पहिले शिवार संमेलन म्हणजे एकमेवव्द्वितीय सांस्कृतिक घटना -डॉ . राजेंद्र मुंढे
पहिले शिवार संमेलन म्हणजे एकमेवव्द्वितीय सांस्कृतिक घटना -डॉ . राजेंद्र मुंढे
वर्धा (प्रतिनिधी ) “अलीकडील काळात आपल्या लोक – कृषी संस्कृतीच्या वाहक असलेल्या लोककला , साहित्य नष्ट होते कि काय असे वाटत असतांना “शिवार” सारखी संमेलने वेगळे बळ देतात . म्हणून अशी संमेलने गावोगावी व्हावीत यातून खरी लोकसंस्कृतीच्या संवर्धनाची चळवळ निर्माण होईल . हे पहिले शिवार संमेलन म्हणजे एकमेवव्द्वितीय सांस्कृतिक घटना आहे” ! असे प्रतिपादन कवी – समीक्षक- संपादक आणि विदर्भ सांस्कृतिक आघाडीचे समन्वयक डॉ . राजेंद्र मुंढे यांनी केले .
डॉ . राजेंद्र मुंढे हे किरण बहुद्देशीय सेवा संस्था वर्ध्याच्या वतीने मातोश्री मुक्ताई स्मृतीत कुरझडी (जामठा) शिवारात आयोजित एक दिवशीय पहिल्या शिवार संमेलनाच्या समारोप कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते .
डॉ . मुंढे पुढे म्हणाले , कोरोना महामारीच्या भयाण सावटातून बाहेर पडत असतांना या शिवार संमेलानाचे आयोजन कलासक्त मनाला उभारी देणारी झुळूक आहे . शहरापासून दूर शेत शिवार धु-याच्या आडवळणावर घेतलेले हे संमेलन म्हणजे लोक संस्कृतीच्या इतिहासातील एकमेवाद्वितीय सांस्कृतिक घटना ठरावी . असेही डॉ . मुंढे म्हणाले .
समारोप कार्यक्रमात संपूर्ण समारोहाचे संमेलनाध्यक्ष आणि नाटककार, दिग्दर्शक,नाट्यसमीक्षक प्रा. डॉ. सतीश पावडे होते. आपल्या भाषणात डॉ सतीश पावडे म्हणाले की आपली लोकसंस्कृती आणि लोककला यांना जपण्याचे , त्यांचे संवर्धन करण्याचे प्रयत्न सामाजिक पातळीवर होणे अधिक गरजेचे आहे,कारण त्यातूनच समाज एकत्र येऊ शकतो एवढेच नव्हे तर त्यातून बहुसांस्कृतिकता यांचेही संवर्धन केले जाऊ शकते. निकोप सामाजिक व्यवस्थेसाठी बहुसांस्कृतिक जीवनशैली आवश्यक आहे आणि शिवार संमेलन हे त्याचे महत्त्वाचे संवाहक आहे.
या समारोप कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रासाठी चाळीस वर्षाहून अधिक प्रदीर्घ काळ सेवा देणारे डॉ.हेमचंद्र वैद्य आणि प्रा. शेख हाशम यांना सन्मानपत्र स्मृतिचिन्ह व यथोचित मानसन्मान देऊन संमेलन संयोजिका डॉ रत्ना चौधरी नगरे तसेच कार्यक्रम प्रमुख प्राचार्य दशरथ नगरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिवार संमेलनाच्या विचारपीठावर यशवंतराव दाते स्मृती संस्थेचे अध्यक्ष प्रदीप जाते, शिवार कवी संमेलनाचे अध्यक्ष संजय इंगळे तिगांवकर, नागपूर विभागीय माहिती संचालक संचालनालयातील दृक-श्राव्य विभागाचे प्रमुख आशिष यावले इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तसेच शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक सोबतच पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या रंजना दाते ,जया परमार, डॉ माया रंभाळे ,श्रुतिका सालोडकर ,पद्माकर बाविस्कर ,आशिष पोहाणे, किशोर वानखेडे, मुरलीधर बेलखोडे ,फोटो जर्नालिस्ट शेखर सोनी, सीनेमेटोग्राफर निखिल खोडे यांचा ही स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र ,वृक्ष ,पुस्तक रुमाल, टोपी देऊन यथोचित भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
आपल्या सत्काराला उत्तर देताना राष्ट्रभाषा प्रचार समितीचे प्रधानमंत्री डॉ.हेमचंद्र वैद्य म्हणाले की “पहिल्या आणि आगळ्या-वेगळ्या शिवार संमेलनात झालेला हा सत्कार माझ्या जीवनातील अत्यंत आनंददायी क्षण आहे. आपल्या मातीशी ,आपल्या माणसांची, ग्रामीण जीवनशैलीशी आपली नाळ जुळलेली आहे. महात्मा गांधीजींनी सुद्धा खेड्याकडे चला. खरा भारत हा ग्रामीण भागात आहे असं म्हटलं होतं खऱ्या अर्थाने शिवार संमेलन आयोजित करणाऱ्या संयोजकांचे खुप कौतुक आहे की त्यांनी वर्धा जिल्ह्यात या शिवार संमेलनाचे आयोजन करून इतिहासात नोंद करविली आहे.”
त्याचप्रमाणे दुसरे सत्कारमूर्ती, आधार वडचे संस्थापक प्रा.हाशम सर आपल्या सत्काराला उत्तर देतांना….
“आपण आयोजित केलेलं शिवार संमेलन आणि संमेलनस्थळी साज सज्जेसाठी केलेला ग्रामीण प्रतिकांचा कल्पक वापर या गोष्टी मातीशी नाळ जोडणा-या आहेत.शिवार संमेलनातील वातावरणामुळे मला माझं बालपण आणि तारूण्याचा काळ आठवला. भूतकाळातील स्मृती उजळून निघाल्या.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे हे शिक्षकाचे कर्तव्यच असतें. शिक्षक आपल्या परिने विद्यार्थ्यांना दिशा दाखविण्याचे आणि यशाप्रत नेणा-या मार्गांची माहिती देत असतो. शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा किती आणि कसा लाभ घ्यावा हे सर्वस्वी विद्यार्थ्यांवर अवलंबून असते. डॉ. रत्ना चौधरी यांची विद्यार्थिनी म्हणूनही जिदद, चिकाटी व उच्च शिक्षण घेण्याची अभिलाषा त्यांना यशस्वी बनविण्यास कारणीभूत ठरली. आज तिने या शिवार संमेलनाचे आयोजन करून मला गुरूदक्षिणाच जणू दिली आहे.”
समारोप प्रसंगी पहिल्या शिवार संमेलनाच्या आयोजन समितीच्या सदस्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान संमेलनाध्यक्ष प्रा.डॉ सतीश पावडे व विचारपीठावर उपस्थित असणारे प्रा.डॉ. राजेंंद्र मुंढे सर ,प्रदीप दाते, संजय इंगळे तिगावकर, प्रा. हाशम , डॉ हेमचंद्र वैद्य ,आशिष यावले यांच्या हस्ते करण्यात आला. यात प्रफुल पुणेवार ,किरण नगरे,डॉ सुधीर अग्रवाल,डॉ गिरीश वैद्य, वैशाली भोयर ,माधुरी देशमुख, अर्चना हातेवार, मंदा तरंगे ,मनीषा साळवे, डॉ सुनीता भूर्कुंडे ,डॉ रेखा बोबडे, अनिकेत पेंदाम ,तेजस भातकुलकर, सिद्धी राऊत ,प्रा.किशोर डंभारे, प्रा.अभिजीत पाटील, मिनल गिरडकर,छाया राडे, दिलीप पिस्तुलकर ,राहुल तळवेकर, आयुषी चांदेकर, अश्विनी रोकडे, कुणाल वैद्य, राजू बावणे, विष्णुकुमार ,नीरज आगलावे, हर्षवर्धन वैद्य ,सिद्धेश पुणेवार, मालती वैद्य ,प्रथमेश पुणेवार, राजश्री वैद्य, विनोद ढोबाळ, श्रुतिका सालोडकर ,तृप्ती, प्रवीण सालोडकर,ओवी देशमुख यांचा सन्मान करण्यात आला.
शिवार संमेलनाच्या संकल्पिका आणि संयोजिका डॉ रत्ना चौधरी नगरे तसेच कार्यक्रम प्रमुख दशरथ नगरे यांचा संमेलनाध्यक्षांनी ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर सह संपादित ग्रंथ व स्मृतिचिन्ह देऊन यशस्वीपणे संमेलनाचे आयोजन केल्याबद्दल सन्मान केला.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग या संमेलनात करण्यात आला ते म्हणजे या संमेलनाचे लाईव्ह चित्रण फेसबुक, युट्युब वरून करण्यात आले. प्रास्ताविक व परिचय संमेलनाच्या संयोजिका डॉ रत्ना चौधरी नगरे यांनी केले .कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या राष्ट्रीय वंदनेने संपन्न झाला. कार्यक्रमाचे संचालन प्रसिद्ध निवेदिका ज्योती भगत यांनी केले तर आभार प्राचार्य दशरथ नगरे यांनी मानले.