राज्य

बेजबाबदार गर्दी ;रुग्ण संख्या वाढीला निमंत्रण देतेय..

बेजबाबदार गर्दी रुग्ण संख्या वाढीला निमंत्रण देतेय..

 

संपूर्ण देशाचीच कोरोनानं धडकी भरवण्यास सुरुवात केलीय. त्यातच महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळतायत..मात्र तरीही ना सर्वसामान्य नागरिकांना गांभीर्य आहे ना राजकीय नेत्यांना…कोरोनाच्या संसर्गाचा विस्फोट होत असताना, अलोट गर्दी करुन नियमांना हरताळ फासणं सुरु आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट सुरु झालाय. कोरोनासह ओमिक्रॉननं आरोग्य यंत्रणेची चिंता वाढलीय…तिसरी लाट सुरु झाल्याचीही भीती व्यक्त होतेय. पण नागरिक असो की मग राजकीय नेत्यांचे कार्यक्रम, बेजबाबदार गर्दी रुग्ण संख्या वाढला निमंत्रण देतेय…

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सरकारने पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू केले तरी देखील नागपुरातल्या सीताबर्डीवर खरेदीसाठी नागपूरकरांनी अलोट गर्दी बघायला मिळत आहे. ना मास्कचा पत्ता, सोशल डिस्टंसिंग..तिसरी लाट येण्याआधी संपली, या अविर्भावात नागपूरकरांची खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. राजधानी मुंबईतही हीच स्थिती आहे. दादरच्या भाजी मार्केटमध्ये प्रचंड गर्दी झाली. इथंही अनेकांच्या तोंडावर मास्कही नव्हते तर मुंबईतल्या राणी बागेतही मुंबईकरांनी मोठी गर्दी केली…

हे झालं सर्वसामान्य नागरिकांचं…राजकीय कार्यक्रमातही हीच स्थिती आहे…महाराष्ट्रात राजकीय कार्यक्रमांसाठी फक्त ५० लोकांची परवानगी आहे..मात्र शिवसेनेचा मुंबईचा हा कार्यक्रम बघितला असेलच …अंधेरीतल्या डीएन नगरमध्ये मालवणी जत्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. होतं.या मालवणी जत्रोत्सवात हजारोंची गर्दी उसळली होती…विशेष म्हणजे सध्या मुंबईतच सर्वाधिक कोरोना रुग्णांची वाढ होतेय..तरीही कोरोनाला निमंत्रण देणाऱ्या अशा कार्यक्रमांचं आयोजन होतंय.

शिवसेनेपाठोपाठ लातूरमध्ये राष्ट्रवादीच्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यक्रमातही कोरोनाच्या नियमांना हरताळ फासण्यात आला. राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीच्या वतीनं नृत्यं स्पर्धेचं आयोजन केलं होतं. मात्र दयानंद सभागृहात सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवण्यात आला. त्यामुळं राजकीय कार्यक्रमांसाठी काही वेगळी ट्रिटमेंट आहे का ?, असा सवाल उपस्थित होतोय.

दरम्यान, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गंभीर इशारा देताना म्हटलंय की नियम सर्वांनीच पाळायला हवेत. नेत्यांच्याही मुलामुलींची लग्न असली तरिही त्याला वेगळी ट्रीटमेन्ट दिली जाणार नाही, असं वळसे पाटील यांनी म्हटलंय. त्यामुळे नियम पायदळी तुडवणाऱ्यांवर प्रशासनानं कारवाई करावी, असं गृहमंत्री म्हणाले होते.

मात्र नुकत्याच झालेल्या हर्षवर्धन पाटलांच्या मुलीच्या लग्नाच राज्यातील दिग्गज नेते सहभागी झाले होते. त्यांचे फोटोही समोर आले होते. अशातच आता महाराष्ट्र सरकारच्या १० मंत्री आणि २०आमदारांना कोरोना झालाय. त्यातच हर्षवर्धन पाटील यांच्या मुलीचं लग्न चर्चेत आलं नसतं तरच नवल! कारण या लग्नात सहभागी झालेल्या अनेक नेत्यांना कोरोनाची बाधा झालीय…

हर्षवर्धन पाटलांची मुलगी अंकिता पाटील कोरोना पॉझिटिव्ह आलीय. खुद्द हर्षवर्धन पाटलांनाही कोरोना झालाय. राधाकृष्ण विखे पाटील पॉझिटिव्ह आढळलेत. सुप्रिया सुळेंनाही कोरोना झालाय. सुप्रिया सुळेंच्या पतींनाही कोरोना झाला. राष्ट्रवादीचे मंत्री बाळासाहेब पाटलांनाही कोरोनाची बाधा झालीय तर लग्नात सहभागी झालेल्या पंकजा मुंडेही पॉझिटिव्ह आल्यात. तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी, ज्या ठिकाणी ५० पेक्षा अधिक लोक असतील त्या कार्यक्रमात न जाण्याचा निर्णय घेतलाय.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत, हाहा:कार माजला होता. बेड उपलब्ध होत नव्हते. लाखो नागरिकांचे जीव गेले. इतकंच काय, अत्यंसंस्कारासाठी स्मशानभूमीतही जागा नव्हती. त्यामुळं आता पुन्हा जराही हलगर्जीपणा, जीवघेणा ठरु शकतो.

-प्रा डॉ सुधीर अग्रवाल

९५६१५९४३०६

 

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button