शाळेत घ्याहो. परंतू त्यांचं वय लहान व न समजणारं असतं. ते त्यांना तेव्हा कळतं, जेव्हा वेळ निघून गेलेली असते. म्हणून एकच सांगावेसे वाटते की सर्वेक्षण चांगले करा. असे करा की कोणतेही मुल शाळाबाह्य राहू नये. ठरु नये. तसेच त्यांचे नुकसान होवू नये. असे सर्वेक्षण करा की ते तुमचंच मुल आहे. तुमचाच पोटचा गोळा आहे व तुम्ही त्याचेवर निरतिशय प्रेम करीत आहात.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०