चीनची सामान्य जनतेवरही कुरघोडी..

चीनची सामान्य जनतेवरही कुरघोडी..
भारतीय हद्दीत घुसखोरी करून भारताची वारंवार कुरापत करणाऱ्या चिनी सैन्याने भारतीय हद्दीमध्ये घुसखोरी करून अरुणाचल प्रदेश येथून १७ वर्षीय भारतीय मुलाचे अपहरण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याच्या सुटकेकरिता भाजप खासदाराने केंद्राकडे ट्विट करत विनंती केली आहे. अरुणाचल प्रदेशचे खासदार तापीर गाओ यांनी ही माहिती ट्विट करत दिली आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (PLA) राज्यामधील भारतीय हद्दीत अपर सियांग जिल्ह्यात एका १७ वर्षीय तरुणाचे अपहरण करण्यात आले आहे.
चीननं एकीकडे भारतासोबत चर्चा सुरू ठेवली असली तरी दुसरीकडून आपली घुसखोरीदेखील सुरु ठेवल्याचं सांगितलं जातंय. विस्तारवादी भूमिकेत असलेल्या चीनकडून सातत्यानं भारताच्या कुरापती काढल्या जात असून त्याचा फटका आता भारतातील सर्वसामान्य नागरिकांना बसू लागल्याचं चित्र आहे.
अपहरण झालेल्या तरुणाचे नाव मिराम तारोन असे आहे. अरुणाचल प्रदेशात शियांग नदी भारतात प्रवेश करते. तेथील ठिकाणाजवळच ही धक्कादायक घटना घडल्याचे खासदार गाओ यांनी यावेळी सांगितले आहे. याअगोदर गाओ यांनी ट्विट करत किशोरच्या अपहरणाची माहिती देण्यात आली होती. ‘१८ जानेवारी दिवशी चिनी सैन्याने अरुणाचलमध्ये भारतीय हद्दीमध्ये घुसखोरी करण्यात आली होती होती.
सीमेवरील अप्पर सियांग जिल्ह्यात लुंगता जोर येथे त्यांनी मीरम तरोन आणि त्याचा मित्र जॉनी यायिंग यांचे अपहरण केले होते. हे दोघेही झिडो गावामधील राहणारे आहेत. मीरमचा दोस्त चिनी सैन्याच्या तावडीतून निसटला आहे. मात्र, मीरमचा कोणताच पत्ता लागला नाही. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. तसेच, मीरमच्या मित्राने संपूर्ण घटनाक्रम भारतीय लष्कराला सांगितले आहे.
मीरमच्या सुटकेकरिता केंद्र सरकारच्या सर्व संबधित यंत्रणांनी तातडीने पावले उचलावी, अशी विनंती गाओ यांनी यावेळी केली आहे. गाओ यांनी आपल्या ट्वीटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना टॅग केले आहे. याबरोबरच त्यांनी दोघांचा फोटो देखील शेअर केला आहे. याअगोदर चिनी सैन्याने भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती.
या आधी देखील अरुणाचल प्रदेशातून पाच तरुणांना चिनी सैन्याच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने ताब्यात घेतले होते.
सप्टेंबर २०२० मध्ये पाच नागरिकांचे अपहरण केले होते. भारताच्या दबावानंतर मात्र काही दिवसांनी चीनच्या लष्कराने या पाच भारतीय युवक ताब्यात असल्याची कबुली दिली होती. अरुणाचल प्रदेशमधील सुबनसिरी जिल्ह्यातील भारत-चीन सीमेवरील जंगलात गेलेल्या सात पैकी पाच युवकांचे चिनी सैन्याने अपहरण केले होते. प्रकाश रिंगलिंग या व्यक्तीने सोशल मीडियावर ही बाब समोर आणली होती. टोच सिंगकम, प्रसात रिंगलिंग, डोंगटू एबिया, तनु बाकेर आणि गारू डिरी अशी या युवकांची नावे.भारताच्या दाबावंतर या युवकांना चीन भारताकडे सुपूर्द केले होते.
चीन वारंवार भारतीय भूभागात घुसखोरी करत भारताची कुरापत काढत असतो.अरूणाचल प्रदेशावर तर चीनने दावा केला असून चीन अरुणाचल प्रदेशला दक्षिण चीनचा भाग समजतो.भारताने चीनचा हा दावा अनेकदा फेटाळून लावला आहे.चीनने पेंगॉग तलावाच्या परिसरात पुलाचं बांधकाम सुरू केल्याची छायाचित्रे काही दिवसांपूर्वीच समोर आली होती. चीन भारताच्या सीमेजवळील भागात बांधकाम करत असून भारतावरील दबाव वाढवण्याचा सातत्यानं प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच म्हणजेच १ जानेवारीला भारत आणि चीन या दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांना भेटले होते आणि शुभेच्छा देत मिठाईचं वाटप केलं होतं. मात्र त्यानंतर आता चीननं आपला खरा रंग दाखवायला सुरुवात केली असून अल्पवयीन मुलाचं अपहरण करून आपले इरादे उघड केल्याचं दिसून येत आहे.
प्रा डॉ सुधीर अग्रवाल
९५६१५९४३०६