हिंगणघाट जळीतकांड: प्रा.अंकिता पिसुड्डेला अखेर स्मृती दिनी न्याय
हिंगणघाट जळीतकांड: प्रा.अंकिता पिसुड्डेला अखेर स्मृती दिनी न्याय
मानसिक विकृत आरोपी विकेश नगराळेला आजन्म कारावास
एकतर्फी प्रेमातील विकृत मानसिकतेच्या प्रत्यक्ष दर्शनाने वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट ह्या शहरातील एका जळीत कांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. हिंगणघाट तालुक्यातील अंकिता पिसुड्डे नामक प्राध्यापिकेला 3 जानेवारी 2020 चा प्रभात कर्दनकाळ ठरला. अंकिता पिसुड्डेला दोन वर्षांपूर्वी जाळून मारण्यात आले होते. या जळीत प्रकरणातील आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याला न्यायाधिशांनी दोषी ठरविलं होतं. अंकिताला जिवंत पेटवून देणा-या विकेश नगराळे विरुद्ध 302 चा गुन्हा सिद्ध झाला. घटनेच्या दिवशी सकाळी प्राध्यापिका कॉलेजला जात असताना आरोपी विकेश नगराळे यांने अंकिताचा पाठलाग केला. तू माझ्याशी लग्न का करीत नाही? अशी विचारपूस केली. तिने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. तुझं लग्न झालेले आहे. तू माझ्या मागे का लागतो आहे? मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. तू तुझ्या लग्नाच्या बायकोशी सुखाने संसार कर! मी तुझ्यावर प्रेम करत नाही. असे अंकिता विकेश ला बोलली. पण आरोपी विकेश नगराळे ऐकायलाच तयार नव्हता. विकेश नेहमीच अंकिताचा पाठलाग करून लग्नाची गळ घालत असायचा.
पण अंकिता सभ्य मुलगी होती. तिला आपलं करिअर घडवायचं होतं. तिने आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करुन प्राध्यापिका बनली होती. अंकिता पिसुड्डे आणि आरोपी विकेश नगराळे हे दोघेही हिंगणघाट तालुक्यातील दारोडा गावचे रहिवासी होते. त्यामुळे अंकिता ज्या बसने जाणे-येणे करायची, त्याच बसने आरोपी विकेश सुद्धा रोज येणे-जाणे करायचा व तिला त्रास देत असायचा. अंकिताने त्याच्या विरोधात पोलिसात तक्रारही दिली होती. त्यानंतर काही दिवस निघून गेले. कालांतराने तो परत अंकिताचा पाठलाग करु लागला आणि मानसिक त्रास देऊ लागला. विकेश हा विवाहीत होता. त्याचे अंकितावर एकतर्फी प्रेम असल्यामुळे तो तिच्यावर जबरदस्ती करू लागला. तू माझ्याशी लग्न कर, नाहीतर परिणाम फार वाईट होतील. अशी धमकीच विकेशने अंकिताला दिली होती. 3 फेब्रुवारी 2020 ला विकेश अंकिताची वाट पहात नंदोरी चौकात दबा धरून बसला होता. नेहमीप्रमाणे अंकिता नंदोरी चौकातून कॉलेजला पायदळ निघाली होती. सकाळची वेळ असल्यामुळे रस्त्याने जास्त वर्दळ नव्हती. याच निरव शांततेचा पुरेपूर फायदा घेऊन विकेशने हिंगणघाट येथील नंदोरी चौकात अंकिताचा पाठलाग केला आणि अंकिताच्या अंगावर विकेशने पेट्रोलची बाटली ओतून आग लावली. त्यामध्ये अंकिता गंभीररित्या भाजली गेली होती आणि उपचारादरम्यान 10 फेब्रुवारी 2020 रोजी अंकिताने शेवटचा श्वास घेतला.
ह्या खुनाचा आरोपी विकेश नगराळे याला न्यायालयीन कोठडी झाली. त्यानंतर आज पर्यंत तारीख पे तारीख चालत आली. आरोपी विकेश नगराळे याला सरकारी पक्षाने न्यायालयात खुणाचा आरोपी म्हणून जाहीर केलं. विकेश विरोधात आरोप सिद्ध झाले असे न्यायालयाने बुधवार दि. 9 फेब्रुवारी 2022 रोजी घोषित केल्याची माहिती विशेष सरकारी अभियोक्ता उज्ज्वल निकम यांनी दिली. उज्ज्वल निकम यांनी सरकारतर्फे न्यायालयाला विनंती केली की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे आरोपीला आरोप सिद्ध झाल्यानंतर शिक्षा दुस-या दिवशी जाहीर करावी. एखाद्या आरोपीला खुनाच्या आरोपात दोषी ठरविण्यात आल्यानंतर शिक्षेबद्दल युक्तिवाद काय आहे? त्यासाठी एक दिवसाची मुदत दिली जाते. आरोपीला त्याचं म्हणने कोर्टासमोर सादर करावं लागतं. आरोपी विकेश नगराळे याचे क्रौर्य पाहता त्याला कोणती शिक्षा ठोठवावी? या संदर्भातील तक्ता सरकारी पक्षातर्फे आम्ही न्यायालयात सादर करू असंही अभियोक्ता उज्ज्वल निकम यांनी सांगितलं होतं. तसेच आरोपी तर्फे त्याला कुठली शिक्षा असावी? यासाठी आरोपीतर्फे युक्तिवाद केला जाईल. या दृष्टिकोनातून न्यायालय गुरुवार दि.10 फेब्रुवारी 2022 रोजी शिक्षा जाहीर करेल असे उज्ज्वल निकम यांनी सांगितलं.
वर्धा जिल्ह्यातील प्राध्यापिका अंकिता पिसुड्डे जळीतकांड प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर हिंगणघाटच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय परिसरात चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. निकालाकडे सा-या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. त्यामुळे निकालाच्या उत्सुकतेपोटी लोकांनी फार गर्दी केली होती. निकालानंतर काही अनुचित प्रकार घडू नये, या पार्श्वभूमीवर हिंगणघाट परिसरात चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हिंगणघाट येथील बहुचर्चित अंकिता जळीतकांड प्रकरणात सरकारी आणि आरोपी पक्षातर्फे युक्तिवाद पूर्ण झाला. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे 29 साक्षीदार तपासण्यात आले.
या प्रकरणाच्या खटल्यात दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपल्यानंतर बुधवार दि. 9 फेब्रुवारी 2022 रोजी न्यायालयाने या प्रकरणातील आरोपी विकेश नगराळे ला दोषी असल्याचे म्हटले होते. या प्रकरणाचा शिक्षेविषयी पुढील निकाल गुरवार दि.10 फेब्रुवारी 2022 ला न्यायालय देणार होते. सरकारी अभियोक्ता उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे की, जळीतकांड प्रकरणात न्यायाधीशांनी आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याला दोषी ठरविलं होतं. हा त्याचा आरोप त्याच्या विरुद्ध सिद्ध झाला असे न्यायालयाने म्हटले होते.
पिडीत अंकिता ही मातोश्री आशा कुणावार महिला महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची अर्धवेळ प्राध्यापिका म्हणून कार्यरत होती. पीडित अंकिता पिसुड्डे ही 3 फेब्रुवारी 2020 ला सकाळी आपल्या घरातून नेहमीप्रमाणे महामंडळाच्या बसणे हिंगणघाट ला पोहोचली. नंदोरी चौकातून कॉलेजच्या दिशेने पायदळ जात असताना आरोपी विकेश नगराळे दबा धरून अंकिताची वाट पाहत बसलेला होता. अंकिता नजरेला पडताच विकेशने अगोदरच दुचाकीतील पेट्रोल काढून ठेवलेली बॉटल अंकिताच्या अंगावर ओतून तिला पेटवून दिले. त्यात गंभीररीत्या भाजलेल्या पीडित अंकितावर नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू झाला. मात्र एका आठवडाभरानंतर मृत्यूशी झुंज देत असलेल्या अंकिता पिसुड्डे हिने 10 फेब्रुवारी 2020 रोजी अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला. या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात आला.
या प्रकरणात 3 फेब्रवारी 2020 ला प्राध्यापिका अंकिता महाविद्यालयाला जात असताना आरोपी विकेश नगराळेने मागून येत अंगावर पेट्रोल टाकून जाळले. त्यानंतर 4 फेब्रवारी 2020 ला आरोपीला बुटीबोरी येथून अटक करण्यात आले. 10 फेब्रुवारी 2020 ला अंकिताचा नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. महिला तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलिस अधिकारी तृप्ती जाधव यांनी न्यायालयीन कामकाजाच्या 19 दिवसात दोषारोप पत्र पूर्ण केले. शिवाय 28 फेब्रुवारी 2020 ला या प्रकरणातील दोषी आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याच्या विरुद्ध तब्बल 426 पानाचे दोषारोप पत्र हिंगणघाटच्या प्रथम श्रेणी न्यायालयात दाखल केले होते. या खटल्याची पहिली सुनावणी 4 मार्च 2020 ला झाली आणि आरोपी विकेशवर आरोप निश्चित झाला.
या खटल्यात 29 साक्षीदार महत्त्वाचे ठरले. दोन्ही बाजूंनी 45 तास युक्तिवाद चालला. यात 24 महिने आणि 66 तारखांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यातील एकही साक्षीदार उलटला नाही. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे एकूण 77 साक्षीदार होते. परंतु प्राचार्य डॉ. उमेश तुळसकर, उपविभागीय पोलिस अधिकारी तृप्ती जाधव, पोलिस निरीक्षक सत्यवीर बंडीवार, पंच नागपूरच्या श्रीमती देशमुख, अंकिताचे आईवडील, कार्यकारी दंडाधिकारी नायब तहसीलदार विजय पवार, नागपूर मेडिकल कॉलेजचे तीन डॉक्टर, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर, जिओ कंपनीचे नोडल ऑफिसर फ्रान्सिस परेरा, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अशा आवश्यक 29 जनांची साक्ष नोंदवण्यात आली. तसेच अंकिताचे घटनेच्या दोन दिवस आधी म्हणजे 1 फेब्रवारीला 8 वाजून 8 मिनिटांनी आरोपी विकेश नगराळे याच्याशी झालेले 40 सेकंदाचे संभाषण महत्त्वाचे ठरले. आरोपीने तू माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली होती. जिओ कंपनीच्या अधिका-यांच्या साक्षी दरम्यान ही बाब पुढे आली. कोरोना प्रादुर्भावामुळे जिओ कंपनीचे पुण्याचे नोडल अधिकारी फ्रान्सिस परेरा प्रत्यक्ष सुनावणीत सहभागी होऊ न शकल्याने त्यांची साक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोंदवण्यात आली. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात या प्रकरणात प्रथमच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष नोंदवण्यात आली. अखेर गुरुवार 10 फेब्रुवारी 2022 रोजी आरोपी विकेश नगराळे याला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.
या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. 10 फेब्रुवारी 2020 रोजी उपचारादरम्यान पीडित अंकिता पिसुड्डे हिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. दरम्यान, एका तरुण शिक्षिकेला रस्त्यावर अशा पद्धतीने जिवंत जाळल्या गेल्यामुळे हिंगणघाट आणि ग्रामीण भागात वातावरण मोठ्या प्रमाणावर बदलल्याचे मतही अनेक शिक्षिका आणि विद्यार्थिनींनी व्यक्त केले आहे. जळीत हत्याकांडाच्या त्या दुर्दैवी घटनेनंतर महिला आणि मुलींच्या बाबतीत घरातून अनेक बंधनं लादली गेल्याचं त्यांचं मत आहे. एकटे बाहेर जाण्यापासून जास्त वेळ बाहेर राहण्याबद्दल ही निर्बंध असल्याचे महिला शिक्षिका आणि विद्यार्थिनींचे मत आहे.
शब्दस्पर्शी- सुनील शिरपुरे
कमळवेल्ली, यवतमाळ
भ्रमणध्वनी-7057185479