इम्रान खान यांचे पंतप्रधान पद धोक्यात-प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल यांचा लेख
इम्रान खान यांचे पंतप्रधान पद धोक्यात-प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल यांचा लेख
हा नवा पाकिस्तान आहे,अशी वलग्ना करणाऱ्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे पंतप्रधान पद धोक्यात आले आहे. एकीकडे विरोधकांनी इम्रान खान यांच्यासाठी अविश्वास प्रस्ताव आणून अडचणी निर्माण केल्या आहेत.
‘काहीही झाले तरी राजीनामा देणार नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत खेळत राहणार आणि विरोधी पक्षालाच धक्का देणार’, अशी ठाम भूमिका घेणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे बॅकफूटवर जातील अशी दाट शक्यता आहे.
इम्रान खान हे पंतप्रधानपदाचा राजीनामा देतील असे संकेत मिळू लागले आहेत. पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाच्या यूट्युब चॅनेलचे नाव आज अचानक बदलण्यात आले. पंतप्रधान कार्यालय या ऐवजी आता इम्रान खान असे नाव या यूट्युब चॅनेलला दिले गेले आहे. या बदलामुळे इम्रान यांच्या राजीनाम्याच्या चर्चांना उधाण आले आहे. इम्रान यांच्या पाकिस्तान तहरीक ए इन्साफ ( पीटीआय ) या पक्षाने इस्लामाबाद येथील परेड ग्राउंडवर सभा ठेवली आहे. या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. पक्षाच्या ट्वीटर हँडलवरून या सभेबाबत आवाहन करण्यात आले आहे. या सभेच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करण्याचा इम्रान यांचा इरादा असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
दरम्यान, विरोधी पक्षांनी इम्रान यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. इम्रान यांच्याविरुद्ध नॅशनल असेंब्लीत अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. मुख्य म्हणजे इम्रान यांच्या पक्षातील अनेक खासदारांचे या प्रस्तावाला समर्थन असल्याचा दावा विरोधी पक्षांनी केला आहे. अशावेळी इम्रान खान हे या अग्निपरीक्षेला सामोरे जातात की त्याआधीच राजीनामा देतात, हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे.
पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत ३४२ सदस्य आहेत. इम्रान यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी १७२ सदस्यांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. पीटीआयच्या नेतृत्वाखालील आघाडीकडे १७९ सदस्यांचे बळ आहे. त्यात पीटीआयचे १५५ सदस्य असून पक्षातील नाराजी दूर करण्यात यशस्वी ठरल्यास तसेच घटक पक्षांचे समर्थन कायम राहिल्यास इम्रान यांच्यावरील टांगती तलवार दूर होऊ शकते, असेही बोलले जात आहे.
-प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल
९५६१५९४३०५