देश

भारतीय सेना दिनाच्या निमित्ताने..

भारतीय सेना दिनाच्या निमित्ताने..

 

– प्रा.डॉ. सुधीर अग्रवाल

देशात दरवर्षी १५ जानेवारीला सेना दिवस साजरा केला जातोय. आजच्याच दिवशी १९४९ साली फील्ड मार्शल जनरल करियप्पा यांनी भारताचे पहिले लष्कर प्रमुख म्हणून सूत्र स्वीकारली होती.

ब्रिटीश कमांडर इन चिफ जनरल फ्रान्सिस बचर हे ब्रिटिश भारताचे शेवटचे लष्कर प्रमुख होते. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतरही काही काळ त्यांनीच भारतीय लष्कराचे प्रतिनिधीत्व केलं. नंतर १५ जानेवारी १९४९ रोजी फील्ड मार्शल जनरल करियप्पा यांनी जनरल फ्रान्सिस बचर यांच्याकडून लष्कराची सूत्रे हातात घेतली. या ऐतिहासिक क्षणानिमित्त १५ जानेवारी हा सैन्य दल दिवस म्हणून साजरा केला जातो.

जनरल करियप्पा असे पहिले भारतीय अधिकारी होते ज्यांनी भारतीय लष्कराचे नेतृत्व केलं . सैन्य दिनानिमित्त भारतीय लष्कराचे साहस, वीरता, शौर्य आणि त्यागाचं स्मरण केलं जातं. या दिवशी सैन्याचे परेड कार्यक्रम, प्रदर्शन आणि इतर महत्वाच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. हे कार्यक्रम सैन्यदलाच्या दिल्ली येथील मुख्यालयासोबतच इतर मुख्यालयातही साजरे करण्यात येतात. सैन्य दिनानिमित्त ज्या जवानांनी देशाचे संरक्षण करताना आपल्या प्राणांची आहुती दिली आहे त्यांना श्रध्दांजली वाहिली जाते.

कोण होते फील्ड मार्शल जनरल करियप्पा?

सन १८९९ साली कर्नाटकातील कुर्ग जिल्ह्यात करियप्पा यांचा जन्म झाला. वयाच्या केवळ २० व्या वर्षी त्यांनी लष्करात नोकरी सुरु केली. जनरल करियप्पा यांनी १९४७ सालच्या भारत पाकिस्तान युध्दावेळी देशाच्या पश्चिम सीमेवर लष्कराचे नेतृत्व केलं होतं.

देशाची फाळणी करण्यात आली तशी लष्कराचीही विभागणी भारत आणि पाकिस्तान या दोन देशात करण्यात आली. त्यावेळी या सैन्याच्या विभागणीची जबाबदारी जनरल करियप्पा यांच्यावर सोपवण्यात आली होती. १९५३ साली जनरल करियप्पा हे सैन्य दलातून निवृत्त झाले.

भारतीय फील्ड मार्शल हे पद सर्वोच्च पद असते. हे पद सन्मानाच्या स्वरुपात देण्यात येत असतं. भारतीय लष्कराच्या इतिहासात आतापर्यंत केवळ दोनच अधिकाऱ्यांना हे पद बहाल करण्यात आले आहे. देशाचे पहिले फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ हे आहेत. त्यांना जानेवारी १९७३ साली फील्ड मार्शल हे पद देण्यात आले. जनरल करियप्पा हे देशाचे दुसरे फील्ड मार्शल आहेत. त्यांना १५ जानेवारी १९८६ साली हे पद बहाल करण्यात आलं.

भारतीय लष्कराची स्थापना ईस्ट इंडिया कंपनीने १७७६ साली केली होती. भारतीय लष्कराची जगातील प्रमुख बलाढ्य लष्करांमध्ये गणना होते. भारतीय लष्कराला गौरवशाली इतिहास आहे. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर चीन आणि पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धात, तसेच कारगीलमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या घुसखोरीच्या वेळी निर्भयपणे भारतीय जवानांनी शत्रुचा पराभव केला. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये देशामध्ये शांतता प्रस्थापित करण्यामध्येही जवानांचा सहभाग आहे. २०१३ साली उत्तराखंडमध्ये पुराच्या वेळी भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन राहत’ हा बचाव कार्यक्रम राबवला होता. हा जगातील सर्वात मोठा बचाव कार्यक्रम होता.

वर्धा
९५६१५९४३०६

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button