आयुष्य सुंदर करता येईल..
आयुष्य सुंदर करता येईल..
वस्तू किंवा गोष्ट……..कोणतीही गोष्ट ही वाईट असतेच असे नाही. त्या गोष्टी वाईट नसतात. तसेच कोणतीही गोष्ट ही चांगली असतेच असे नाही. प्रत्येक गोष्ट चांगलीच असते. मात्र आपला त्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोण वाईट असेल, तर ती गोष्ट आपल्याला वाईटच दिसत असते आणि आपला त्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोण जर चांगला असेल, तर आपल्याला त्या गोष्टी चांगल्या दिसत असतात.
जगात अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या चांगल्याही आहेत आणि वाईटही. परंतू आपला दृष्टिकोणच त्या गोष्टींना कमी अधिक प्रमाणात चांगलं वाईट ठरवत असे. दिवसानंतर रात्र होणे आणि रात्रीनंतर दिवस होणे या नैसर्गीक गोष्टीच आपल्याला जगात कसं वागावं आणि कसं नाही ते सांगत असतात आणि ती एकच गोष्ट असते की त्या गोष्टीला एक व्यक्ती किंवा व्यक्तीसमुदाय वाईटचा दर्जा देतो तर दुसरा व्यक्ती किंवा व्यक्तीसमुदाय चांगल्याचा दर्जा देतो. उदा. लेखक म्हणून लेख लिहिणारी काही मंडळी. ते लेख लिहितात त्यावेळी त्यांच्या मनात चांगली किंवा वाईट भावना नसते. ते जगाचा विचार करीत त्या जगातील वैश्वीक समस्या सुटाव्या म्हणून लेख लिहित असतांना काही लोकं जे वाईट विचारांचे किंवा त्या लेखाच्या विरोधातील असतात. ते विरोधातील प्रतिक्रिया देतात आणि जे विरोधातील विचारांचे नसतात ते चांगल्या प्रतिक्रिया देतात. व्यतिरीक्त प्रोत्साहनही देत असतात.
समजा एखादं नाणं जर घेतलं तर त्या नाण्याला दोन बाजू आहेत. तशाच बाजू आपल्या आयुष्यालाही आहेत. आयुष्य हे फार सुंदर आहे. परंतू ते जगत असतांना आपल्याला काही कमी अधिक प्रमाणात चांगले वाईट अनुभव येतात. याच चांगल्या वाईट अनुभवाच्या आधारावर आपण आपले जीवन ठरवीत असतो. मार्ग निवडीत असतो. त्याच अनुभवाच्या आधारावर कोणी आयुष्य जगत असतांना चांगला मार्ग पत्करतात. कोणी वाईट मार्ग पत्करतात. जे चांगला मार्ग पत्करतात. त्यांचं कधीच अहित होत नाही. परंतू जे वाईट मार्ग पत्करतात. त्यांचं नेहमीच अहित होत असतं. जेव्हा अहित होतं, तेव्हा काही नशीबाला दोष देवून नवीन मार्ग पत्करतात. काही नशीबाला दोष देवून चूप बसतात. काही नशीब मानत नाहीत. तरीही जगतात. काही नशीबात असं का घडतं म्हणून आत्महत्या करतात. काही डिप्रेशनमध्ये जातात, तर काही वेडेही बनतात. एकच गोष्ट……ती गोष्ट आपल्याला डिप्रेशनमध्ये टाकते. कधी आपल्याला वेडे बनवते. कधी चांगलंही बनवते तर कधी गुंड बदमाश. हे सर्व घडतं आपल्या त्या गोष्टीच्या आहारी गेल्यामुळं. आपल्याला ती गोष्ट आवडते. हवीहवीशी वाटते. परंतू ती गोष्ट न मिळाल्यास सा-याच समस्या. कोणी डिप्रेशनमध्ये तर कोणी वेडे होतात. कोणी आत्महत्या करतात. कोणी आत्मघाती हमले, तर कोणी नैराश्येचं जीवन जगत असतात. ज्याला ती गोष्ट मिळते. तो मात्र सुखी होतो. त्याला आनंद प्राप्त होत असते.
महत्वाची गोष्ट ही की माणसानं कोणत्याही गोष्टीबाबत आसक्ती बाळगू नये. ती वस्तू मिळेल वा कधी मिळणारही नाही. म्हणून माणसानं निराश होवू नये. कधी कधी ती वस्तू उशीरा मिळते. म्हणून ती मिळाल्यावर आनंदीत होवू नये वा हुरळून जावू नये. उदा. काही काही लेखकांच्या जवळ एवढं असतं. परंतू त्यांना कोणीही पुरस्कार देत नाही. कुणाची एकच साहित्यकृती असते, तरी तिला भरपूर पुरस्कार मिळतात. याचाच अर्थ असा की जास्त पुस्तकं लिहिल्यानंतरही पुरस्कार न मिळाल्यास साहित्य लिहू नये असा होत नाही.
खरे संत ते असतात की जे जगाचं कल्याण करीत असतांना समाजातील दांभीक लोकांच्या विरोधाभाषाचा विचार करीत नाहीत. ते चांगली कामं नेहमीच करीत असतात. म्हणूनच त्यांना परमोच्च स्थान मिळतं. संत एकनाथ नदीतून आंघोळ करुन येत असतांना त्यांच्या अंगावर एक व्यक्ती वारंवार थुंकतो. याचा अर्थ त्यांनी नंतर अांघोळच केली नाही असा होत नाही. त्यांनी नदीत एकशे एकवेळा अांघोळ केली. शेवटी थकून त्या व्यक्तीनं थुंकणं बंद केलं. अशीच एका साधूची गोष्ट आहे. हा साधू विहिरीवर पाणी भरीत असतांना त्याला एक विंचू पाण्यात पडलेला दिसला. त्यानं त्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी बराच प्रयत्न केला. परंतू ते जमले नसल्यानं तो साधू स्वतः विहिरीत उतरला. तेव्हा त्याला वाचवीत असतांना तो विंच त्या साधूला बरेच वेळा चावला. शेवटी तो एवढे वेळा चावूनही साधूनं आपला प्रयत्न सोडला नाही. शेवटी त्याला वाचवलेच.
आपले आयुष्य म्हणजे असाच विंचूसारखा प्रकार आहे. आपण चांगलेही वागलो तरी लोकं आपणाला विंचूसारखे दंश करणारच. तेव्हा आपण आपल्या आयुष्यात असं हताश होवू नये. ज्याप्रमाणे साधूनं त्या विंचवाच्या दंशावर मात करुन त्या विंचूला वाचवले. तसेच आपण आपल्या आयुष्याला केले पाहिजे. आपल्या आयुष्यातील वाईट गोष्टीवर मात करुन त्याचा त्याग करुन या सुंदर जीवनाला अधिक सुंदर बनवावं.
विशेष सांगायचं म्हणजे नाण्याच्या दोन बाजू असतात. पहिली बाजू ही चांगली बाजू व दुसरी बाजू ही वाईट बाजू. तसेच मार्गाचेही दोन प्रकार असतात. पहिला म्हणजे चांगला मार्ग व दुसरा म्हणजे वाईट मार्ग. आपण फक्त त्या मार्गाचा वापर कसा करावा आणि कोणता मार्ग वापरावा ते आपल्या मनात ठरवावे. कारण वाईट मार्गाचं फलीत वाईटच निघते व चांगल्या मार्गाचं फलीत चांगलं. चांगलं कर्म जर आपल्या हातून घडले तर त्या कर्माचं यश पुढील काळात नक्कीच चांगलं येतं. वाईटांचं वाईटच. मग वाईट कर्म करुन वाईट फलीत मिळविण्यापेक्षा आपण चांगलं कर्म करुन चांगलं फलीत मिळविण्याचा प्रयत्न का करु नये. काही गोष्टी ह्या नैसर्गीक असल्या तरी त्या वाईट जर असतील तर त्या सोडून द्याव्यात आणि चांगल्या जर असल्या तर त्या जोपासाव्यात. यालाच जीवन म्हणतात. चांगलं, सुंदर, यशस्वी जीवन जगण्यासाठी हेच विशेष करुन महत्वाचं असतं. बाकीच्या सर्व भाकडकथा असतात. जीवनात अशा ब-याच गोष्टी असतात की ज्या आपल्याला शिकवीत असतात. ज्याचा आपल्याला हव्या त्या प्रकारे वापर करता येतो. मात्र त्याचा वापर कसा करावा हे आधी आपल्या मनात ठरवावे. मगच त्याचा वापर करावा. तसेच वाईटाचं फलीत वाईटच निघेल हेही ठामपणे लक्षात घ्यावे. जेणेकरुन आपलंच जीवन सुखी समृद्ध बनवता येईल आणि आयुष्यही सुंदर करता येईल यात शंका नाही.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०