दहावी-बारावीच्या परीक्षा ;विद्यार्थी ऑनलाईनसाठी तर मुख्याध्यापक संघटनेचा ऑफलाइनचा आग्रह

दहावी-बारावीच्या परीक्षा ;विद्यार्थी ऑनलाईनसाठी तर मुख्याध्यापक संघटनेचा ऑफलाइनचा आग्रह
राज्यात अनेक ठिकाणी दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाइन घ्याव्यात या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. नागपूर, औरंगाबाद, मुंबई आणि उस्मानाबादमध्ये काही विद्यार्थी रस्त्यावर उतरले. या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे कुणाचे नेतृत्त्व आहे? या विद्यार्थ्यांना कोण भडकवत आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, ऑफलाइन परीक्षेला विरोध करण्यासाठी मुलं रस्त्यावर उतरले असताना कोरोना नियमांचं तिनतेरा वाजल्याचं चित्र आहे.
दहावी-बारावी बोर्ड परीक्षा काही दिवसांवर आलेली असताना ही परीक्षा नेमकी वेळापत्रकानुसार होणार की लांबणीवर जाणार? याबाबत सध्यातरी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने वेळापत्रकानुसारच होईल असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. मात्र 15 फेब्रुवारीपर्यंत या निर्णयाबाबत वेट अॅन्ड वॉचची भूमिका असून दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलायच्या की नाही? ते त्या वेळच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन ठरवलं जाईल, असंही शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं. तर दुसरीकडे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पुरासा वेळ मिळावा यासाठी परीक्षा एक महिना पुढे ढकलण्यात याव्यात अशा प्रकारचा प्रस्ताव शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी समोर ठेवला आहे. त्यामध्ये दहावी-बारावी बोर्ड परीक्षा देणारे विद्यार्थी आणि पालकांनीसुद्धा परीक्षा संदर्भात संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
बोर्डाचा अभ्यासक्रम ऑनलाइन आणि ऑफलाइन शिकवत शाळेने जरी पूर्ण केला असला, तरी स्वत:ला तयारीसाठी आणखी पुरेसा वेळ हवा आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलली तर अभ्यासाची तयारी पूर्ण होईल, असं काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. तर परीक्षा वेळापत्रकानुसार झाली तर पुढे परीक्षांचा निकाल, अकरावी प्रवेशप्रक्रिया वेळेत होईल. शिवाय विद्यार्थ्यांमध्ये कुठल्याही प्रकारे संभ्रमाचे वातावरण राहणार नाही, असं सुद्धा काही पालक आणि विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.
औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शंभरपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी एकत्र येत दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यासाठी निदर्शने केली. मार्च-एप्रिल महिन्यात होणा-या दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यासाठी औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. कोरोनामुळे शाळा बंद होत्या, त्यामुळे विद्यार्थ्यांचा ऑनलाइन पद्धतीने हवा तसा अभ्यास झाला नसून, परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. तसेच जोपर्यंत पेपर पुढे ढकलले जात नाही, तोपर्यंत परीक्षा देणार नाही अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद आहे, त्यामुळे अभ्यासाचा हवा तसा सराव झालेला नाही. ऑनलाइन क्लास करताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागल्याने त्याचा परिणाम अभ्यासावर झाला आहे. तसेच अभ्यास व लिखाणाचा सराव देखील झालेला नाही. त्यामुळे एक महिन्याचा वेळ अभ्यासासाठी देत, मार्च एप्रिलमध्ये होणा-या परीक्षा एक महिन्यासाठी पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली. सरकारने एक महिन्याचा कालावधी आम्हाला द्यावा, अन्यथा आम्ही परीक्षा देणार नाही. तसेच पुढील सहा दिवसांमध्ये यावर निर्णय घ्यावा अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा विद्यार्थ्यांनी यावेळी दिला.
दहावी-बारावी ऑफलाइन परीक्षेसह होम सेंटर असावेत असा आग्रह मुख्याध्यापक संघटनेचा आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत होम सेंटरवर मंडळाने विचार करावा असे मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे, यावर मंडळही तसा आढावा घेत असल्याची माहिती मिळाली. कोरोना प्रादुर्भाव वाढतो आहे. मागील वर्षी दुस-या लाटेत परीक्षा रद्द करत अंतर्गत मूल्यमापन यावर विद्यार्थ्यांना गुण देण्यात आले. २०२२ परीक्षांचे वेळापत्रक मंडळाने जाहीर केले असून परीक्षा घेण्यावर मंडळ ठाम आहे. रुग्ण संख्या वाढत असल्याने परीक्षा ऑनलाइन किंवा परीक्षा पुढे अशा चर्चा होत आहेत. याबाबत आता मुख्याध्यापक संघाने परीक्षा ऑफलाईनच घेण्याचा आग्रही भूमिका मांडली आहे. मंडळ अध्यक्षांना याबाबत पत्र देत मुख्याध्यापक संघटनेच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. कोरोना प्रादुर्भावामुळे अभ्यासक्रम शिकवताना अनेक अडचणी आल्या परंतु अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे.
मंडळाने परीक्षा ऑफलाइनच घ्याव्यात. सोबतच शाळा तेथे केंद्र याप्रमाणे मंडळाने नियोजन करावे. लेखी परीक्षेत अंतर देऊ नये. दररोज एका विषयाची परीक्षा घ्यावी, कारण पूर्वीसारखी परीक्षा केंद्रावर गर्दी होणार नाही. शाळा तेथे केंद्र असेल तर शाळा स्तरावर नियोजन करणे अधिक सोयीचे ठरेल, असे मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव लक्षात घेत यावर्षीही दहावी-बारावीचा २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात आला. शाळांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचा दावाही शिक्षक मुख्याध्यापकांनी केला आहे. ऑनलाइन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे सांगण्यात येते.
ऑनलाइन शिक्षणात शंभर टक्के विद्यार्थी सहभागी नाहीत. दहावी-बारावी अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. ऑनलाइन परीक्षेचे नियोजन मंडळाला अडचणीचे ठरेल. इंटरनेट कनेक्टिव्हिटी सगळीकडे परिपूर्ण नाही. इंटरनेट कनेक्टिविटीच्या अडचणी लक्षात घेत परीक्षा ऑनलाइन घेणे सोपे नाही. शिक्षकांनाही याबाबत प्रशिक्षण द्यावे लागेल, त्यालाही मंडळाकडे पुरेसा वेळ नाही. अशा अनेक अडचणी विचारात घेता परीक्षा ही ऑफलाइन घ्यायला हवी, असे शिक्षकांचे म्हणणे आहे. परीक्षा ऑफलाइनच व्हायला हव्यात. कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षापुरते होम सेंटर देण्यात यावे. असे केले तर वेगवेगळ्या शाळांमधील विद्यार्थी एकमेकांच्या संपर्कात येणार नाहीत. संक्रमणावर नियंत्रण मिळवता येईल, दुर्दैवाने जर एखादा विद्यार्थी कोरोनाबाधित आढळला तर संबंधित विद्यार्थ्यांची शाळा स्तरावरच माहिती उपलब्ध असेल त्यामुळे पुढील उपाययोजना करने सोपे होईल.
शब्दस्पर्शी- सुनील शिरपुरे
कमळवेल्ली, यवतमाळ
भ्रमणध्वनी-7057185479