रशियाची मानवाधिकार परिषद मधून हकालपट्टी -प्रा.डॉ सुधीर अग्रवाल यांचा लेख
रशियाची मानवाधिकार परिषद मधून हकालपट्टी -प्रा.डॉ सुधीर अग्रवाल यांचा लेख
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर जगभरातील देशांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद (UNHRC) मधून रशियाला बेदखल करण्याच्या प्रस्तावावर संयुक्त राष्ट्र महासभेत (UNGA) मतदान झाले. रशियाविरोधातील या ठरावावर भारताने मतदानात भाग घेतला नाही. यावेळी झालेली मतदानात प्रस्तावाच्या बाजूने ९३ तर विरोधात २४ मते पडली. भारतासह ५८ देशांनी मतदानात भाग घेतला नाही. मतदानानंतर रशियाला UNHRC मधून निलंबित करण्यात आले आहे. युक्रेनमधील बुका येथे झालेल्या हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने रशियाला मानवाधिकार परिषदेतून निलंबित करण्याचा प्रस्ताव ठेवला होता.
युक्रेनच्या प्रतिनिधीने संयुक्त राष्ट्र महासभेच्या आपत्कालीन सत्रात मतदान करण्यापूर्वी सांगितले की, “आम्ही आता एका वेगळ्याच परिस्थितीचा सामना करत आहोत, ज्यात संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेचा (UNHRC) एक सदस्य दुसर्या देशाच्या भूभागावर भयंकर मानवाधिकार उल्लंघन आणि गैरवर्तन करतो. जे युद्ध गुन्हे आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्याच्या बरोबरीचे आहे.” युक्रेनचे प्रतिनिधी म्हणाले आहेत की, रशियन संघाचे निलंबन करणे हा एक पर्याय नसून हे एक कर्तव्य आहे.”
दरम्यान, युक्रेनच्या विविध भागांतून विशेषत: बुका येथून समोर आलेल्या वेदनादायक फोटोनी जगभरात खळबळ उडाली आहे. युद्ध गुन्ह्यांसाठी रशियाविरुद्ध खटला चालवण्याची आणि कठोर निर्बंध घालण्याची मागणी करण्यात आली होती. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सर्वात शक्तिशाली युनिटला मृतदेहांच्या ढिगाऱ्याचे संक्षिप्त व्हिडिओ फुटेज दाखवून “रशियन आक्रमण थांबवा” असे आवाहन केले होते. त्यानंतर रशियाचे युक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून निलंबन करण्यात आले.
२००६ साली स्थापन झालेल्या संयुक्त राष्ट मानवाधिकार परिषदेच्या सदस्यत्वापासून वंचित केला जाणारा रशिया हा दुसरा देश आहे. २०११ साली उत्तर आफ्रिकेतील लिबियामध्ये झालेल्या उलथापालथीत त्या देशाचे दीर्घकाळापासूनचे नेते मुअम्मर गडाफी यांना पदच्युत करण्यात आले, त्या वेळी आमसभेने त्या देशाचे सदस्यत्व स्थगित केले होते.
रशियाविरुद्धच्या ठरावावरील मतदानात भारत तटस्थ
दरम्यान, बूचा नरसंहाराचा मुद्दाही चांगलाच तापलेला होता. रशिया विरोधातील हा प्रस्ताव अमेरिकेने ठेवला होता. या मतदानादरम्यान संपूर्ण जगाच्या नजरा भारताकडे लागल्या होत्या. कारण यावेळी, आता भारत कुणाच्या बाजूने मतदान करतो? अथवा भारत रशियाला पाठिंबा देतो की नाही, यावर सर्वांचे लक्ष होते. मात्र, या प्रकरणात भारताने कुणाचीही बाजू घेतली नाही, भारताने मतदानात भागच घेतला नाही.
रशियाला संयुक्त राष्ट्र मानवाधिकर परिषदेतून निलंबित करण्याच्या अमेरिकेने मांडलेल्या ठरावावर संयुक्त राष्ट्र आमसभेत भारत तटस्थ राहिला.युक्रेनमधील युद्ध सुरू झाल्यापासून, भारताने शांतता, संवाद व कूटनीती यांचे समर्थन केले आहे. रक्तपात करून व निष्पाप जिवांची किंमत देऊन कुठलाही तोडगा काढता येत नाही, असे भारताने व्यक्त केले आहे. भारताने शांततेची, तसेच हिंसाचार तत्काळ थांबवण्याची बाजू घेतलेली आहे.
-प्रा डॉ सुधीर अग्रवाल
९५६१५९४३०६