जग

गोऱ्यांनी विकलेले काळे गुलाम ;अशी होती अमेरिकन गुलामाची विदारक स्थिती

 

गोऱ्यांनी विकलेले काळे गुलाम ;अशी होती अमेरिकन गुलामाची विदारक स्थिती

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या संस्थापकांनी सर्व माणसे समान आहेत’ या तत्त्वाशी आपल्या राष्ट्राची बांधीलकी मानली होती. पण लिंकन काँग्रेसचा सभासद झाला तोपर्यंत त्या देशातील तीस लाख लोकांना अगदी कायदेशीर रित्या जनावरासारखे वागविण्यात येत होते. ही जनावरे म्हणजे काळे गुलाम होय. नव्या जगात आफ्रिकन आणि त्यांचे वंशज गुलाम म्हणून विकले गेले होते.

जिवंत माणसांचा हा अटलांटिक पलीकडचा व्यापार ‘कापूसप्रधान राज्या’पेक्षाही जुना होता, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपेक्षा देखील जुना होता. तेरा वसाहतींमध्ये तो १७ व्या शतकाच्या प्रारंभापासून चालू होता. दोनशे वर्षे गुलामांचे व्यापारी आफ्रिकन लोकांना त्यांच्या घरांतून व कुटुंबांपासून तोडून नेत होते
आणि वर्णन करता येणार नाही अशा नरकात ढकलत होते. हा नरकवास वर्णन करणे कठीण होते. त्याहून तो सहन करायला अनेक पटींनी कठीण होता. आफ्रिकेच्या किनाऱ्यावर गुलामांच्या व्यापारपेठा होत्या, तेथून लाखो लोक पश्चिमेला पाठवण्यासाठी लाकडी गलबतात ठासून भरून पाठवले जात असत.त्यांतील असंख्यजन प्रवासातच मरत. या दुर्दैवी जीवांनी एकदा का त्यांच्यासाठी तयार केलेल्या दुर्गंधमय व श्वास कोंडेल अशा पिंजऱ्यात पाऊल टाकले की तेथूनच त्यांच्या यमयातना सुरू होत.

 

गुलामांना जेवण बऱ्यापैकी डूकराचे मांस आणि मका मिळे. त्याच्याशिवाय त्यांना काम कसे करता येणार? पण त्यांचे कपडे अगदी पातळ आणि झिरझिरीत असत, आणि जोड़े फक्त हिवाळ्यात घालायला मिळत. घरासंबंधी म्हणाल तर घोड्यांना जास्त चांगली वागणूक होती. निदान त्यांचे तबेले कोरडे असायचे आणि त्यात गवत ठेवायला जागा असायची. बहुतेक गुलामांची घरे म्हणजे बिनखिडकीची झोपडी असायची. कच्ची जमीन आणि भिंतीच्या भोकातून वारा गुलामांचा संसार पहायचा. थोडेफार नशिबवान गुलाम अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतके असत. त्यांच्याजवळ झोपायला बसायला खाट आणि स्वयंपाकाला थोडीफार भांडी-कुंडी असायची. बहुतेकजण खाली जमिनीवर पसरलेल्या गवतातच झोपायचे..

मालकांची सत्ता

आपले गुलाम सदैव आपल्याच हुकमतीत रहावेत याची त्यांचे मालक सर्वतोपरी काळजी घेत. उदाहरणार्थ, गुलामांना काहीही विकण्याची किंवा विकत घेण्याची बंदी होती. साधारणपणे स्वत:च्या मालकीची कोणतीच वस्तू त्यांना जवळ बाळगता येत नव्हती. लिहायला-वाचायला शिकायची त्यांना बंदी होती. त्यांना लग्न करण्याची बंदी होती, कोर्टात साक्ष देता येत नव्हती, आणि स्वतःचे रक्षण करण्यासाठी गोऱ्या माणसावर ते हात उगारू शकत नव्हते. सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे मालकाच्या परवानगीशिवाय त्याची हद ओलांडून ते बाहेर जाऊ शकत नव्हते. जमिनीप्रमाणेच तेही मालकाची संपत्ती होते. ते विरोधी पळून गेले तर तो गुन्हा होता. त्याची कमीत कमी शिक्षा म्हणजे चाबकाचे फटके. तत्त्वत: मालकांना गुलामांचा जीव घेण्याची परवानगी नव्हती, पण प्रत्यक्षात कायदा अनेकदा काणाडोळा करत असे. गुलामांना मरेपर्यंत चाबकाने फोडण्यात येत असे, काठीने मारण्यात येत तसेच जिवंत जाळण्यातही येत असे.

गुलाम कुटुंबाची दैना

गुलाम कसलेही सामान विकू किंवा विकत घेऊ शकत नव्हते, पण कुणाचे तरी सामान म्हणून ते स्वतः मात्र विकले किंवा विकत घेतले जाऊ शकत होते आणि सबंध दक्षिणेत दुकानातून आणि लिलावात दररोज त्यांची खरेदी-विक्री चाले. जणू काही ते भांडी किंवा टेबल खुर्च्याच होते. एखादया मळे मालकाला पैशाची गरज भासली की तो काही गुलाम विकायचा. तो मेल्यावर त्याच्या मालमत्तेची वाटणी करताना त्याचे वारस त्याचे गुलाम विकून पैसे वरोधी करत. सरावलेले जुगारी तर पैशाऐवजी गुलामांचा वापर करीत. एका पत्यावर किंवा फाशावर एक जिवंत माणूस डावाला लावला जाई.

व्हर्जिनिया राज्यातील गुलामांचा लिलाव करण्यासाठी गोरे लोक तरुण निग्रो कुटुंबाचे गिहाइके निरीक्षण करीत. मुलाची विक्री आईबरोबरच होई. पण वडील दुसऱ्यास विकले जात असत आणि अशा रितीने कुटुंबाची कायमची ताटातूट केली जाई.लिलावाचे दालन म्हणजे अन्य गोऱ्या लोकांच्या दृष्टीने एक क्लब होता. डोळ्यासमोर घडणाऱ्या मानवी शोकान्तिकेचा त्यांच्या मनाला स्पर्श होत नव्हता. गप्पा मारण्यात किंवा वर्तमानपत्र वाचण्यात वेळ घालविण्यासाठी ते त्या ठिकाणी येत. अशा प्रकारची विदारक स्थिती अमेरिकेत कृष्णवर्णीयांच्या बाबतीत आढळून येते.

 

गुलाम विकण्याची आणखी एक पद्धत व्हनियातील गुलामांचा बाजार होता. गुलाम स्त्रियांना घातलेले स्वच्छ कपडे मिळविण्यासाठी वापरलेले तंत्र होते. गुलाम जितके नीटनेटके दिसत तेवढी त्यांची अधिक किंमत येई .जर ते हडकुळे ,बारीक असतील तर विकून टाकण्यापूर्वी त्यांना जास्त किंमत यावी म्हणून मुद्दाम त्यांना जास्त खाऊ घातले जाई.

गुलाम जर पुरुष असेल तर अमेरिकेला पोहोचेपर्यंत, त्याचे खुल्या आकाशाचे शेवटचे दर्शन आणि मोकळ्या हवेचा शेवटचा श्वास तो तीन महिन्यांनीच घेत असे अर्थात तो जर अमेरिकेला पोहोचू शकला तर ची ही गोष्ट होती.

प्रत्येक तरुण गुलामाला ७५ सेंटीमीटर उंच, ३८ सेंटीमीटर रुंद आणि २०० सेंटीमीटरपेक्षा कमी लांब एवढ्या जागेत कोंबण्यात येत असे. लहान मुलांना ह्याच्यापेक्षा खूपच कमी जागा मिळे. स्त्रीयांना व मुलांना साधारणपणे दिवसा डेकवर जाण्याची परवानगी मिळे, पण पुरुषांना एकदा शवपेटीपेक्षा लहान अशा जागेत कोंडले की त्यांना तेथेच रहावे लागे. तेथेच ते खात, झोपत, मलमूत्र विसर्जन करीत, उलट्या करीत, असह्य वेदनेने तळमळत, तापाने फणफणत, वेडे होत आणि देवाची कृपा झाली तर मरत. स्त्री पुरुष दोघेही मरणासाठी तळमळत. संधी मिळाली की समुद्रात आनंदाने उडी टाकून ते मृत्यूला कवटाळीत असत. पण बहुतेकजणांना दुर्गंधमय अंधारात साखळीने जखडलेल्या अवस्थेत मरण येत असे. मरणाबरोबरच त्या जागेत प्रसंगी एखाद्याचे नवजीवनही सुरू व्हायचे. जहाजाच्या डॉक्टरला एकदा एक गुलाम मूल जन्माला आलेले दिसले. अवस्थेत
त्याची आई त्या वेळी एका प्रेताशी साखळीने जखडलेली होती. दारुच्या नशेमध्ये तर्र झालेला मुकादम ते प्रेत हलवायला विसरला होता. अशी या गुलामांची अवस्था होती.

गुलामांच्या जहाजाच्या कप्तानाला, अमेरिकेच्या वाटेवर आपल्या ‘मालापैकी’ एक-अष्टमांश माल तरी नष्ट होणार या गोष्टीची पूर्ण कल्पना असे. पण हा अंदाज पुष्कळवेळा चुकायचा. कधी जहाजे नव्या जगात मूळ वजनाच्या केवळ दोन तृतीयांश माल घेऊन पोहोचायची, तर कधी फक्त निम्माच माल किंवा त्याहूनही कमी माल घेऊन येत. मरत किंवा वेडे होत त्यांची इतर निरुपयोगी मालाप्रमाणेच
खलाशी त्यांना समुद्रात फेकून देत असत. सबंध अटलांटिकभर शार्क मासे गुलामांच्या जहाजांच्या मागे जात.

समोर काही गुलामांची त्यांच्या मालकांनी मुक्तता केली होती. पण बहुतेक गुलामांच्या सुटकेचे दोनच मार्ग होते. मरण किंवा पळून जाणे पण;पळून जाणाऱ्या गुलामांना पकडण्यासाठी मजेकरी गस्त घालत.

अमेरिकन व ब्रिटिश व्यापारी दोघेही गुलामगिरीच्या या अमानुष व्यापारावर गबर झाले होते. मग एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला या व्यापारासाठी ब्रिटिश जहाजे वापरण्याची मनाई करणारा कायदा करण्यात ब्रिटिश सुधारकांना यश मिळाले. अमेरिकेने ब्रिटिशांचे अनुकरण केले. पण या बंदीमुळे गुलामांच्या व्यापाऱ्यांच्या नफ्यात घट व्हायच्या ऐवजी तो अधिकच वाढला. कारण आता कापसामुळे सगळी परिस्थिती पालटली होती.काळ्या गुलामांशिवाय कापसाचे पीकच काय पण दक्षिणेच्या कल्यांची सुबता, ब्रिटन व इतर जगाबरोबर जोरात चालणारा व्यापार शक्य नव्हता. पीक, सुबत्ता आणि व्यापार या सर्व गोष्टी एका गोष्टीवर अवलंबून होत्या, पेरणीपासून कापसाची बोंडे खुडण्यापर्यंत न संपणारे गुलामांचे काबाडकष्ट. ‘कापूस राजा’चे हे बळी या उपर परदेशातून आणायचे नाहीत, असे कायदा म्हणत होता. पण गुलामांच्या व्यापाऱ्यांचे त्यामुळे काहीच बिघडत नव्हते. ते कायदयाला हसले आणि आपल्या मालाला आता जास्त किंमत येणार म्हणून खूश झाले. लिंकन काँग्रेसचा सभासद झाला तोपर्यंत निरोगी गुलामांची किंमत माणशी अडीच हजार डॉलर झाली होती.

एक जहाज आले की गुलामांचे व्यापारी लक्षाधीश होत असत. हा बेकायदेशीर, रक्तलांछित आणि भयानक व्यापार चालतच राहिला चालतच राहिला.

(संदर्भ;
यांनी जग घडवले..
अब्राहम लिंकन)

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button