रशिया आणि युक्रेनमधील वादाचं मूळ ! -प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल
रशिया आणि युक्रेनमधील वादाचं मूळ ! -प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल
अनेक दिवसांच्या तणाव आणि भीतीनंतर अखेर आज रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध पेटलं. या युद्धामुळे युरोपात महायुद्ध आणि तिसऱ्या महायुद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. रशियानेही पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरण्याची घोषणा केली, तर अमेरिकेच्या नेतृत्वाखाली नाटोही मैदान ताब्यात घेऊ शकते. युक्रेनने प्रत्युत्तरादाखल हल्ले सुरू केले आहेत. अशा परिस्थितीत या वादाचे मूळ काय आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाची सुरुवात झाली आहे. डोनेस्तक आणि लुहान्स्क यांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिल्यानंतर रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनमध्ये सैन्य पाठवलं आहे. या माध्यमातून रशिया युक्रेनवर हल्ला करण्याचा बहाणा करत असल्याबद्दल अमेरिकेसह युरोपीय देश चिंता व्यक्त करत आहेत.
सध्या जगाची चिंता वाढवणाऱ्या रशिया आणि युक्रेनमधील वादाचं मूळ नाटो (NATO) असल्याचं मानलं जात आहे. NATO म्हणजे, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. ज्याची सुरुवात १९४९ मध्ये झाली. युक्रेनला नाटोमध्ये सामील व्हायचं आहे, परंतु रशियाची अशी इच्छा नाही.
युक्रेन नाटोमध्ये सामील झाल्यास नाटो देशांच्या लष्कराची मदत युक्रेनला होईल, असं रशियाला वाटतंय.
दरम्यान, दुसरं महायुद्ध १९३९ते १९४५ दरम्यान झालं. यानंतर सोव्हिएत युनियननं पूर्व युरोपातील भागांतून सैन्य मागे घेण्यास नकार दिला. १९४८मध्ये बर्लिनलाही वेढा घातला गेला. यानंतर अमेरिकेनं १९४९ मध्ये सोव्हिएत युनियनचं विस्तारवादी धोरण थांबवण्यासाठी नाटो (NATO) ची स्थापना केली. जेव्हा नाटो (NATO) ची स्थापना झाली, तेव्हा त्यात युनायटेड स्टेट्स, ब्रिटन, फ्रान्स, कॅनडा, इटली, नेदरलँड्स, आइसलँड, बेल्जियम, लक्झेंबर्ग, नॉर्वे, पोर्तुगाल आणि डेन्मार्क यांच्यासह १२ देशांचा समावेश होता. आज नाटोमध्ये ३० देशांचा समावेश आहे.
नाटो ही एक लष्करी युती आहे. ज्याचा उद्देश समान सुरक्षा धोरणावर काम करणं आहे. जर एखाद्या परदेशी देशानं नाटो देशावर हल्ला केला, तर तो उर्वरित सदस्य देशांवर हल्ला मानला जाईल आणि त्या देशाचं संरक्षण करण्यासाठी नाटोमध्ये सहभागी असलेले सर्व देश मदत करतील.
रशियाला नाटो (NATO) चा द्वेष का?
दुसरे महायुद्ध संपल्यानंतर जग दोन गटांमध्ये विभागलं गेलं. दोन महासत्ता होत्या. एक अमेरिका आणि एक सोव्हिएत युनियन. याला शीतयुद्धाची सुरुवातही मानलं जातं.२५ डिसेंबर १९९१ रोजी सोव्हिएत युनियन विघटन झालं. त्यानंतर १५ नवीन देश निर्माण झाले. हे १५ देश म्हणजे आर्मेनिया, अझरबैजान, बेलारूस, एस्टोनिया, जॉर्जिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, लाटविया, लिथुआनिया, मोल्दोव्हा, रशिया, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, युक्रेन आणि उझबेकिस्तान.
सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर जगात एकच महासत्ता शिल्लक राहिली ती म्हणजे, अमेरिका. त्यानंतर अमेरिकेच्या नेतृत्त्वाखाली असलेल्या नाटो ( NATO )ची व्याप्ती वाढतच गेली. सोव्हिएत युनियनमधून बाहेर पडलेले देश NATO मध्ये सहभागी होत गेले. २००४ मध्ये इस्टोनिया, लातविया आणि लिथुआनिया NATO मध्ये सहभागी झाले. तर २००८ मध्ये जॉर्जिया आणि युक्रेन यांनाही NATO मध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रण देण्यात आलं. परंतु, दोन्ही देश नाटोमध्ये सहभागी होऊ शकले नाहीत.
नाटो (NATO)च्या विस्तारावर रशियन राष्ट्रपती पुतिन यांचा आक्षेप होता. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पुतिन म्हणाले होते की, “पूर्वेकडील नाटोचा विस्तार मान्य नसल्याचं आम्ही स्पष्ट केलं आहे. अमेरिका क्षेपणास्त्रं घेऊन आपल्या दारात उभी आहे. कॅनडाच्या किंवा मेक्सिको सीमेवर क्षेपणास्त्रं तैनात केली तर अमेरिकेला कसं वाटेल?”
दरम्यान, असं म्हटलं जातंय की, एक वेळ होती, त्यावेळी पुतिन यांना रशियाचाही नाटो( NATO) मध्ये समावेश करायचा होता. पण आता पुतिनच नाटोचा द्वेष करु लागले आहेत. एस्टोनिया, लॅटव्हिया, लिथुआनिया आणि रशियाच्या सीमेवर असलेलं तुर्की हे नाटोचं सदस्य आहेत. जर युक्रेनही नाटोमध्ये सामील झालं तर रशियाच्या सीमा पूर्णपणे घेरल्या जातील. युक्रेन नाटोमध्ये गेल्यास भविष्यात नाटोची क्षेपणास्त्रं काही मिनिटांत युक्रेनच्या भूमीवर उभी राहतील. हे रशियासाठी मोठं आव्हान आहे, असा युक्तिवाद पुतिन यांनी केला आहे.
९५६१५९४३०६