जग

द्वितीय महायुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर

द्वितीय महायुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर

जग हे विनाशाच्या उंबरठ्यावर येऊन पडले आहे. राजकारणाच्या स्वार्थी वृत्तीच्या फायद्यासाठी जगावर फार मोठे अरिष्ट लादल्या जात आहे. तिसरे महायुद्ध लढले जाईल का असा प्रश्न जगातील लोकांच्या मनात निर्माण झाला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या विस्फोटकांनी मानवाचा शाश्वत विकासाला उध्वस्त करण्याचे कुटील डाव जगामध्ये निर्माण होत आहेत. अहंकारी रानटी प्रवृत्ती अनेक नेत्यांच्या अंगात संचारली आहे .युद्ध व त्यांची किती गंभीर परिणाम असतात त्याची प्रचिती ज्यांनी द्वितीय महायुद्ध पाहिले त्यांना नक्कीच आले आहे .डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दुसऱ्या महायुद्धात घेतलेल्या भूमिकेचा परिणाम जागतिक परीप्रेक्षात पडलेला दिसतो. अनेक नेत्यांना त्यांच्या विचारापर्यंत पोचता आले नाही.

द्वितीय महायुद्धातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेल्या निर्णयातून त्यांच्या भारतीय स्वातंत्र्याबाबतची दूरदृष्टी किती वास्तवदर्शी होती त्यांची जाणीव होते. ‘हिंदी राजकारणाचा विचका’ या लेखात त्यांनी युद्धज्वराबाबतची आपली भूमिका मांडताना ते लिहितात की,” युद्धात पाशवी शक्तीचा उपयोग करण्यात आल्यामुळे झालेले युद्धाचे घोर परिणाम ज्यांनी पाहिले आहेत. ऐकले आहेत किंवा अनुभवले आहेत त्या सर्व लोकांना युद्ध म्हणजे
मनुष्यमात्रावरील केवढी भयंकर आपत्ती आहे हे सांगावयास नको. हिटलरसारख्या निर्दयी काळपुरुषांची मनोभावना अगर हिंदुस्थानातील आर्य संस्कृतीच्या अभिमानी लोकांची मनोभावना बाजूस ठेवली तर जगामध्ये कोठेही पाशवी शक्ती व युद्ध ही चांगली गोष्ट आहे असे म्हणणारा एकही समंजस मनुष्य सापडणार नाही. तसेच युद्ध म्हणजे विधी घटना आहे. तिच्या उलट जाऊन काय उपयोग होणार असेल तर होऊ द्या असे बेफिकीर वृत्तीचे लोकही बरेच सापडतील उलटपक्षी युद्ध कसे टाळता येईल या खोल विचारात घडून गेलेली माणसे पूर्वीपेक्षा आज पुष्कळ सापडतील .” या विचारातून पहिल्या महायुद्धाचे जे परिणाम जगाला भोगावे लागले ते नक्कीच कष्ट प्रधान होते.

विश्वाने दोन महायुद्ध पाहिले आहेत. युद्ध या शब्दानेच माणसाला थरकाप सुटतो. पहिल्या महायुद्धाच्या शेवट व त्यातून दुसऱ्या महायुद्धाची पडलेली बीजे. त्यातून विश्वास शांती राहावी म्हणून निर्माण झालेले संयुक्त राष्ट्र संघटना. संयुक्त राष्ट्र ने जगावर येणाऱ्या युद्धाचा मुकाबला करण्यासाठी शांती व सामंजस्य करार केल्याने अनेक देशांमध्ये शांती बहाल झाली आहे. तरी व्हिटो अधिकार प्राप्तराष्ट्रे त्यांचे सातत्याने उल्लंघन करताना दिसतात .म्हणून युद्ध छेडणाऱ्या राष्ट्रावर जगाने कठीण असे निर्बंध लादयला हवे, जेणेकरून ते राष्ट्र युद्धाला चेतावणी देणार नाही किंवा युद्ध स्वतःहून करणार नाही.

दुसरे महायुद्ध हे हिटलरच्या महत्त्वकांक्षामुळे घडून आले. १ सप्टेंबर १९३९ ला सुरू झालेले दुसरे महायुद्ध २ सप्टेंबर १९४५ ला समाप्त झाले. सहा वर्षे चाललेल्या या महायुद्धाने जगाला दोन भागात विभागले. एक शत्रुराष्ट्र व दुसरे दोस्त राष्ट्र .अशा धुम्मचक्रित भारतावर इंग्रजांचे राज्य होते त्यांनी भारतीय लोकांची परवानगी न घेता भारत हा दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्राकडून लढेल असे घोषित केले. त्यामुळे काँग्रेस व इतर काही नेते नाराज झाले. आमच्या देशाला स्वातंत्र्य न देता. आम्हाला युद्ध ढकलणे हे मानवीय दृष्ट्या योग्य नाही. असे मत काँग्रेसचे नेत्यांचे होते .

पण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जनतेला ब्रिटिशांच्या बाजूने लढण्याचे आवाहन केले. जर या महायुद्धात दोस्त राष्ट्र जिंकले तर भारतीय स्वातंत्र्याच्या आड कोणती शक्ती येऊ शकत नाही. हा दूरदृष्टी त्यांनी लक्षात घेऊन शेड्युल कास्ट फेडरेशनच्या लोकांना ब्रिटिशांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्यांच्या या महान दूरदृष्टीकोनातूनच भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यांची भारतीय स्वातंत्र्यप्रती आस्थ किती प्रखर होती यांची महती दिसून येते. द्वितीय महायुद्धात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भारतीय स्वातंत्र्यबाबदची दूरदृष्टी यांचा विचार या संशोधनात करण्यात आलेला आहे.

महायुद्ध हे अत्यंत सहारक असणारी लढले जाते. यामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडतात. प्रचंड वित्त आणि जीवितहानी होते .माणसाच्या दैना अवस्दाचा बाजार मांडला जातो. पण युद्ध व महायुद्ध का होतात ..त्यांचे परिणाम किती गंभीर असतात यांची प्रच्युती पहिले महायुद्ध व दुसरी महायुद्ध या दोन्ही मधून आपल्याला समजून आलेली आहे. प्रकर बुद्धीचे मूलगामी वैज्ञानिक अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी म्हटले आहे की, “मानवाची प्रत्येक कृती अखिल मानव जातीला सुखाने राहता यावे यासाठी केली पाहिजे. महायुद्ध होणारच नाही अशी आंतरराष्ट्रीय परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय मानव जातीला शांतता लाभेल लाभणे शक्य नाही.” ही महायुद्धाची वास्तवगर्भी भूमिका आपण समजून घेतली पाहिजे.

” द्वितीय महायुद्धात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भारतीय स्वातंत्र्याबाबतची दूरदृष्टी ” या शोधनिबंधात विश्लेषण आशय पद्धतीचा उपयोग करण्यात आलेला आहे. हाती आलेल्या पुराव्यानुसार व अनेक लेखकांच्या कलाकृतीतून दुसऱ्या महायुद्धात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जी भूमिका घेतली ती अत्यंत पारदर्शक व दूरदृष्टीच्या सापेक्षेवाद मांडणारी आहे. त्याचे परिणाम काय होतील ..याचा अभ्यास त्यांना होता. देशातील सामाजिक आर्थिक व राजकीय क्रांतीच्या धामधुमीतून दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली व जगाला नव्या वळणावर घेऊन गेली. जर्मनी, जपान, रशिया, चीन , इंग्लंड, अमेरिका ,इटली पोलंड, भारत अशा अनेक राष्ट्रांनी या महायुद्धाची प्रखरता अनुभवलेली आहे. जागतिक पातळीवर नेत्यांना या युद्धाचा उद्देश माहीत नव्हता. हिटलर यांनी केलेल्या गंभीर चुकांचा परिणाम देशाला आणि जगाला भोगावा लागला. या संशोधनाच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टी चा वेध घेण्यासाठी विश्लेषण आशय पद्धतीचा वापर करण्यात आलेला आहे.

एके ठिकाणी बर्नार्ड शहा ने म्हटले आहे की,” एक विजय प्राप्त झालेले राष्ट्र कर्करोगाने ग्रस्त मनुष्य प्रमाणे असते. तो काहीच विचार करू शकत नाही. जसे एक निरोगी मनुष्य आपल्या हाडाविषयी जितका विस्मृत असतो तितकेच सुरक्षित राष्ट्र आपल्या राष्ट्रीयत्व पुनसर्थापित करण्याच्या विचारांशिवाय काहीच करू शकत नाही. असा मनुष्य कोणत्याही सुधारणा दर्शनी किंवा उपदेशकांची कोणतेही गोष्ट राष्ट्रीयत्वाची मागणी स्वीकार केल्याशिवाय ऐकू इच्छित नाही. एकीकरण आणि स्वातंत्र्याच्या प्राप्त शिवाय दुसरे कितीही महत्त्वाचे कार्य असेल तरी तो करणार नाही.” स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आंदोलन होत असताना एका बहुसंख्य घटकाकडे डोळेझाक कसे काय केल्या जाऊ शकते .याचे विश्लेषण वरील शब्दावरून समजून घेता येईल.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर एक दूरदृष्टीयुक्त विचारवंत होते. त्यांनी भविष्यात येणारे धोके कसे असतील यांचे चिंतन केले होते. त्यांनी आपल्या सखोल ज्ञानक्रांतीच्या जोरावर काय योग्य व काय अयोग्य याचे मार्मिक विचार केले होते .द्वितीय महायुद्ध जेव्हा सुरू झाले तेव्हा त्यांनी आपली सर्व शक्ती दोस्त राष्ट्राच्या भूमिकेनुसार अनुकूल ठेवली .त्यांना माहित होते की लोकशाहीवृत्ती राष्ट्राच्या विचारानेच आपण जागतिक शांती प्रस्थापित करू शकतो. पण इतिहासकाराने त्यांच्या संकेत सृजन दृष्टिकोनाकडे डोळेझाक केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या पुराव्याकडे भारतीय नेत्याने लक्ष दिले नाही. त्याला स्वतःची पोळी भाजून घेण्यातच घाई झाली होती. १९४२ च्या चलेजाव आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दिला नाही .आपल्या अस्पृश्य बांधवांना ब्रिटिशांच्या बाजूने लढण्याचे आवाहन केले होते. काँग्रेसचा अ प्रामाणिक हेतू दाखवून देताना ते म्हणतात की,” काँग्रेसला स्वतंत्र भारतात हिंदू करिता पूर्ण व अनियंत्रित स्वातंत्र्य पाहिजे आहे. की ज्या आधारे ते अस्पृश्यांना कसेही वागू शकतील. स्वातंत्र्यासाठी लढा असे उदात्त नाव असलेल्या अशा या अप्रामाणिक आंदोलनात अस्पृश्यांनी भाग न घेतला तर त्याच काहीच नवल नाही. हा दृष्टिकोन अत्यंत महत्त्वपूर्वक व सत्तानिष्ठेचा परिपाक आहे .

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दुसऱ्या भारतात आपली भूमिका किती संयुक्त आहे. यांची माहिती टाइम्स ऑफ इंडिया या दैनिकांच्या प्रतिनिधीशी २७ जुलै १९४२ ला बोलताना दिलेली आहे .ते म्हणतात,” गांधीचा करेंगे व वा मरेंगे हा आदेश बेजबाबदारपणाचा आणि मूर्खपणाचा आहे. त्यांच्या राजकीय मुत्सदगिरीचे दिवाळे वाजल्याचे तो द्योतक आहे. रानटी लोक हिंदुस्थानावर अधिपत्य स्थापण्यासाठी हिंदुस्थानाच्या वेशीपाशी आले असता देशातील कायदा व्यवस्था ही कमजोर करणे हा वेडेपणा आहे. भारतीयांच्या संबंधित बोलायची तर ब्रिटिश आता शेवटच्या खंदकात लढत आहेत. जर लोकशाहीचा विजय झाला तर भारतीय स्वातंत्र्याच्या आड कोणी येऊ शकणार नाही.” हा वास्तवांकित इशारा देऊनही काँग्रेसने नेत्याना पटला नाही त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवर विविध प्रकारचे आरोप केले होते .पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या विचारापासून डगमगले नाही.

क्रिप्स कमिशन भारतात आले . त्यांनी भारताला स्वातंत्र्य देण्याविषयी चर्चा करण्यासाठी विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. क्रिप्स कमिशन ने केलेल्या दगाबाजीमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर याना स्वतंत्र मजूर पक्ष विसर्जित करून अखिल भारतीय शेड्युल कास्ट फेडरेशन नावाचा नवीन पक्ष करून आपल्या राजकीय क्रांतीची मशाल पेटवली. ते ब्रिटिश राजवटीत देशाचे प्रथम मजूर मंत्री झाले. मुंबई आकाशवाणीवर ९ नोव्हेंबर १९४२ ला भाषण देताना ते म्हणाले की,” हे युद्ध केवळ पृथ्वीवरील प्रदेश वाटून घेण्याकरिता सुरू झालेले नाही. तर ते माणसा माणसातील नि राष्ट्राराष्ट्रात सहजीवनाचे कसे नाते असावे याविषयी मूलभूत फरक घडवून आणण्यासाठी घडत आहे. सहजीवनाच्या अटींच्या
फेरतपासणीची मागणी करणारी ही क्रांती आहे. सामाजिक पुनर्रचनेची मागणी आहे. म्हणून नाझीवादाचा जय झाला तर नाझी समाज रचनेखाली स्वातंत्र्याची गळचेपी होईल. समता नाकारण्यात येईल आणि एक अनिष्ट मत म्हणून बंधुता सुद्धा उखडून टाकण्यात येईल.” हे विचार नव्या जगाच्या निर्मितीची भूमिका विशद करणारे होते. दुसऱ्या महायुद्धात जगातील लोकशाहीप्रधान देशांनी एक होऊन अलोकशाहीवादी विचाराला उखडून फेकण्याचा त्यांनी सल्ला दिला होता .
द्वितीय महायुद्धामध्ये जी दूरदृष्टी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना होती तशी दृष्टी इतर नेत्यांमध्ये दिसत नाही. रुझवेल्ट, महात्मा गांधी, सुभाष चंद्र बोस, मानवेंद्रनाथ राय, मौलाना अबुल कलाम अशा नेत्यांनी या महायुद्धाचा मागोवा घेता आला नाही.डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाझी युद्धाला धर्मांधतेचे संकट म्हणून पाहत होते. हे संकट फक्त भारतासाठी नाही तर जगातील मानव जातीवरील संकटे आहेत. म्हणून या संकटाचा मुकाबला करण्यासाठी त्यांनी आपल्या बांधवांना मानवतेच्या अंगाने लढावे असा संदेश दिलेला होता. त्याचप्रमाणे ११ मे १९४० ला हाऊस ऑफ कामन्स बोलताना विन्स्टन चर्चिल म्हणाले ,” रक्त, श्रम, अश्रू आणि घाम यांच्या व्यतिरिक्त राष्ट्राला देण्यासाठी माझ्यापाशी काही नाही .आपल्या धोरणा संबंधाने खुलासा करताना ते म्हणाले ,तुम्ही विचाराल नव्या सरकारचे धोरण काय राहील. त्याला माझे उत्तर आहे. युद्ध ,शत्रूशी सर्व शक्तीनिशी झुंज देणे हेच माझे धोरण आहे. आम्ही जमिनीवरून लढू, समुद्रावरून लढू ,आकाशातून लढू मानवी इतिहासात ज्याला तुलना सापडणार नाही अशा राक्षसी जुलमशाही विरुद्ध आपल्याला झुंज द्यायचे आहे .तुम्ही विचाराल आपले ध्येय काय आहे. या प्रश्नाला मी एकाच शब्दात उत्तर देतो विजय .अत्यंत क्रांतीगर्भ विचाराची भूमिका आपल्या सैनिकासमोर त्यांनी मांडलेली होती.

महात्मा गांधी यांनी करा व मरा हा नारा दिल्यामुळे भारतातला मिळणाऱ्या स्वातंत्र्यावर गदा येणार होती .कारण भारतीय स्वातंत्र्याच्या हक्कासंबंधी ब्रिटिशांची भूमिका लक्षात घेता काँग्रेसला खूप प्रिय असलेला हा स्वातंत्र लढा अनावश्यक आहे. भारतातील महत्त्वाच्या राष्ट्रीय घटकांनी एकत्र येऊन सर्वसंमतीने राज्यघटना तयार करण्याची पूर्वशर्त भारताचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ब्रिटिश शासनाने घातलेली होती. त्यासाठी राज्यघटना लवकर तयार करण्याचे सोडून महायुद्धाच्या विरुद्ध दिशेला उभे करणे हे नक्कीच धोकादायक होते .

द्वितीय महायुद्धाच्या कॅनव्हास जागतिक आहे .१ सप्टेंबर १९३९ ते २ सप्टेंबर १९४५ महायुद्धाचा शेवट झाला. जागतिक कॅनव्हासवर उभे असणारे भारतीय नेते स्वतःपुरता विचार करत असताना दिसतात. जगातील नेते सुद्धा आपला देश जिंकवा यामध्येच विचार करत असताना ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर मानवतावादी विचारांची पेरणी करतात. द्वितीय महायुद्धात जर हिटलरचा जय झाला तर जगावर मोठे अनिष्ट कोसळेल. हुकूमशाहीवृत्ती लोकशाहीला पायबंदी घालू शकते. म्हणून भारताने हिटलरच्या विरुद्ध उभे राहून देशाला एकसंघ ठेवावे. लोकशाही राष्ट्राचा विजय झाला तर आपले स्वातंत्र्य कोणी हिरावून घेणार नाही .डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातूनच भारताला स्वातंत्र्य मिळाले .या स्वातंत्र्यातून भारतातील फक्त राजकीय व्यवस्थाच बदलेल अशी अपेक्षा नव्हती .तर देशातील सामाजिक व आर्थिक व्यवस्था बदलली .आपले स्वातंत्र्य आपण अबाधित राखले पाहिजे. कारण स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही. दुसऱ्या महायुद्धाचे जागतिक परिणाम मोठ्या प्रमाणात झाले. अनेक राष्ट्र बेचिराख झाले. लाखो लोक मृत्युमुखी पडले .अणूबाँब अस्त्राच्या वापरामुळे जपान बेचिरास झाला. या महायुद्धातून जगाला फार मोठा धोका निर्माण होतो हे दाखवून दिले .

युद्ध हा जिंकण्याचा पर्याय नाही. तर बुद्ध हाच जिंकण्यावरचा पर्याय आहे. ही भूमिका संयुक्त राष्ट्रसंघाने मान्य केली. जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी जगाने एकत्र यावे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

“द्वितीय महायुद्ध तमहायुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भारतीय स्वातंत्र्याबाबतची दूरदृष्टी” या संशोधनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित जगाच्या विचारांचा मागोवा घेण्यात आलेला आहे. स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक ,आर्थिक व राजकीय भूमिका कशा बदलत गेल्या यांचा विचार केला गेलेला आहे. लोकशाहीवादी राष्ट्राचे विचार हे नाझीवादी विचारापेक्षा किती श्रेष्ठ आहेत व उच्च आहेत त्याची माहिती समजून आली आहे. युद्ध हे अत्यंत धोकादायक आहे .महायुद्ध हे तर त्यावूनही धोकादायक आहे . अस्त्राच्या चढाईतून नव्या महायुद्धाची बीज पडल्यासारखी वाटत आहेत. अणूबाँबच्या उपयोगाने जपान मधील माणसांना मोठी किंमत मोजावी लागली आहे. शस्त्रसज्ज देशानी अणूबाँबचा उपयोग कोणत्या युद्धात करू नये. असा लिखित कायदा असताना. स्वतःच्या राजकीय महत्त्वाकांक्षीपोटी जगाला महायुद्धाच्या खाईत लोटले जात आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या परिणामातून जगाने अनेक गोष्टी शिकल्या आहेत. संयुक्त राष्ट्र नावाच्या संघटनेने मोठी कामगिरी बजावली आहे .दुसऱ्या महायुद्धात भारतीय नेत्यांच्या विचारांची कमकुवतपणा लक्षात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव असे नेते व विचारवंत होते की त्यांचे सारे भाकीत आजही सत्यात उतरले आहेत. नव्या भारताच्या निर्मितीसाठी त्यांचे विचार आजही प्रेरणास्त्रोत वाटतात.

“द्वितीय महायुद्धात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भारतीय स्वातंत्र्याबाबतची दूरदृष्टी” या संशोधनातून मानवतेवर आलेल्या संकटावर मात करण्यासाठी हिटलरच्या नाझी संकटाला संपवण्यासाठी दोस्त राष्ट्राच्या भूमिकेच्या बाजूला ते उभे राहिले. त्यांचे राजकीय अस्तित्व संपवून टाकण्यासाठी सर स्टॅफर्ड क्रिप्स यांनी भारतीय परंपरावाद्यांना मदत केली. पण डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे कधीही थांबले नाहीत. त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने नव्या जगाच्या निर्मितीचा नवाआकृतीबंध तयार केला. मानवतेच्या विरूद्ध आवाज पुकारणाऱ्या साऱ्या व्यवस्थेवर प्रहार केला. जागतिक व भारतीय राजकीय सामाजिक व आर्थिक परिस्थितीचा सांगोपांग विचार करून जगाला नव्या वैचारिक विचारात ऊर्जाबळ दिले. त्यांची दृष्टी विशाल होती. त्यांच्या लेखणीतून प्रस्थापित व्यवस्थेला उखळून फेकले .मार्क्सवाद ,साम्यवाद यामधील कच्चे दुवे शोधले.ब्राह्मणी व्यवस्थेच्या अमानवी विचारांना आग लावली. भारतीय स्वातंत्र्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. पण त्या स्वातंत्र्यात अस्पृश्य बांधवांचा वाटा असावा तरच ते स्वातंत्र्य खरे आहे. नाहीतर ते स्वातंत्र्य उच्चवर्णीयांची मिरासदारी असेल हा युक्तिवाद त्यांनी केला होता.

दुसरे महायुद्ध व त्यावेळी घेतलेल्या विविध नेत्यांच्या भूमिका ह्या संदिग्ध व स्वार्थी होत्या असे लक्षात येते. मोहनदास करमचंद गांधी, विन्स्टन चर्चिल याच्या भूमिका परिपक्वतेच्या अभाव अशा होत्या .आपण का लढतो व त्याचे कारण काय हेच काही नेत्याना माहीत नव्हते. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका रास्त अशीच होती. त्यानी देशाला नवी दिशा दिली. स्वातंत्र्यापासून भारताला कोणी रोखणार नाही हा गर्भित इशारा ब्रिटिशांना दिला होता .भारतीय संविधान निर्मितीच्या प्रक्रियेतून भारताला स्वातंत्र्य देण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेल्या विविध भूमिकेतून भारताला स्वातंत्र्य मिळालं. त्यांचे योगदान आपण विसरू शकणार नाही हे वास्तव आहे.

संदीप ढिवरूजी गायकवाड
नागपूर
९६३७३५७४००

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button