‘सत्यशोधक’ : सामाजिक संघर्षाचे वास्तव चित्रण
भारतासारख्या देशात आधुनिकतेने प्रवेश करण्याची प्रक्रिया तितकीशी सोपी किंवा सरळ नव्हती. आधुनिकतेची मधूर फळं ही वसाहतीकरणाच्या प्रसवकळा अनुभवल्याशिवाय वसाहतीतील जनतेला चाखता येणार नाही, असे साक्षात कार्ल मार्क्सने म्हटले होते. जुन्या सामंती व्यवस्थेकडून नव्या आधुनिक व्यवस्थेकडे समाजाचे संक्रमण होण्याची प्रक्रिया बरीच अंतर्विरोधमय होती. भारतीय अभिजनांनी वासाहतिक सत्ताधाऱ्यांसोबत हातमिळवणी केल्यामुळे समाजातील सत्तेची वीज अधिकच क्लिष्ट झालेली होती.
जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा जीवनकाळ हा अशा व्यामिश्र सत्तासंबंधाचा काळ होता. या काळावर किंवा या काळातील एखाद्या नायकावर चित्रपट तयार करणे, ही बाब आव्हानात्मक आहे. ‘सत्यशोधक’ हा चित्रपट हे आव्हान पेलताना यशस्वी झालाय.
या चित्रपटाचे नायक असलेल्या जोतीरावांचे जीवन ‘rags to riches’ कथा चित्तारणार्या बाजारू चित्रपटातील नायकाप्रमाणे नाही. त्यांचे जीवन हे सामाजिक-राजकीय ताणतणाव आणि संघर्षाने ओतप्रोत भरलेले होते. त्यांच्या जीवनावरील ‘बायोपिक’ हा प्रतिकूलतेतून वैयक्तिक यशाच्या शिखराकडे भरारी घेणार्या नायकाची कथा असू शकत नाही. फुल्यांसारख्या नायकावरील ‘बायोपिक’ हा सामाजिक ताणतणाव आणि संघर्षाचाच ‘बायोपिक’ असू शकतो. या अर्थाने पुरेशा स्पष्टतेने हे ताणतणाव आणि संघर्ष चित्तारण्यात हा चित्रपट हा चित्रपट यशस्वी झाला आहे, असे दिसते.
जोतीरावांच्या जीवनातील संघर्षाचे काही स्थूल आणि सूक्ष्म संदर्भ होते. जातिव्यवस्था व पितृसत्ता आणि यांना अधिमान्य करणारी धर्मसत्ता यांविरुद्ध रणशिंग फुंकणे, हे या संघर्षाचे स्थूल रूप होते. ब्रिटिश-वासाहतिक काळातच हे शक्य असल्याने त्या काळाचे मोल फुल्यांइतक्या चाणाक्षपणे इतर कुणीही जाणले नव्हते. “इंग्रज लोक आज आहेत, उद्या नाहींत. ते आपल्या जन्मास पुरतील म्हणोन कोणाच्याने खास करोन सांगवत नाहीं. यांस्तव त्या लोकांचें राज्य या देशांत आहे तोंच आपण सर्व शूद्रांना जलदी करून भटांच्या वडीलोपार्जीत दास्यत्वापासून मुक्त व्हावे, यामध्ये मोठा शहाणपणा आहे.” ही फुल्यांची स्थूल भूमिका होती. यासोबतच उदाहरणार्थ शाळेत काय शिकवले जावे, याविषयी फुल्यांची भूमिका ही या संघर्षाचे सूक्ष्म रूप दर्शविते. संघर्षाचे हे स्थूल आणि सूक्ष्म रूप दाखविण्यातही हा चित्रपट यशस्वी झालाय, असे दिसते.
चित्रपटाच्या सुरुवातीला पहिले वाक्य बोलणारी व्यक्ती ही गोविंदराव फुले यांच्या शेजारील एक मुस्लिम व्यक्ती आहे. ज्या गंजपेठेत फुले कुटुंबीय राहत होते ती हिंदू-मुस्लिमांची मिश्र वसाहत होती. तसेच फुल्यांच्या व्यक्तिगत जीवनातही गफ्फार बेग, फातिमा शेख ही मुस्लीम माणसं महत्त्वाची होती.
बालविवाह होऊनही सासरी जाताना सावित्री (राजश्री देशपांडे) बैलगाडीत जोतीबाशी (संदीप कुलकर्णी) धीटपणे संवाद साधताना दाखविण्यात आली आहे. परंपरेला झुगारण्याची ऊर्मी सावित्रीबाईमध्ये जणूकाही उपजत होतीच, असेच सुचविले जाते.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाचा एक सूक्ष्म संदर्भ चित्रपटात चित्रित करण्यात आलेला आहे. हा संदर्भ आहे त्यांनी चालविलेल्या शाळांमधून दिल्या जाणाऱ्या शिक्षणाच्या आशयाचा. फुल्यांनी समकालीन असलेल्या सनातनी शिक्षक असलेल्या शिक्षकांकडून ब्रिटिशांच्या अभ्यासक्रमातील वैज्ञानिक संकल्पनांची अवहेलना होत असे, असा प्रसंग प्र. के. अत्रे यांनी दिग्दर्शित केलेल्या महात्मा फुल्यांवरील चित्रपटात दाखविण्यात आलेला आहे. “पृथ्वी वाटोळी आहे. ती सूर्याभोवती फिरते.”, असे शिक्षक वर्गात शिकवितात; मात्र शिकवून झाल्यानंतर “साहेबांनी लिहिलेला हा भूगोल इथेच वाचावा आणि इथेच विसरावा” असे विद्यार्थ्यांना सांगून शिकविलेल्या धड्यावर पाणी फेरतात.
पारंपरिक धार्मिक ज्ञान आणि आधुनिक वैज्ञानिक ज्ञान यांमध्ये त्यावेळी अंतर्विरोध निर्माण होत होता. अशावेळी जोतीरावांनी नव्या विज्ञाननिष्ठ ज्ञानाची कास धरली; पण ते तिथेच थांबले नाही. त्यांनी शालेय वर्गखोलीतून पारंपरिक ज्ञानाला नाकारले; पण त्यासोबतच नव्या मुक्तीदायी ज्ञानाचे सृजनही केले. ज्ञान हे मुक्तीदायी असू नये, अशारीतीने शैक्षणिक ज्ञानव्यवहार असावा, याबाबत भारतातील उच्चजातीय अभिजन आणि परदेशी ब्रिटिश सत्ताधीश यांच्यामध्चे मतैक्य होते. शालेय ज्ञान हे चिकित्सक वृत्तीची जोपासणूक करण्यास पोषक असावे, असे विसाव्या शतकात ॲण्टोनिओ ग्राम्शी, पाऊलो फ्रेअरी यांनी मांडले. फुल्यांनी या प्रक्रियेची सुरुवात एकोणिसाव्या शतकातच केली होती. त्यामुळे प्रस्थापित धर्मसत्तेला कोवळ्या वयात प्रश्नांकित करणारी मुक्ता साळवे सावित्री-जोती यांच्या शाळेत निर्माण होऊ शकली. अशा प्रश्न बाणेदारपणे विचारू शकण्याची क्षमता असलेली विद्यार्थिनी राष्ट्रवादी विचारांच्या पुढाऱ्यांच्या शाळेतून निपजू शकली नाही. या मुलीच्या निबंधावरील प्रसंग चित्रपटात दाखविण्याची रीत इतिहासाला धरून नसली तरी, ते चित्रण प्रभावीपणे या चित्रपटात चित्रित करण्यात आलेला आहे.
चित्रपटाच्या पहिल्या भागात सावित्री-जोती यांच्या जीवनातील सुरुवातीच्या काळातील शैक्षणिक सुधारणांचे चित्रण आहे. दुसऱ्या भागात फुल्यांच्या आयुष्यातील सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक धोरणांविरोधातील संघर्षाचे चित्रण आहे. यात शेतकऱ्यांचे शोषण, केशवपन, विवाहविषयक सुधारणा, विधावाविवाह यांचे चित्रण आहे. चित्रपटाचा दुसरा भाग वेगाने पुढे जातो.
या दुसऱ्या भागात ‘सत्यशोधक’ विवाह पद्धतीबाबतच्या खटल्यावर बराच वेळ खर्च करण्यात आला आहे. ही विवाहपद्धत फुल्यांच्या कुटुंबसंस्था, विवाहसंस्था आणि धर्मव्यवस्था यांच्या पुनर्रचनेचा भाग आहे. त्यामुळे ‘सत्यशोधक’ विवाहाची प्रथा सनातन्यांना आक्षेपार्ह वाटणे साहजिक होते. चित्रपटाचे दिग्दर्शक निलेश जळमकर यांनी बहुदा जोतीरावांच्या तडजोडविहीन तत्त्वनिष्ठेसाठी हे विवाहप्रकरण एक उदाहरण म्हणून हाताळले असावे.
ऐतिहासिक चित्रपटाचे चित्रीकरण हे एक आव्हानच असते. यादेखील चित्रपटाचे चित्रीकरण आव्हानात्मकच होते. मराठी चित्रपटाची निर्मिती कमी साधने आणि साधनसंपत्तीसह केली जाते, हे लक्षात घेता निर्मिती आणि चित्रीकरणाच्या बाबतीत हा चित्रपट अगदीच सरस आहे. असे ‘बायोपिक’ हे निरस ‘डॉक्युमेंटरी’ (माहितीपट) बनव्याचा धोका असतो. फुल्यांच्या आयुष्यातील नाट्यमय प्रसंग निवडून तो धोका दिग्दर्शकाने टाळला आहे.
चित्रपटाच्या काही मर्यादादेखील आहेत. सावित्री-जोती यांचा संयुक्तपणे विचार करताना सावित्रीचे कर्तृत्व नेहमीच झाकोळले जाते. या चित्रपटातही तसे झाले. ‘नायकप्रधान’ चित्रपटाचा पारंपारिक फॉर्म स्वीकारल्यामुळे तसे झाले. सावित्रीबाई स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाच्या होत्या. त्या ना जोतीरावांच्या ‘वामांगी’ होत्या, ना त्या जोतीरावांच्या एक पाऊल मागे उभ्या होत्या!शाळेसाठी स्वत:चे ‘घर’ सोडल्यापासून तर जोतीरावांच्या पार्थिवाला ‘अग्नी’ देण्यापर्यंत सावित्रीबाईंच्या जीवनातील अनेक प्रसंग त्यांच्या स्वयंप्रज्ञतेची साक्ष देतात. हे प्रसंग चित्रपटात यायला हवे होते. जोतीरावांच्या जीवनात न्यायमूर्ती रानडे यांच्याशी झालेला वैचारिक झगडा, फुलांनी सनातन्यांचा रोष पत्करून पंडिता रमाबाई आणि दयानंद सरस्वती यांना दिलेला पाठिंबा; ताराबाई शिंद्यांच्या पुस्तकाने सत्यशोधकांमध्येच उडवून दिलेली खळबळ, तसेच हंटर आयोगाला दिलेली ऐतिहासिक ‘साक्ष’ असे अनेक प्रसंगदेखील चित्रपटात येऊ शकले नाहीत.
तसेच, सत्यशोधक समाजातील अंतर्गत वादाचे चित्रण चित्रपटात निसंकोचपणे करण्यात आले असले, तरी हे चित्रण अकारण ताणले गेलेले आहे, असे वाटते. चळवळीतील वाद हे मुख्यत्वाने वैचारिक स्वरूपाचे असतात आणि असे वाद हे चळवळीला पुढे नेत असतात. फुल्यांच्या आयुष्याच्या अंतिम काळातील नैराश्य हे मुख्यत: ब्राह्मणी-राष्ट्रवादी छावणीच्या चढाईमुळे आलेले होते.
चित्रपटाचे चित्रीकरण, कथानक, पात्रनिवड, गाणी, संवाद, संगीत या सर्वच पातळ्यांवर व्यावसायिकता सांभाळण्यात आलेली आहे. अभिनयात सर्वांच्याच अभिनयाचा कस लागलेला आहे. संपूर्ण चित्रपट जोतीरावांच्या भूमिकेत असलेले संदीप कुलकर्णी यांचा चेहरा जोतीरांवाच्या चेहऱ्याशी मिळताजुळता नसला तरी अभिनेते संदीप कुळकर्णी यांनी अभिनयाच्या जोरावर चित्रपट तोलून धरला आहे. आपण एका दुर्लक्षित महानायकाचे पात्र रंगवित आहोत, याची जाणीव त्यांना असावी. ऐतिहासिक चित्रपटात असतात अशा काही ढोबळ चुका (मुक्ता साळवे या विद्यार्थिनीचे निबंधवाचन, ‘गुलामगिरी’ ग्रंथाचा उल्लेख, फुल्यांच्या तोंडी दिली गेलेली ‘सत्यशोधक’ या संकल्पनेची व्याख्या आणि निबंधमालेचा काळ इत्यादी) सोडल्यास तांत्रिकदृष्ट्या चित्रपटाची निर्मिती निर्दोष आहे.
महाराष्ट्रात ज्या काळात हा चित्रपट प्रसिद्ध प्रदर्शित झालाय तो काळ चळवळींना प्रतिकूल असा आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र हा जातीय वणव्यात होरपळून निघत आहे. एकेकाळी सत्यशोधक चळवळीचे आधारस्तंभ असलेले दोन प्रमुख शेतकरी समुदाय हे परस्परांमध्ये ऐतिहासिकदृष्ट्या शत्रूभावी संबंध नसतानाही परस्परांचे शत्रू म्हणून एकमेकांविरुद्ध उभे ठाकलेले आहेत. जोतीराव फुले यांनी त्या काळात सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून शूद्रातिशूद्रांच्या एकजुटीचा प्रश्न ऐरणीवर आणला होता. आज मात्र महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण हे फुलांच्या ध्येयवादाला विसंगत आहे. अशा प्रतिकूल काळात ‘सत्यशोधक’ चित्रपट प्रदर्शित होणे, हे कालसमर्पक आहे.
सत्यशोधक (२०२४)
दिग्दर्शक – निलेश जळमकर
कलाकार – संदीप कुलकर्णी, राजश्री देशपांडे
———————–
दिलीप चव्हाण
dilipchavan@srtmun.ac.in