पत्नी पिढीत पुरुषांच्या व्यथा समजून घेताना – प्रा डॉ सुधीर अग्रवाल

पत्नी पिढीत पुरुषांच्या व्यथा समजून घेताना…प्रा डॉ सुधीर अग्रवाल यांचा लेख
अलीकडे कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे मोठया प्रमाणात वाढत असून न्यायालयात या विसंवादाच्या प्रकरणांची मोठी खच पडलेली आहे.पती -पत्नी विसंवादात पतीकडून पत्नीवर अत्याचार होतो हे सत्य स्वीकारत असतानाच या हिंसाचारातील दुसरी बाजू देखील तपासून बघणे आवश्यक आहे.पत्नीकडून होणाऱ्या पतीच्या छळाची प्रकरणे मात्र पुढे येताना दिसत नाहीत. याचा अर्थ तसे होतच नसावे असे समजता येऊ नये. एकेरी बाजूचे नाणे असू शकत नाही, तशातला हा प्रकार; म्हणूनच पारंपरिक किंवा रूढ समजाच्या पलीकडील दुसऱ्या बाजूचाही विचार गांभीर्याने होणे गरजेचे बनले आहे. कारण, आता तशा घटनाही वाढू लागलेल्या दिसत आहेत.
सासरच्या किंवा पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केल्याच्या बातम्या आपण रोजच वाचत असतो.यात तथ्य मोठ्या प्रमाणात असते.हे कटू सत्य स्वीकारत असताना दुसरी बाजुचा देखील विचार होणे आवश्यक आहे.अलीकडे पत्नी पीडितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून पत्नी पिढीतांच्या संघटना देखील स्थापन झालेल्या आहेत.अधिकाधिक संरक्षण स्त्रियांना आहे.स्त्रियांच्या संरक्षणासाठी अनेक तरतुदी घटनेत आहे.तुलनेने पुरुषांसाठी कायदे कमी आहेत.
पती पत्नी हिंसाचार प्रकरणांमध्ये कायद्याचा होणारा गैरवापर वाढू पाहत असून, भलेही अपवादात्मक असेल, परंतु पत्नीकडून होणाऱ्या पतीच्या छळाकडे दुर्लक्षच घडून येते. अशा प्रकरणांमध्ये पुरुष एकाकी पडताना दिसून येतात व अंतिमतः मनाने कमजोर असलेले आत्महत्येकडे वळतात, म्हणून या विषयाकडे समाजशास्त्रींनी गांभीर्याने लक्ष पुरविणे गरजेचे बनले आहे.
नागपूर मध्ये एका डॉक्टरने पत्नी व सासरच्या लोकांना कंटाळून स्वतःला भुलचे इंजेक्शन लावून घेत स्वतःला संपविले.
नांदेड मध्ये देखील एका प्राध्यापकाने पत्नी व। सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून टोकाचं पाऊलं उचलत आत्महत्या केली.
अशा अनेक घटना आपल्या अवतीभवती घडत असून पत्नी पीडितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.पत्नी पीडित पुरुषांची व्यथा जेव्हा मी वर्तमान पत्रातून मांडली तेव्हा अनेकांचे फोन मला आले.त्यात यवतमाळ जिल्ह्यातील एका दाम्पत्यांनी आपल्या मुलावर पत्नीकडून होत असलेल्या अत्याराचा पाढा वाचला.’माझा मुलगा विदेशात असून त्याने इंजिनिअरिंगची पदवी घेतली असून पुढं त्याच विवाह रितिरिवाजा प्रमाणे करून देण्यात आले.मुलगा व सून आठ वर्षे विदेशात वास्तव्याला होते.त्यांना एक मुलगा देखील झाला.मध्यंतरी आमची सून माहेरी आली.तिच्या वागण्यात बोलण्यात बराच बदल आम्हाला जाणला.मुलाने तिला यायला सांगितले,कॉल केले परंतु तिने येण्यास नकार दिला.काही दिवसानंतर तिने आंम्हाला वकिलांमार्फत नोटीस पाठवून आम्हा तिघांवर कौटुंबिक हिंसाचार केल्याची खोटी केस दाखल करून चाळीस लाख रुपयांची मागणी केली.मुलगा विदेशात असून त्याला केसवर व आम्हाला अधूनमधून कोर्टात जावं लागतं.हा आमच्यावर झालेला अन्याय असून काही कारण नसताना आम्हाला गोवण्यात आलं..’
खरे तर कायदा कोणताच वाईट नसतो, तो उदात्त हेतूनेच बनवला गेलेला असतो. परंतु, त्याचा गैरवापर करणारे करतात. छळाच्या प्रकरणांमध्ये तेच अधिकतर होताना दिसते. विशेष म्हणजे पुरुषांसाठी वेगळे कायदे नाहीत. स्त्रियांसाठी म्हणजे त्यातही पत्नी व सुनेसाठी कायदे आहेत, परंतु स्त्रियांमधील सासू, जाऊ, नणंद किंवा पुरुषांमधील पती, सासरे, दीर या व्यक्तिरेखांसाठी म्हणून कायद्यात वेगळ्या तरतुदी नाहीत. त्यामुळेच पुरुष आयोग हवा अशी मागणी लावून धरली जात आहे..पत्नीवर छळ होतो हे सत्य स्वीकारत असतानाच पुरुषांवरील होणाऱ्या छळाकडे दुर्लक्ष होता कामा नये.पत्नी पिढीत पुरुषांच्या व्यथा देखील समजून घेण्याची गरज आहे.
९५६१५९४३०६