शिवार संमेलनात लोककला आणि लोकसंस्कृतीचे बहारदार सादरीकरण
शिवार संमेलनात लोककला आणि लोकसंस्कृतीचे बहारदार सादरीकरण
वर्धा,दि.२३: लोककला आणि लोकसंस्कृती हा मानवी जिवनाचा आधार आहे. सामाजिकता हे लोककला आणि लोकसंस्कृतीचे मूल्य आहे.त्यातून लोकसांस्कृतिक संवेदनशिलता बहरते,त्यासाठी शेत-शिवार, गांव गाडा आणि ग्रामीण क्षेत्र ही अत्यंत उर्वरक भुमी आहे. यांचे प्रत्यंतर प्रकर्शाने पहिल्या शिवार संमेलनात आला.
किरण बहुद्देशीय सेवा संस्था वर्धेच्यावतीने कुरझडी (जामठा) शिवारात पहिल्या शिवार संमैलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाचा एक अत्यावश्यक भाग म्हणून लोक संस्कृती दर्शन हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यात गोंधळ, बहुरूपी रामायण आणि तुकडोजी महाराज यांच्या राष्ट्रीय भजनांचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची संकल्पना आणि संयोजन संमेलनाच्या संयोजीका डॉ. रत्ना चौधरी यांचे होते.
गोंधळ हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय लोककला प्रकार आहे. मुलत: हे एक प्रकारचे विधीनाट्य आहे. ज्यात नृत्य आणि गायनवादन यांचा समावेश आहे. महाराष्ट्रात ही लोककला, लोकसंस्कृती अनेक गोंधळी परिवाराने टिकवून ठेवली आहे. शिवकाळात तर या कला प्रकाराला लोकाश्रय आणि राजाश्रय प्राप्त होता.नंतरच्या काळात मात्र त्याला उतरती कळा लागली. त्याला पुनर्जीवित, पुनर्सवंर्धित करण्याचे काम समर्पित होऊन अनेक गोंधळी परिवाराने केले , त्यातले एक कुटूंब म्हणजे वर्धा जिल्ह्यातील खरांगणा(मोरांगणा) येथील जय भवानी गोंधळी मंडळाचे रेणके कुटूंबिय.अशोक मारोतराव रेणके, साहिल अशोक रेणके,राजीव गुलाब मोरे यांनी अप्रतिम गोंधळ हा कार्यक्रम सादर केला. डाहाका आणि तुणतुण्याच्या लयतालात रेणुकामातेचा, अंबामाईचा गजर करीत गोंधळाचे अप्रतिम सादरीकरण करण्यात आले.
जिल्ह्यातील केळझर येथील काही लोककलावंत कुटूंबे ही भटके विमुक्त बहुरूपी कला कुटूंबे आहेत. गेली कित्येक वर्षे ते अविरतपणे बहुरूपी कला, लोकनाट्य, राष्ट्रीय गीतगायन, लोक रामायण इत्यादी लोककला प्रकार सादर करीत आहे. या शिवार संमेलनात त्यांच्या वर्धा जिल्हा भटके विमुक्त समाज सेवा संस्थेच्यावतीने लोकसंस्कृती दर्शन अंतर्गत “लोक रामायणातील – रावण-मंदोदरी संवाद”हे बहुरूपी लोकनाट्य सादर केले.
या लोकनाट्याची रचना शंकरराव शिंदे यांची होती.निर्मिती ताराचंद माहुरे यांनी केली तर दिग्दर्शन वामनराव माहुरे यांचे होते. यात माधवराव जगताप, गोपाल माहुरे, तुकाराम माहुरे,रामराव माहुरे, पुरूषोत्तम सुरतकार, किसनाजी जगताप, वसंतराव जाधव, भाष्करराव शिंदे, शंकरराव सुरतकार,भुजंगराव माहुरेआदिंनी विविध भुमिका सादर केल्या. हे लोकनाट्य बहारदार झाले. प्रचलित रामायण नाट्यापेक्षा वेगळे असे हे लोकरामायण होते.
लोकसंस्कृती दर्शन अंतर्गतच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची भजने श्री गुरूदेव सेवा मंडळाने सादर केली. ग्रामगीता आणि गांव-शेत -शिवार हे या भजनांचे केंद्र होते. ही भजने जयवंत भालेराव, प्रकाश राऊत, संजय वाके,कृष्णा सोलव, प्रविण वृंदे आदिंनी सादर केली. संमेलन संयोजिका डॉ. रत्ना चौधरी नगरे, डॉ. सुधीर अग्रवाल, मंदा तरंगे,हर्षवर्धन वैद्य, लालबहादूर यादव,गजेंद्र सुर्यवंशी,राजश्री वैद्य ,अनिकेत पेंदाम, प्रा. वर्षा फुंडे, नीरज आगलावे, प्रफुल पुणेवार,रवींद्र देशमुख, विष्णु कुमार, छाया राडे, प्रवीण सालोडकर, राहुल तळवेकर यांनी सर्व कलावंतांचे स्वागत आणि सत्कार केला. संपुर्ण लोकसंस्कृती दर्शन कार्यक्रमाचे संचालना अनीता कडू यांनी तर माधुरी देशमुख यांनी आभार मानले.