राजकीय

नगरपंचायत लोकप्रतिनिधी उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका..!

नगरपंचायत लोकप्रतिनिधी उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका..!

सुपडा साफ आणि बहुमत हे निवडणूक प्रक्रियेतील दोन बाजू

आता सगळीकडे नगरपंचायतच्या विजयाचे वारे हप्ताभर वाहतील. याचा सुपडा साफ, तर त्याचा पलडा भारी यासारखे शब्द कानी पडतात. परंतु या सर्व गोष्टींमधून विजयी लोकप्रतिनिधींनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. आपली स्वच्छ प्रतिमा, पारदर्शक कारभार, विश्‍वासार्हता, सामान्य माणसाबद्दलची तळमळ म्हणून लोकांनी आपणास भरभरून मते दिली. हा माणूस आपल्याशी प्रतारणा करणार नाही, याची जनतेला खात्री वाटली, म्हणूनच डोळे झाकून आपणास मते दिली. आता आपली जबाबदारी वाढली आहे. जाहीरनाम्यात शहर विकासाचे जे स्वप्न दाखवले, ते प्रत्यक्षात आले पाहिजे. ‘शब्द’ खरा झालाच, तर लोक स्वतःहून पुढील वाटचालीत आपल्या पाठीशी राहिल. प्रचंड महासत्ता हातात आली म्हणून ‘उतू नका, मातू नका आणि घेतला वसा टाकू नका’ इतकेच.
गुन्हेगारीने पिचलेल्या मंडळींना निर्भय कारभाराची आशा वाटली म्हणून लोक भारावले. गुन्ह्यांचा आलेख उंचावला आहे. खून, दरोडे, हाणामा-या, बलात्कार, छेडछाड, सोनसाखळी चोरीच्या घटनांचे प्रमाण वाढतेच आहे. भंगार चोरांमुळे उद्योजक त्रस्त आहेत. दारू, मटका अड्डे प्रत्येक झोपडपट्टीत चालतात. नंग्या तलवारी घेऊन दहशत करणारे गल्लीबोळात आहेत. यापुढे असे चित्र दिसणार नाही, याची जबाबदारी आपली आहे. पोलिस हलगर्जीपणा करत असतील तर त्यांच्यावर कार्यवाही करायला हवी.
राजकारणाच्या बाहेरच्या मंडळींना निर्णय प्रक्रियेत घ्या. डॉ. श्रीकर परदेशी किंवा तुकाराम मुंडे यांच्यासारखे आयुक्त किंवा इतर व्यक्तिमत्त्व आले तर आणि तरच वाकडे शेपूट सरळ होईल. टक्का मागणाऱ्यांचे ‘स्टिंग ऑपरेशन’ करा म्हणजे लाच देणे घेणे बंद होईल आणि पारदर्शक कारभार शक्‍य होईल. नगरपंचायत सभा, स्थायी समितीसह सर्व विषय समित्यांच्या सभांचा कारभार माध्यमांना खुला करण्याचे आश्‍वासन पहिल्या दिवसापासून अमलात आणले तर लोकांना खात्री पटेल. या महिन्यापासून प्रत्येक प्रभागातील नागरिकांच्या उपस्थितीत ‘वार्ड सभा’ ही संकल्पना जी कायद्याने बंधनकारक केली आहे, ती सुरू करा. न्यायालयाचेही तसे आदेश आहेत. नगरपंचायतच्या अर्थसंकल्पात लोकांचा सहभाग वाढला पाहिजे. या अर्थसंकल्पापासून त्या कामाला पूर्वीपेक्षा अधिक गती दिली तर लोकांनाही आपण निर्णय प्रक्रियेत असल्याचा आनंद होईल. ज्यामुळे माहिती कायद्याचा वापर करण्याची गरजच पडणार नाही इतकी पारदर्शकता आली पाहिजे. काही ‘ब्लॅकमेलर’ मंडळींना प्रथम गजाआड करा, म्हणजे प्रशासनातील कार्यक्षम अधिका-यांचे काम सुरळीत चालेल.
सर्व नगरपंचायत सेवकांची मालमत्ता दरवर्षी कुठे, किती आहे? हे दर्शविणारे फलक नगरपंचायतीत लावले पाहिजेत. आयुक्तांसह अधिका-यांचे वेतन किती, मालमत्ता किती? हे पालिकेच्या वेबसाइटवर देणे बंधनकारक आहे. आजपर्यंत हे झालेले नाही, ते तुम्ही करून दाखवले तर ‘पारदर्शक कारभार आहे’, असे लोक म्हणतील. आजवर उधळपट्‌टी खूप झाली. यापुढे ‘लोकांच्या मागणीनुसार कामाचा प्राधान्यक्रम’, असे धोरण ठेवले पाहिजे. जेणेकरून दरवर्षी प्रत्येक कामातून होणारी लूट थांबेल. सहा प्रभागांसाठी 100-150 कोटींची कामे होतात. त्यातील अर्धीअधिक फक्त कागदोपत्री असतात. आपण हे थांबवले पाहिजे. जिथे काम चालू असेल तिथे तो ठेकेदार कोण, कामाचा खर्च किती, काम पूर्णत्वाला कधी जाणार? कामाची शाश्‍वती आदी तपशिलाचे फलक लावा, तरच खरी पारदर्शकता येईल. आता तुमची वेळ आहे. पाहू जमते का ?
मागिल गोष्टी विसरा आणि आपल्या राजकिय अनुभवाचे पोवाडे गात बसू नका? आजच्या जनरेशनपुढे आपल्या अनुभवाचे पोवाडे काहीच कामाचे नाही याचं भान ठेवा. आपल्याकडे येणा-या कोणत्याही व्यक्तीचे प्रश्न सोडवता आले पाहिजे. इथे राजकिय पक्षपात केल्या जाऊ नये. आपल्याकडे येणारी व्यक्ती ही विरोधी पक्षाची असली तरी, ती आपल्याकडे का आली? याचा विचार करणे गरजेचं आहे? तो कुणाच्या माध्यमातून आला किंवा तो आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून का आला नाही ही घोकमपट्टी करत बसू नका. तो तुमच्या व्यक्तीमत्त्वाकडे व तुमच्या कार्यप्रणालीकडे पाहून एक आशा घेऊन आलेला असतो. त्यामुळे त्याचे प्रश्न सोडवलेच पाहिजे.
समजा आपल्याकडे येणारी व्यक्ती ही आपल्याच पक्षाच्या पाठीशी ब-याच वर्षापासून एकनिष्ठ असेल आणि तो तुमच्याकडे अडचणी घेऊन आला असेल तर तेव्हा आपण काय कराल? आपण स्थानिक गाव पातळीवरील आपल्या कार्यकर्त्याला विचाराल की, अमुक-अमुक व्यक्ती आला आहे. तर तो आपल्या पक्षाचा आहे का? त्याचं काम करायचं की नाही? या व अशा चौकशा कराल तर इथूनच तुमच्या कार्यप्रणालीच्या अधोगतीस सुरुवात होईल. कारण तो तर व्यक्ती आपल्याच पक्षाशी एकनिष्ठ आहे. परंतु त्याच्याशी स्थानिक गाव पातळीवरील आपल्या कार्यकर्त्याचं पटत नसतील तर तो आपणास त्याच्या विरोधातच सांगेल की नाही? कारण आमदार व खासदार हे लोकं असेच करतात. त्यांच्यासारखं तुम्ही तरी करू नका. यामुळे होतं काय? तर त्याचा आपल्यावरचा विश्वास तर उडेलच, सोबतच आपल्या पक्षावरचा पण उडेल.
अशा गोष्टी ब-याच गाव पातळीवर घडलेल्या आहे आणि अजूनही घडत आहे. त्यामुळे अशा गोष्टी आपल्याकडून घडू नये. आपणाला राजकारण करायला लोकांनी निवडून दिलं नाही, तर लोकांची सेवा करायला निवडून देण्यात आलं. त्यामुळे लोकांची सेवा हेच आपले आद्यकर्तव्य आहे. त्यामुळे आपल्याकडे काम घेऊन येणारी वक्ती ही कोणत्याही पक्षाची का असेना? त्याचं काम करायची तयारी ठेवलीच पाहिजे. आधी आपण लोकांच्या पायाशी लोटांगण घातले म्हणजे आमच्याकडे लक्ष द्या व आम्हालाच मतदान करा, असे म्हणत त्यांचे चरणस्पर्श केले आहेत. तर आता आपण पदावर चढले म्हणून याचा विसर पडू देऊ नका? आणि आपली औकात दाखवू नका? कारण पदाचा कालावधी संपला की, दाखवलेली औकात जागच्या जागीच येत असते. म्हणून एवढंच सांगणे आहे की, जनतेला जे वचनबद्ध शब्द दिलेत ते पाळायला पाहिजे. नि:स्वार्थ सेवा व पक्षपात कार्य आपल्याकडून व्हायला पाहिजे हिच सदिच्छा.!

 

शब्दस्पर्शी- सुनील शिरपुरे
कमळवेल्ली, यवतमाळ
भ्रमणध्वनी-7057185479

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of MPhil in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button